कै. गीता जोगदंड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कै. गीता जोगदंड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १ डिसेंबर, २००९

दावे


टेबल आणि खुर्चीने दावे लावलेत माझ्यावर
मातोश्रींच्या कोर्टापुढे व्हायचंय मला उद्या हजर ॥

शाबीत झाले गुन्हे तर शिक्षा होते फार मोठी
न्यायाधीशाची शिक्षा म्हणजे पाठीत बसते जोरात काठी ॥

खरं म्हणजे, त्यांनी सुद्धा तक्रार केली अनेकदा
त्यांच्याकडे हसून, मीच दुर्लक्ष केले कित्येकदा ॥

टेबल म्हणे, " डोके टेकून झोपतो माझ्या अंगावर "
दिवा तस्साच जळत असतो खोळंबून भिंतीवर ॥

अभ्यासाला कंटाळल्यावर मुठी आपटतो माझ्यावर
सगळा राग अभ्यासाचा उगाच काढतो पुस्तकावर ॥

रागाच्या भरात हा फाडून टाकतो वह्यांची पाने
गदागदा हालवून मला खिळखिळे केले याने ॥

तुटलेला हात दाखवीत खुर्ची रडत म्हणाली,
" हातावर बसून बसून माझी याने दैना केली " ॥

दोनच पायावर उभे केले मला कित्येकदा याने
अंग नाही कद्धी पुसले माखलेले धुळीने ॥

कद्धी नाही घातली माझ्या अंगावरती झूल
नाही ठेवले टेबलावरती कद्धी सुंदर फुल ॥

आमचा अस्सा छळ करून, अभ्यास याने केलाच नाही
शिक्षा ह्याला व्हायलाच पाहिजे, त्या शिवाय इलाज नाही ॥

आता मात्र माझी, चांगलीच गाळण उडाली
रागीट मुद्रा आईची समोर दिसू लागली ॥

ठरवून टाकले मनाशी, नको रे बाबा मार खाणे
अभ्यास पूर्ण केल्याशिवाय नाही आता झोप घेणे ॥

टेबल खुर्चीला दावे आता काढून टाकण्यास विनवतो
पहिला नंबर मिळवण्याच्या तयारीलाच लागतो ॥

कवयित्री: कै. गीता गोपाळ जोगदंड

श्री.विनायक रानडे ह्यांची मोठी बहीण कै.गीता गोपाळ जोगदंड ह्यांनी केलेल्या कवितांचा शब्दवैभव हा काव्य संग्रह १९९९ मध्ये प्रकाशित झाला होता, त्यातील हे एक छानसे बालगीत.
Print Page