मनीषा भिडे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मनीषा भिडे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १ डिसेंबर, २००९

प्रवास





क्षणाक्षणाला उसळणारी
वादळे, तप्त ... अनावर |
लखलखत्या किरणांची
रोखलेली तेग तनामनावर |

निरव, निर्मम, निष्प्राण सृष्टी
आणि
प्रखर प्रकाशात अंध दृष्टी |

उठणार्‍या‍ दाहक वावटळीत
नाहीशा होत जाणार्‍या वाटा |
डोळ्यांसमोर हेलावणार्‍या
नकोशा सोनेरी लाटा |

तो जळता अंधार ....
नको - नकोसा वाटतो |
धगधगता अग्नी
पावलांना जाळतो |

पण तरीही ...
थांबता येत नाही |
कारण परतीचा मार्ग
कधीचाच पुसलेला असतो !

त्या भयाण काहीलीत
मग जाणवते
अस्पष्ट, अंधूक
दूर कुठे असलेली
मृगजळाची रेघ |

अप्राप्य... तरीही ओढ लावणारी |

दाखवते सुखस्वप्ने
उन्हामधे चमचमणारी |

असेल तिथे कदाचित
कोवळी, सुखकर हिरवळ
मधुर फळं , फुलांचा दरवळ |
शुभ्र पाण्याची खळखळ
आणि,
तरुं-वेलींची सुखद सळसळ |

मग मिळेलही तिथे , गारवा
मऊ , रेशमी आणि नितळ |

आसावलेल्या तनामनात
जागते अनाकलनीय आशा |
उग्र-प्रकाशी अंधारलेल्या दृष्टीला
खूणावतो रसरसता रंग हिरवा |

मग कल्पनेतला तो गारवा
लपेटून स्वतः भवती अलवार |
सुखावते तन मन
उमलतो सुखाचा हुंकार |

अभिलाषेने त्या मृगजळाच्या
मग पुन्हा ..
उचलले जाते पाऊल
आणि त्या तप्त वादळावर
नाहीशा होणार्‍या खूणा उमटवित
चालूच राहतो प्रवास
अनंत काळाचा |

कवयित्री: मनीषा भिडे
Print Page