सिगरेट सोडून आज वीस वर्षं झाली मला! १९६२ साल! मी इंजिनियरिंगच्या दुसर्या वर्षात होतो व त्यावेळच्या प्रथेप्रमाणे या वर्षी सर्व शाखांचे विद्यार्थी "भारतदर्शन"ला जायचे (म्हणजे कुठले-कुठले कारखाने पाहायच्या निमित्ताने भारतातली मिळतील तितकी प्रे़क्षणीय स्थळे पाहून घेणे. स्तूप पाहण्यासाठी भोपाळमधला किंवा ताजमहाल पाहण्यासाठी आग्र्यामधला असे कुठले तरी फडतूस कारखाने शोधून व ते पाहायचे निमित्त सांगून स्तूप किंवा ताजमहाल पाहून घेणे वगैरे.) मात्र आधुनिक भारताची तीर्थक्षेत्रे या नावाने पंडित नेहरूंनी गौरवलेले भिलाई, दुर्गापूर, टाटानगर, राउरकेला वगैरे पोलाद कारखानेही (तिथं इतर काही ’प्रेक्षणीय’ नसलं तरी) एक कर्तव्य म्हणून बघितली जायचीच. भिलाई स्टील प्लांट (त्यावेळी अजून त्या कंपनीचं नाव हिंदुस्तान स्टील असं होतं, ’स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया’ अजून स्थापन झालं नव्हतं) पाहायला आम्ही गेलो! ’द्रुग’ नावाच्या (त्यावेळच्या तरी) ’कुस्थानका’वर आम्ही ४० विद्यार्थी उतरलो. पाऊस पडत होता व आम्हाला आमच्या उतरायच्या जागी नेण्यासाठी नियोजित केलेली बस अजून यायची होती. मग तोवर काय करायचं? पाऊस तर पडत होताच व वर थंडी होती. एकाने टूम काढली की "चला, मस्त थंडी आहे. एक सिगारेट शिलगावू या"! मी अजून विद्यार्थी होतो व कमावत नव्हतो त्यामुळे क्षणभर करू की नको असं झालं, पण क्षणभरच. "एकदा ओढण्यानं काय होतंय" या भावनेनं शेवटी मी त्या मोहाला बळी पडलोच व शिलगावली माझी पहिली सिगारेट. त्याकाळी खूप लोकप्रिय असलेली (बिनफिल्टरची असल्याने अगदी unadulterated poison असलेली व अगदी "Good to the last puff" या कीर्तीची ’पनामा’!) पहिला झुरका घेतला आणि तोंड वाकडं केलं. दुसर्याने ओढलेल्या सिगारेटचा वास किती छान वाटायचा पण स्वत: दम भरल्यावर मात्र अगदीच अपेक्षाभंग झाला. "हात्तिच्या, इतकी बेकार लागते असं माहीत असतं तर ओढलीच नसती!" असे विचार मनात आले पण तोवर सिगरेट ओढलीच होती. खरं तर दुसरी सिगरेट ओढायचं कारण नव्हतं (कारण पहिल्या सिगरेटचे झुरके काही आवडले नव्हते). पण आमच्या वयात त्यावेळी सिगरेट ओढणे म्हणजे एक मर्दाना ष्टाईल समजली जायची. त्यावेळचे जवळ-जवळ सगळेच हिरो ऐटीत सिगरेट ओढायचे. त्यामुळे दुसरी, त्यानंतर तिसरी असं करत-ओढायला हळू-हळू सिगरेट ओढायची आवड निर्माण होऊ लागली.(हे पनामा-प्रेम-प्रकरण नंतर दहा एक वर्षें चाललं. सध्याची काहीच कल्पना नाही, आता कदाचित तो ब्रँड नामशेषही झाला असेल. पण महिना ३००-५०० पगार असताना साठ पैशाला वीस सिगरेटचं पॅक या भावात मिळणारी ’पनामा’च परवडायची व "चार मिनार" आणखी स्वस्त असली तरी तिचा वास आवडायचा नाही म्हणून शेवटी 'पनामा'च एकदम प्यारी झाली होती!)पण खिसा खाली असल्यामुळे त्यावेळी सिगरेट क्वचित ओढायचो. क्वचित म्हणजे रविवारी हॉस्टेलची दुपारची ’फीस्ट’ झाल्यावर वगैरे. मेटॅलर्जीला असताना पहिल्यांदाच सिगरेटची ’किक’ काय असते ते अनुभवले. मग मात्र "स्वर्ग मेल्याविना दावी तयाला व्यसन म्हणतात" या गाण्यात सांगितल्याप्रमाणे सिगरेट्च्या त्या ’किक’साठी ती ओढावीशी वाटू लागली.बी. ई. मेकॅनिकल व बी. ई. मेटॅलर्जी आटोपून मग ’मुकुंद’ कंपनीत ३२५रु. महिना या पगारावर मी पाट्या टाकायला सुरुवात केली. खिशात ३०० का होईनात, पण पैसे खुळखुळायला लागले व मग ’पनामा’चं पाकीट बाळगायला सुरुवात झाली! राहायचो हिंदू कॉलनीत माझ्या आत्याकडे. त्यामुळे घरी सिगरेट ओढायची टाप नव्हती (तौबा-तौबा) पण घराबाहेर पडलो की धुराडं सुरू व्हायचं. आत्याला नक्कीच वास आला असेल, पण ती सुज्ञपणे कधी काही बोलली नाही.स्वत:च्या पैशाने सिगरेट ओढायला सुरुवात केल्यावर रोज २-३ सिगरेटपासून रोज १० सिगरेटचा टप्पा कधी गाठला ते कळलेच नाही.त्यानंतर ६५चे भारत-पाकिस्तान युद्ध सुरू झाले व आम्हाला (ब्रह्मचारी असल्यामुळे) मुकुंदच्या व्यवस्थापनाने कळव्याच्या कॉलनीत राहायला जायची (प्रेमळ) आज्ञा केली व मी व इतर तीन माझ्यासारखे ब्रह्मचारी असे आम्ही एकूण चार ब्रह्मचारी कळव्याच्या "मुकुंद कॉलनी"त 'डेरेदाखल' झालो.कॉलनीत इतर कुणी चिटपाखरूही नव्हतं. फक्त ड्यूटीवरील चौकीदार व आम्ही. त्यात आम्हाला गस्त घालण्यासाठी धूमकेतूसारखे वेळी-अवेळी जायला सांगण्यात आले होते. कधी रात्री १२ वा. तर कधी ३ वाजता, कधी ४ वाजता! म्हणजे कुठलाही एक ढाचा नसलेले वेळापत्रक ठेवायला लागायचे. नेहमी कुठला तरी चौकीदार झोपलेला मिळायचाच, त्यातला एक गोप-बहादूर हा चौकीदार खूपदा झोपलेला मिळाल्यावर त्याचे झोप-बहादूर असे नामकरणही आम्ही केले.कंपनीनं प्रत्येकाला वैयक्तिक खोली व चौघात मिळून एक आचारी व एक वरकाम्या नोकर ठेवला होता. त्यामुळे कधी स्वयंपाक करण्याची वेळ आली नाही ना कपडे धुण्याची. दिवसभर प्रोजेक्टची (इरेक्शन-कमिशनिंगची) ड्यूटी, आरामात मिळणारं जेवण व रात्री-अपरात्री मारलेल्या फेर्या असं जिप्सी टाइप जीवन आणि चार ब्रह्मचारी मग काय विचारता? पनामाचं रोज एक पाकीट कधी संपायला लागलं ते कळलंच नाही! मग मात्र पुढची वीसेक वर्षं रोज वीस सिगरेटचा ’रतीब’ सुरू झाला. पगार वाढला तसा सिगरेट्चा ब्रँड बदलत गेला. पनामा जाऊन कॅप्स्टन, मग गोल्डफ्लेक, मग विल्स फिल्टर अशी प्रगती होत गेली, पण रोजचा वीस सिगरेटचा रतीब मात्र बदलला नाही.मग लग्न झालं. सौ.ला माझ्या सिगरेट ओढण्याबद्दल मुळीच तक्रार नव्हती. त्यामुळे प्रेमळ आग्रहाखातर सुटायची तशीही सिगरेट सुटली नाही व रतीब चालूच राहिला.१९६४ साली "surgeon-general has determined that smoking is injurious to health" असं अमेरिकन सिगरेट्च्या पाकिटावर लिहिलं जाऊ लागलं व पाठोपाठ त्याच सुमाराला "सिगरेट ओढणे आरोग्याला हानिकारक आहे" असा प्रचार सुरू झाला. तो प्रचार पटायचा पण "आज ओढू दे, उद्यापासून सोडू" असं करत आम्ही तो दिवस पुढं ढकलायचो. मी किंवा माझ्या मित्रांनी सिगरेट सोडायचा निर्णय कधीच गांभीर्याने मनावर घेतला नाही. पुढे मुलं झाली. पण तब्येत ठणठणीत होती म्हणून असेल पण सिगरेट सोडावी असं कधी मनानं घेतलंच नाही.दोनदा 'झटका आल्या'मुळं म्हणा, पण तीन-तीन वर्षं अशी दोनदा मी सिगरेट सोडलीही. त्या वेळी सिगरेट फक्त परदेशवारीतच ओढायचो. सुरुवातीला परदेशी ओढायला सुरुवात केलेलं धूम्रपान मी परत आल्यावर इमिग्रेशनचं डेस्क केल्याबरोबर थांबत असे. मी लगेच तिथंच पाकीट फेकून देत असे व आणलेली ड्यूटी-फ्री पाकिटं मित्रांत वाटत असे. पण हळू-हळू "एवढं पाकीट संपवून मग सोडायची" वरून "एवढं कार्टन संपवून मग सोडायची" करता-करता धूम्रपान चालूच राहू लागलं.या दरम्यान मी इंडोनेशियातील दुसर्या क्रमांकाचं शहर असलेल्या 'सुरबाया'ला नोकरीसाठी आलो. त्याचा एकच फरक झाला की विल्स जाऊन ’555’ हा ब्रॅन्ड हाती आला. पुढे ’क्रेटेक’ सिगरेटही (लवंगेचा वास असलेली "बेंटुल बीरू-निळी बेंटुल") आवडू लागली, पण "वीस-एक्के-वीस"चा पाढा काही बदलला नाही.पण त्यासुमारास एक नवी समस्या माझ्यापुढे उभी राहिली. ती म्हणजे आमची वाढत असलेली मुलं व त्यांचं शालेय 'सामान्य ज्ञाना'चं शिक्षण.या सुमाराला माझा मोठा मुलगा १२ वर्षाचा व मुलगी ७ वर्षाची होती. त्यांना शाळेत सिगरेट ओढण्याचे गैरफायदे शिकवले जाऊ लागले. 'बाबा, सिगरेट ओढू नका, आजारी पडाल'ने सुरू झालेली गाडी 'आम्हाला अनाथ कराल बरं का'पर्यंत आली. मग मात्र 'आता सिगरेट सोडायचीच' असा निर्धार होऊ लागला. पण ती सुटता सुटे ना!असं म्हणतात की सिगरेट सोडायची असेल तर एकच यशस्वी मार्ग आहे. तो म्हणजे ती ओढायला सुरुवातच न करणे. तो मार्ग तर आम्ही केव्हाच ओलांडला असल्यामुळे आम्हाला उपलब्ध नव्हता. मग काय करायचे? असे करता-करता आम्ही ८७-८८च्या सुमारास त्रिनिदादला कंपनीच्या कामासाठी पोचलो. तिथे माझ्या मुलीने बंड केले. 'बाबा, तुमच्या अंगाला सिगरेटचा वास येतो म्हणून मी तुम्हाला पापी देणार नाही' हा निर्वाणीचा इशारा देऊन ती मोकळी झाली व मला खूप वाईट वाटले. सुरबायाला गेलो की सोडीन असं सांगून तात्पुरती वेळ मारून नेली. शेवटी १९८९च्या १४ नोव्हेंबरला इंडोनेशियाला 'राम-राम' ठोकून मी परत येत असताना वाटेत सिंगापूरला transit मध्ये असताना मला काय वाटले कुणास ठाऊक. मी तिथेच सिंगापूरच्या transit loungeमध्ये जी सिगरेट सोडली ती आजतागायत! खरं त्यावेळी धमकी किंवा प्रेमळ बंड वगैरे कसलाही प्रयोग माझ्या मुलांकडून झाला नाही. पण माझ्याच मनानं घेतलं की बस झालं आता. सोडा सिगरेट.एकदा सोडल्यावर पहिले ७-८ महिने खूप त्रास झाला. अशा वेळी मी काहीतरी चघळायला ठेवत असे. यासाठी आवळकाठी या प्रकारची आवळ्याची सुपारी बरीच उपयोगी पडली. आधीच धूम्रपानाच्या रूपाने तंबाखूची धास्ती घेतलेली असल्यामुळे धूम्रपान सोडण्यासाठी म्हणून मी तंबाखू खायला मात्र कधीही सुरुवात केली नाही. माझे असे काही मित्र आहेत की त्यांनी हा मार्ग चो़खाळला व परिणामतः आता ते दोन्हींच्या व्यसनात गुंतले आहेत.१४ नोव्हेंबरला सोडलेल्या सिगरेटने त्यानंतर आलेल्या ३१ डिसेंबरच्या नूतन वर्षाच्या स्वागतासाठीच्या पार्टीत परत मला मोहाची मिठी जवळ-जवळ मारलीच होती. पण निग्रहाने मी तो मोहाचा विळखा तिला माझ्याभोवती आवळू दिला नाही.त्या संक्रमणकाळात आजूबाजूला कुणी सिगरेट ओढत असेल तर मात्र खूप जळफळायला व्हायचं, पण स्वनिश्चयाच्या बळावर मी सिगरेटपासून सोवळा राहिलो.शेवटी सहा-एक महिन्यानंतर मात्र माझ्या जवळपास कुणी सिगरेट ओढत असल्यास त्याचा त्रास व्हायला लागला. मग मला जरासे हुश्श झाले.आजही मला खात्री आहे की मी एक सिगरेट एकदा जरी ओढली की मी पुन्हा 'वीस सिगरेट रोज'च्या रतीबाला पोचेन. तेव्हा ती पहिली सिगरेट कुठल्याही परिस्थितीत ओढायची नाही ही खूणगाठ मनाशी पक्की घातली आहे!आज १४ नोव्हेंबर २००९. काल सिगरेट सोडून वीस वर्षें झाली व मी धूम्रपानमुक्त अशा २१व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. मी जे केले (तब्येतीला कांहींही 'धाड' झालेली नसताना) याचा अभिमान तर आहेच पण काही लोक सिगरेट ओढताना पाहून वाईट वाटते व त्यांना मदत करावीशी वाटते. तशी मदत मी त्यांना देऊही करतो, पण जसा मी स्वत:च्या आत्मनिश्चयामुळे यशस्वी झालो तसं त्याच्याही बाबतीत व्हायला हवं हे मनात येतं व मी त्यांना सांगतो मी यात यशस्वी झालोय. तुम्ही जेव्हा निर्णय घ्याल व त्यावेळी जर माझ्या अनुभवाचा उपयोग होईल असं तुम्हाला वाटलं तर मला सांगा, मी जरूर माझा अनुभव तुमच्या उपयोगी पडेल अशा तर्हेने तुम्हाला सांगेन. अगदी फुक्कट!
लेखक:सुधीर काळे
Print Page
लेखक:सुधीर काळे
८ टिप्पण्या:
'बाबा, तुमच्या अंगाला सिगरेटचा वास येतो म्हणून मी तुम्हाला पापी देणार नाही' हा निर्वाणीचा इशारा >>
खरोखरीच जिव्हारी लागला असावा! एरव्ही हे व्यसन सुटणे कठीण. दुर्दम ओढीचे व्यसन, निश्चयाच्या बळावर सोडले आणि ते पुन्हा परत फिरले नाही ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. व्यसनमुक्तीच्या प्रयासकर्त्यांना तर हे एक तळपते उदाहरण आहे.
तुम्हाला यामुळे भावी आरोग्याचे वरदान तर मिळालेलेच आहे. माझ्याही तुम्हाला आरोग्यपूर्ण दीर्घायुष्याकरता हार्दिक शुभेच्छा!
सुधीरराव, अगदी माहितीपूर्ण लेख आहे. आवडला.
सिगरेट सोडण्यावरचा लेखही फार आवडला बरं का. तुमचे जबसे तेरे नैना ऐकतो आहे. मस्तच!
तुम्ही धुम्रपान सोडल्याबद्दल मी तर तुमचं अभिनंदनच करीन.
मला तर सिगरेट या वस्तूचाच इतका मनोगंड आहे की टी.व्ही. वरील एखाद्या दृश्यातही मी जर कुणाला धुम्रपान करताना पाहिलं तर जवळच कुणीतरी धुम्रपान करतंय की काय, असा भास होतो.
फार वर्षांपूर्वी एकदा सिगरेट प्यायल्यावर कसं वाटतं, हे पहाण्यासाठी मी सिगरेट ओढण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या वेळेस धुर आत गेला आणि ठसक्याबरोबर बाहेर आला. सिगारेट तर तिथल्यातिथेच टाकून दिली पण दोन दिवस जो काही आवाज बसला होता, त्याने सर्वांची करमणूक झाली. आता आपलं बोलणं कळावं म्हणून संकेत भाषा शिकावी की काय, इथपर्यंत मी विचार केला होता.
धूम्रत्यागाबद्दल अभिनंदन. passive smoking बद्दल लिहिलें असतें तर जास्त आवडलें असतें.
सुधीर कांदळकर
सुदैवाने आज पुरुष मडळींत धूम्रपान खूपच कमी झाले आहे. अमेरिकेच्या सर्जन-जनरलने १९६४ साली दिलेल्या ताकिदीला २५ वर्षे झाल्याच्या निमित्ताने "टाईम (TIME)" या नियतकालिकाने एक सर्वेक्षणपर (survey) लेख प्रसिद्ध केला होता त्यात लिहिले होते कीं जितक्या प्रमाणात पुरुषांनी धूम्रपान सोडले तितक्याच प्रमाणात स्त्रियांनी धूम्रपान सुरू केले. पण सुदैवाने भारतात तरी सध्या अशी परिस्थिती आढळून येत नाहीं व ही परिस्थिती अशीच राहो हीच देवाकडे प्रार्थना.
सुधीर काळे (मूळ लेखक)
काळे साहेब,मला श्री प्रमोद देव साहेबांनी आपल्या ह्या लेखाची लिंक दिली. त्या बद्दल मी त्यांचा आभारी आहे. मी खूप वर्षापासून प्रयत्न करीत आहे सोडायचा पण होत नाही. आता मात्र नक्की सोडेन.
खुप छान आहे तुमचा अनुभव/जिद्द
त्यामुळे मी पण सिगरेट सोडु शकतो हे माझ मण मला सांगत आहे.
टिप्पणी पोस्ट करा