शनिवार, ५ डिसेंबर, २००९

संपादकीय!

दिवाळी वर्षातनं एकदाच येते आणि त्यासोबत येत असतो दिवाळी अंक.... मराठी मनाच्या अगदी जिव्हाळ्याचा असा हा विषय आहे. छापील दिवाळी अंकांबरोबर आता तितक्याच तोडीचे महाजालीय दिवाळी अंक देखिल निर्माण होत आहेत. महाजालाच्या इतिहासात डोकावून पाहिले तर बहुदा ’मायबोली’ ह्या संकेतस्थळाचा दिवाळी अंक हा सर्वप्रथम दिवाळी अंक ठरावा. त्यानंतर मग हळूहळू मनोगत,उपक्रम सारख्या संकेतस्थळांनीही ही परंपरा पुढे वाढवली. आता तर बहुसंख्य नामांकित वृत्तपत्रांचेही महाजालीय दिवाळी अंक निघायला लागलेत.

त्याच धर्तीवर आम्ही घेऊन येत आहोत...हिवाळी अंक. ही एक अभिनव कल्पना आहे आणि बहुधा मराठी साहित्याच्या जगतात हा पहिलाच अंक ठरावा असा अंदाज आहे. हिवाळ्यात प्रकाशित करत आहोत म्हणून आणि दिवाळी शब्दाशी यमक जुळतंय म्हणून...अशा दोन्ही अर्थाने हा प्रकार आम्ही निश्चित केलाय. आता अंक म्हटला की त्याला नाव हे हवेच..त्या न्यायाने "शब्दगाऽऽरवा" हे नाव आम्ही ह्या अंकासाठी योजलेले आहे.(अर्थात त्यानंतर तुम्ही वाचक देखिल ’नावं’ ठेवायला मोकळे आहात म्हणा! ;) ) ह्या शब्दाचा सरळ असा अर्थ कुणालाही कळण्यासारखा आहे. मात्र त्यातला लपलेला अर्थ असा आहे.... ह्या अंकातील ’शब्द’ वाचून वाचक ’गाऽऽर’ पडेल आणि मग उस्फुर्तपणे म्हणेल ’वा!’ :D

आमचे मित्र प्रशांत मनोहर ह्यांनी "शब्दगाऽऽरवा" चे नेमके केलेले वर्णन ह्या खालील ’हायकू’मध्ये वाचा.
हिवाळी अंक
पानोपानी साठला
शब्दगाऽऽरवा ॥

हा आमचा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे साहित्यिकांकडून अपेक्षित असा मर्यादित प्रतिसाद मिळालाय. पण आम्हाला खात्री आहे की पुढील वर्षी अजून जास्त संख्येने लोक ह्यात सामील होतील. आम्हाला अशीही खात्री आहे की ह्या अंकातील बहुविध साहित्यकृती आपल्याला निश्चितपणे वाचनानंद देतील.

तेव्हा आता तुम्ही वाचा आणि सांगा कसा वाटतोय आमचा अंक!!!


कळावे,लोभ असू द्यावा.
आपला स्नेहांकित

प्रमोद देव

Print Page