सुधीर काळे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सुधीर काळे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १ डिसेंबर, २००९

मुशर्रफ युगाचा शेवट

२००७ साल उजाडले आणि हळू-हळू ज. मुशर्रफ़ अमेरिकेच्या गळ्यातले एक लोढणे बनू लागले होते कारण इस्लामी अतिरेक्यांशी लढण्याऐवजी व लोकशाही आणण्याबद्दलच्या आधीच्या "शेंडी तुटो वा पारंबी तुटो, मी पाकिस्तानात लोकशाही आणणारच, कारण मी लोकशाहीचा खंदा पुरस्कर्ता आहे" अशा राणा भीमदेवी गर्जनांसह दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याऐवजी मुशर्रफ़ यांनी हुकुमशाही सातत्याने राबवत ठेवली होती व त्यानुसार चाललेला त्यांचा बेमुर्वतपणाही वाढला होता. त्यामुळे सर्व पाकिस्तानी जनता चिथावली-डिवचली गेली होती व तिथे हिंसेचा डोंब उसळून या अण्वस्त्रसज्ज राष्ट्रात कमालीचे अस्थिर वातावरण निर्माण झाले होते. जुलै २००७ मध्ये लाल मस्जिद प्रकरण झाल्यानंतर तर हा क्षोभ आवरण्याच्या पलीकडे गेला!
 
मियाँ मुशर्रफच्या दृष्टीने हा अगदी कसोटीचा काळ होता. पाकिस्तानच्या न्यायसंस्थेने नेहमीच लष्करशहांच्या बाजूने न्याय दिला होता व हेतुपुरस्सरपणे अशा लष्करशहांच्या उद्योगांना/कारवायांना कायदेशीर चौकट प्रदान केली होती असे पाकिस्तानचा इतिहास सांगतो. पण मुशर्रफच्या कसोटीच्या काळात परिस्थिती जराशी बदलली होती कारण पाकिस्तानी लष्करावर चोरी, भ्रष्टाचार, निवडणुकीत मुद्दाम केलेले गैरव्यवहार वगैरेबद्दलचे आरोप करू शकणारा एक नवा व स्वतंत्र आवाज उदयास आला होता.


या स्वतंत्र आवाजाने लष्करी हुकुमशाहीला एक आव्हान दिले होते व त्याची परिणती न्यायमूर्ती इफ्तिकार मुहम्मद चौधरी या सरन्यायाधीशांच्या तडका-फडकी केलेल्या उचलबांगडीत झाली होती. एरवी दोन पक्षातल्या भांडणांचा फायदा घेऊन व त्यातून उद्भवलेले खटले चालवून त्यातून वसूल केलेल्या भरपूर बिदागीवर छानछोकीत रहाणार्‍या वकीलवर्गाने या वेळी सर्व राज्यांच्या राजधान्यांत खूप उग्र निदर्शनें करून जनजीवन पार विस्कळित करून टाकले होते. इतरत्र काश्मीरच्या व अफगाणिस्तानच्या लढाईत भाग घेऊन तावून-सुखावून बाहेर पडलेल्या मुस्लिम उग्रवादी संघटनांनी व गटांनी ही संधी साधून मुशर्रफ यांच्यावर जबरदस्त दडपण आणले. एका बाजूने खासगीत जिहादी गटांची प्रशंसा करायची व दुसर्‍या बाजूने अमेरिकेच्या बाजूने युद्धात उतरून त्यांच्या ध्येयांचा घात करायचा असे प्रकार केल्याबद्दल पाकिस्तानी लष्कराशी व गुप्तहेरखात्याशी जवळीक असलेल्या कांहीं गटांनी लष्करशहांवर दुटप्पीपणाचे आरोपही केले. अमेरिकेच्या दृष्टीने सगळ्यात काळजीची गोष्ट ही होती कीं तालीबान ही संघटनाही नव्याने नुसती उभी राहिली होती असेच नाही तर ती चांगली बोकाळली होती व वजीरिस्तानात व वायव्य सरहद्द प्रांतात त्यांनी खोलवर उभ्या केलेल्या नव्या तळांचा वापर करून त्यांचे गैरसरकारी सैनिक (militia) ’नाटो’ फौजांवर उग्र हल्ले करू लागले होते. त्यात अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांना डावलून ते त्यांचा पगडा सरहद्दीपलीकडील पाकिस्तानात वाढविण्यात गुंतले होते. अशा तर्‍हेने १९९९ साली ’कुदेता’द्वारा सत्तेवर आल्यापासूनचा इतिहास पहाता त्यांचा दरारा आता झाला होता इतका कमजोर या ८ वर्षांत कधीच झाला नव्हता. पक्षीय राजकारण तर नाजूक होतेच. तरीही २००७ साली व्हाईट हाऊसने (वेळेच्या अभावी व एकाद्या अस्सल व टिकाऊ तोडग्याआभावी) अमेरिकेच्या सर्व विदेशनीतिज्ञांनी व सर्वपक्षीय "आंतरराष्ट्रीय पेचप्रसंग समिती"च्या (International Crisis Group) सभासदांनी एकमताने पाकिस्तानच्या अस्थिरतेचे मूलभूत कारण म्हणून "गौरविलेल्या" मुशर्रफसारख्या नालायक राज्यकर्त्याला कायदेशीर दर्जा प्रदान करून त्याला वाचवले व वरवरची मलमपट्टी करण्याचा निर्णय घेतला व आगीत तेलच ओतले.मुशर्रफ यांनी लष्करी गणवेश उतरवायचा आणि एक बिनलष्करी (मुलकी) नागरिक या नात्याने राष्ट्रपतीपद भूषवायचे आणि मग मग सार्वत्रिक निवडणुका घ्यायच्या अशा एका "सुवर्णमध्य" सौद्याचा पाठपुरावा उपपरराष्ट्रमंत्री रिचर्ड बाऊचर यानी सुरू केला.



जरी १९९० नंतरच्या दशकात त्या दोनदा पंतप्रधानपदी असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झालेले असले तरी पाश्चात्य देशात शिकलेल्या व पाश्चात्य विचारसरणीशी जवळीक असलेल्या, कांहींशी धर्मनिरपेक्ष विचारसरणी असलेल्या व मुख्य म्हणजे पाकिस्तानात अद्यापही खूप लोकप्रिय असलेल्या बेनझीर भुत्तो यांना "वासरात लंगडी गाय शहणी" या नात्याने निवडणुकी नंतरच्या सरकारात पंतप्रधान म्हणून निवडावे असा बाऊचर यांचा प्रस्ताव होता.
पण या "मुशर्रफ बचाओ" योजनेच्या मार्गात लक्षणीय अडचणी होत्या. कारण मुशर्रफ यांना बेनझीरबद्दल तर बेनझीरला मुशर्रफबद्दल पूर्ण तिरस्कार होता. आणि हा तिरस्कार इतक्या पुढच्या पायरीवर गेला होता कीं या दोघात तडजोड घडवून आणण्यासाठी अबू धाबीत गुप्ततेत आयोजलेली आणि समोरासमोर झालेली भेट अतीशय भावनाप्रधान ढाच्यात झाली.
दोघांच्यात मतभेदांची एक दरीच पसरली होती व ती ओलांडणे सोपे नव्हते. बेनझीरबाई लंडनहून रात्रभर प्रवास करून अबू धाबीला पहाटे पोचल्या होत्या. जरी दमल्या असल्या तरीही त्या मद्यपान करत नसल्यामुळे तशा तरतरीत होत्या. याउलट त्या बैठकीत मुशर्रफ़ इतके दारूच्या नशेत होते कीं त्यांना सुसंगतपणे बोलायला अडचण येत होती असे बेनझीरबाईंच्या सहप्रवाशाने सांगितले. . त्यांनी अशा भेटीसाठी अबूधाबीसारख्या जागेची निवड केल्याबद्दल नाराजी दर्शविली कारण जिथे लाखोंनी पाकिस्तानी लोक नोकरीसाठी आले आहेत अशा कुणीही त्यांना ओळखले असते तर या गुप्ततेतील हवाच निघून गेली असती. याला मुशर्रफ यानी काय उत्तर द्यावे? "तुम्ही बुरखा का नाहीं वापरला?" असा मूर्ख प्रतिप्रश्न मुशर्रफ़ यांनी केल्यावर मैत्रीचा उरला-सुरला धागाही ताणला गेला.
बरेच महिने ही चर्चासत्रे चालू राहिली. या दरम्यान पाकिस्तानातील अंतर्गत परिस्थिती आणखीच चिघळत चालली व शेवटी सप्टेंबर २००७ मध्ये दुसर्‍या भेटीनंतर एक तात्पुरता करार करण्यात यश आले. त्यानुसार मुशर्रफ आपले लष्करी पद सोडून एक साधे (बिनलष्करी) नागरिक म्हणून राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवतील व भुत्तो कुटुंबियांविरुद्धचे सर्व फौजदारी आरोप मागे घेतील आणि त्याच्या मोबदल्यात अण्वस्त्रांचे खाते, परराष्ट्रनीती, देशांतर्गत व बाह्य सुरक्षा आणि वार्षिक अर्थसंकल्पातील वरील खात्यांच्या तरतुदी लष्कराकडेच ठेवायला बेनझीरबाई तयार झाल्या. आधी पंतप्रधानपदी असतानाचा लष्कराकडून पूर्वी झालेल्या अपमानाचा व पदच्युतीचा पूर्वीचा कटु अनुभव बाजूला ठेऊन बेनझीरबाई पाकिस्तानच्या भवितव्यासाठी या कराराला तयार झाल्या.


पण सौदी अरेबियात हद्दपारीची शिक्षा भोगणारे व मुशर्रफकडून कुदेताद्वारे पदच्युत झालेले आणखी एक पूर्व पंतप्रधान नवाज शरीफ यांचा मनसुबा कांहीं वेगळाच होता. याच सुमारास त्यांनी पाकिस्तानला परतून "पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज" या पक्षाचे नेतृत्व स्वीकारण्याचा मनसुबा जाहीर केला. "मुशर्रफ याना घालवलेच पाहिजे. ते आता संपलेच आहेत" असे त्यांनी त्यांच्या लंडन येथील सदनिकेत जमलेल्या त्यांच्या पुरस्कर्त्यांना सांगितले.
बेनझीरबाईंच्या पाकिस्तानभेटीची पूर्ण आखणी करायच्या दृष्टीने बाऊचर यांच्या दुबई (बेनझीरबाईंशी बोलायला-त्या आता दुबईत हद्दपार म्हणुन रहात होत्या) व इस्लामाबाद (मुशर्रफ यांच्याशी बोलायला) अशा वार्‍या चालू होत्या. तेवढ्यात १० सप्टेंबर रोजी माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकिस्तानला जाण्यासाठी लंडनच्या हीथरो विमानतळावरून प्रयाण केले. त्यांच्या एकनिष्ठ अनुयायांनी इस्लामाबाद येथे त्यांच्या वीरोचित आणि भव्य स्वागताची तयारी केली होती, पण ते एक दिवास्वप्नच ठरले. आपल्या समर्थकांना भेटण्याची संधीही त्यांना न देता या माजी पंतप्रधानांना पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेने इस्लामाबाद विमानतळावरच अटक केली व कांहीं तासातच त्यांची पुन्हा सौदी अरेबियाला रवानगी केली.
आता बेनझीरबाईंना जलद पावले उचलणे जरूरीचे होते. "जन्माची वेळ व मृत्यूची वेळ विधिलिखितच असते व कुणीच त्या विधिलिखितात लिहिलेल्या वेळेच्या आधी मरत नाहीं." असे भुत्तोबाई बर्‍याचदा आढ्यतेखोरपणे म्हणत. "पाकिस्तानचे राजकारण आम्हा भुत्तोंच्या रक्तात खोलवर भिनलेले आहे तसेच ते माझ्याही रक्तात सतत दौडत आहे." असे सांगून १८ ऑक्टोबर २००७ रोजी बेनझीरबाई कराची विमानतळावर उतरल्या. सारे विमानतळ व बेनझीरबाईंना व त्यांच्या बरोबरच्या पाकिस्तान पीपल्स् पार्टीच्या नेत्यांना व पत्रकारांना नेणासाठी आयोजलेल्या बसला लाखोंचा गराडा पडला. त्यातले बरेचसे PPP चे अनुयायी होते, पण ’गंमत पहायला’ म्हणून आजूबाजूच्या सोसायट्यांमधून आलेले लोकही होते. लष्करी राजवटीच्या वरवंट्याखाली संथ-सुस्त व भविष्याबद्दल भयग्रस्त असलेल्या पाकिस्तानी जनतेत भुत्तोबाईंच्या आगमनाने एक उत्साहाची व अपे़क्षेची लाट उसळली होती. अफाट जनसमुदाय व त्याचा अनोख उत्साह पाहून "बेनझीरला कोण विचारतोय्. ती एक संपलेली शक्ती आहे" असे अनुदार व कुत्सित उद्गार त्यांच्या आधीच्या भेटींत मुद्दाम काढणार्‍या मुशर्रफना एक धक्काच बसला होता.
बेनझीरबाईंची ही रथयात्रा व संचलन ८ तास चालल्यावर एक धमाका, पाठोपाठ एक लखलखाट व नंतर एक प्रचंड स्फोट झाला! बेनझीरबाईंच्या या आनंदयात्रेत एकच गोंधळ माजला व घबराट उडाली. पहावे तिकडे रक्त आणि प्रेते विखुरलेली दिसत होती. दोन आत्मघाती अतिरेक्यांनी या आनंदयात्रेवर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात १४० लोक मृत्युमुखी पडले व ४० जखमी झाले व बेनझीरबाई थोडक्यात वाचल्या होत्या. बेनझीरबाईंनी लगेच पाकिस्तानी गुप्तहेरखात्यावर हा हल्ला योजल्याचा आरोप केला. पाठोपाठ तर गुप्तहेरखात्याने बेनझीरबाईंवर प्रत्यारोप केला कीं त्यांनी स्वत:चे राजकीय महत्व वाढवण्यासाठी मुद्दाम हा हल्ला घडवून आणला! बेनझीरबाईंनी आपल्या व्युहरचना पुन्हा एकदा जोखल्या व त्यात बाऊचर यांच्या पुढाकाराने केलेल्या व उभयपक्षी मान्य असलेल्या अटींना त्यांनी केराची टोपली दाखवली.
मुशर्रफ यांनी नुकतीच जिंकलेली राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी लष्करातून निवृत्ती घ्यायच्या आधीच लढवली होती व हे कृत्य संविधानाच्या अटीविरुद्ध आहे म्हणून त्यांची ही निवडणूक अवैध ठरवायची हिंमत सर्वोच्च न्यायालयाने दाखवली त्या पाठोपाठ परिस्थितीची पहाणी करण्यासाठी थांबलेल्या वकीलांच्या संघटनेने त्यांची चळवळ पुन्हा सुरू केली.
मुशर्रफ भडकले. "पाकिस्तानी लष्कर या देशाचे तारणहार असून त्यांच्या मदतीशिवाय व हस्तक्षेपाशिवाय पाकिस्तान हा "एक देश" या नात्याने शिल्लकच रहणार नाहीं व ज्यांना हे मान्य नाहीं ते भरकटलेले लोक आहेत" असेही ते फूत्कारले. PPP व PML-N चे अनेक नेते, वकील, लोकशाहीवादी सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक व पत्रकार अशांना हजारोंनी तुरुंगात डांबण्यात आले. ३ नोव्हेंबर २००७ रोजी पाकिस्तानी शहरांत आणि गांवात सैनिक गस्त घालू लागले व सर्व मोठ्या रस्त्यांवर वहातूक मंदगती करण्यासाठी व वाहनांच्या तपासणीसाठी जागोजागी अडथळे (Roadblocks) उभारण्यात आले. एक आत्मघाती बॉम्बहल्ला लष्कराच्या रावळपिंडी छावणीत झाल्याबरोबर मुशर्रफ यांनी पाकिस्तानची राज्यघटना तात्पुरती स्थगित करून "अतिरेकी घटनांना जास्त योग्य पद्धतीने तोंड देता यावे म्हणून" आणीबाणी पुकारली.


अमेरिकी व ब्रिटिश अधिकार्‍यांचीही पाचावर धारण बसली. पण त्यांना अजीबात महत्व न देता मुशर्रफ यांनी पुन्हा एकदा "घूम-जाव" केले व ते सौदी अरेबियाला गेले. सौदी राजघराण्याच्या सदस्यांची सौजन्यभेट घेऊन ते नवाज शरीफना भेटले. मोजक्या दिवसांनंतर मुशीचा वरदहस्त डोक्यावर घेऊन नवाज पाकिस्तानला परतले. (मुशर्रफ़ किती निर्लज्ज आहे पहा! अगदी कामापुरता मामा! सप्टेंबरमध्ये ज्याने नवाजला पाकिस्तानात येऊ दिले नाहीं तो स्वत:ला गरज पडताच, स्वत:ची खुर्ची गरम झाल्यावर (hot seat) सर्व मानमर्यादा गुंडाळून त्यालाच सौदीला जाऊन भेटतो काय आणि नवाज परत पाकिस्तानात येतो काय! अगदी सोयीची शय्यासोबत!)
बेनझीरबाईंच्या मतात फूट पाडण्याचा हा डाव होता.
 
या घटनांनी मुशर्रफ जरासे धीट झाले व त्यांनी लष्करी गणवेश उतरवला व त्यांनी माजी ISI प्रमुख व अयशस्वी ठरलेल्या भुत्तो-वाटाघाटींत मुशर्रफ यांचे प्रतिनिधित्व केलेल्या ज. अश्फाक परवेज कयानी यांना लष्करप्रमुख बनविले. ८ जानेवारी ही निवडणुकीची तारीख ठरली. अटकसत्रांसारखे अत्याचार, आत्मघाती हल्ले, राजकीय पक्षांना मोठ्या सभा घ्यायची व प्रचार करायची बंदी अशी अनेक पावले टाकूनही मुशर्रफ यांची लोकप्रियता २१ टक्क्यावर आली व बेनझीर व नवाज यांची लोकप्रियता जोरात वाढली.
भुत्तो-समर्थक पार गोंधळून गेले होते. एका बाजूने त्यांना विजयाची चाहूल लागली होती तर दुसर्‍या बाजूने बेनझीरबाईंच्या जिवाची काळजी लागली होती. कारण अल्-कायदा व पाकिस्तानी गुप्तहेर संघटना या दोन्ही संघटनांमध्ये त्यांना मारू पहाणारे गट होते. एक संरक्षक तटबंदी म्हणा किंवा एक तर्‍हेचा विमा म्हणा पण बेनझीरबाईंनी त्यांचा एक अमेरिकेतला माजी विश्वासू मदतनीस मार्क झीगल यांना ई-मेल पाठवून मुशर्रफ यांच्या अधिकार्‍यांपैकी त्यांच्या जिवावर उठलेल्या लोकांची यादी पाठविली. तसेच PPP च्या नेत्यांनी अमेरिकेच्या अधिकार्‍यांसाठी व राजकीय नेत्यांसाठी एक लेख (dossier) तयार केली ज्यात भुत्तो यांच्या निवडीला सुरुंग लावण्याच्या सरकारी हालचालींची माहिती दिली होती.
२७ डिसेंबर रोजी लष्कराचा बालेकिल्ला असलेल्या व सैनिक व गुप्तहेरांनी बजबजलेल्या रावळपिंडी येथे एका सभेत भाषण करून परत येत असतांना आपला जयजयकार करणार्‍या समर्थकांचे हात हलवून आभार मानण्यासाठी बेनझीरबाईंनी गाडीच्या टपातून डोके बाहेर काढले आणि क्षणार्धात गोळीबाराचे आवाज झाले आणि बेनझीरबाई गाडीत कोसळल्या. पाठोपाठ त्यांच्या गाड्यांचा ताफा उधळून टाकण्यासाठी आत्मघाती अतिरेक्याकडून करविलेला एक मोठा स्फोटही झाला. कांहीं तासानंतर बेनझीरबाईंच्या (व त्यांच्या डझनावारी समर्थकांच्या) मृत्यूची बातमी जाहीर झाली. बेनझीरबाईंच्या हत्येचे पडसाद सर्व जगात उमटले व सर्व राष्ट्रांनी त्याची एकमुखाने निंदा केली. PPP नेत्यांनी ताबडतोब मुशर्रफला दोषी ठरविले. संतापलेले भुत्तो-समर्थक रस्त्यावर उतरले. क्षणभर असे वाटले कीं पाकिस्तान आता संपले! सरकारही घाबरले. सरकारी दावा होता कीं बेनझीरबाईंचे डोके गाडीच्या टपाच्या खिडकीवर आपटले व त्या जखमेमुळे त्यांचा मृत्यू झाला. बेनझीरबाईंच्या मृत्यूने मुशर्रफ यांच्या कारकीर्दीतील पाकिस्तान या "धोकादायक विश्वा"चा सगळ्या जगाला परिचय करून दिला. कारण या घटनेने हे दाखवून दिले कीं रावळपिंडीसारख्या लष्कराच्या बालेकिल्ल्यातही हे अतिरेकी बेगुमानपणे व निर्भयपणे कुणालाही टिपून देशात एक भीतीचा उद्रेक उभा करून देशाला पूर्णपणे अस्थिरतेच्या जबड्यात ढकलू शकतात.



त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जरदारींच्या PPP व नवाज शरीफ यांच्या PML-N मध्ये निवडणूक समझोता झाला व ते भरघोस मताधिक्याने निवडून आले. पंतप्रधानपदाचा शपथविधी चालू असताना मुशर्रफ यांच्या चेहर्‍यावरचा अस्वस्थपणा साफ दिसत होता. बुश यांनी जरी मुशर्रफ यांना "एक संपूर्णपणे भरवशाचा भिडू" या शब्दात समर्थन देणे चालूच ठेवले तरी अमेरिकेतील सर्वात मातब्बर व प्रभावी लष्करी तज्ञ श्री. कागन (Kagan) यांनी ’व्हाईट हाऊस’ने आता "पाकिस्तान हे सर्वसंहारक अशा भावी प्रलयाची जननी आहे" अशा पेंटॅगॉनच्या अधिकार्‍याच्या मताकडे जास्त गंभीरपणे पहावे असा सल्ला दिला. पाकिस्तानच्या सेनेतील धर्मांध गट जास्त-जास्त बळकट होत असून या गटाने जर अचानक सीमांपासून निघून जायचे ठरविले तर जी पोकळी निर्माण होईल ती मूलगामी/कर्मठ लोकांकडूनच व्यापली जाईल. अतिरेक्यांनी जर यशस्वी कुदेता घडवून आणला व अण्वस्त्रांवर ताबा मिळवला तर काय करावे लागेल याचाही पाश्चात्य राष्ट्रांनी विचार करून ठेवावा असा सल्लाही त्यांनी दिला. याहूनही जास्त अनिष्ट गोष्ट म्हणजे लष्करात फूट पडून त्यांच्यातल्या लठ्ठालठ्ठीत मूलगामी गटाची सरशी होऊन त्यांनी अण्वस्त्रांच्या साठ्याचा संपूर्णपणे ताबा घेणे. श्री कागन हे सध्या अमेरिकन एंटरप्राईज इन्स्टिट्यूट येथे ज्येष्ठ ’फेलो’ आहेत व त्यांनी अमेरिकेने आता आपल्या एकेकाळच्या भिडूच्या ठिकर्‍या उडतील/त्याची शकले होतील या शक्यतेची अटकळ बांधून त्यानुसार पावले उचलण्याची पूर्वतयारी केली पाहिजे असा सल्ला दिला.
थोडक्यात योग्य वेळ येताच अतीशय कर्तबगार (Elite) सैनिक पाकिस्तानात पाठवून सर्व अण्वस्त्रांचा साठा ताब्यात घेणे व ती अण्वस्त्रे पाकिस्तानाबाहेर काढून न्यू मेक्सिकोत एकाद्या गुप्त जागी ठेवणे किंवा ते शक्य नसल्यास पाकिस्तानातच एकाद्या अभेद्य जागी लपवून ठेवणे अशा कांहीं धोकादायक पर्यायांचा विचार करून ठेवला पाहिजे असेही कागन यांचे म्हणणे आहे. श्री. कागन पुढे म्हणतात कीं अमेरिकन लष्कराने आता पाकिस्तानच्या सरहद्दीचा भाग पादाक्रांत करून ही अटीतटीची लढाई तालीबान, त्यांचे मित्रगट आणि अल-कायदा यांच्यावर लादायला (शत्रूच्या भूमीत न्यायला) जय्यत तयार असायला हवे. आता तर याची आणखीच जास्त जरूरी आहे कारण १९९० साली अमेरिकेने पाकिस्तानकडे तिची पाठ फिरविली तेंव्हांपासून हे अधिकारी अमेरिकन सरकारला सक्त ताकीद देत होते कीं पाकिस्तानचा मलिदा बंद झाल्यास ते नक्कीच अण्वस्त्रविद्या विकून पैसे उभे करतील. दहशतवादाविरुद्धच्या युद्धात पाकिस्तानला सहभागी करून, पाकिस्तानने केलेल्या पापांकडे काणाडोळा करून व आर्थिक नुकसानभरपाई करून, त्याद्वारे लोकशाही सरकारला अधिकारग्रहण करण्यापासून वंचित करून व अण्वस्त्रांच्या प्रसारात पाकिस्तानने घेतलेल्या सक्रीय भागाबद्दल मूग गिळून गप्प बसून अमेरिकेने पाकिस्तानबरोबर एक प्रचंड चूक केली आहे. सखोल मनन व विचार केल्यावर असाच निष्कर्ष काढावा लागेल कीं अमेरिकेने पाकिस्तानला केवळ आर्थिक दृष्ट्याच नव्हे तर त्या राष्ट्राला विघटनाकडे नेऊन राजकीय दृष्ट्यासुद्धा खतम केले आहे व त्या राष्ट्राला (व त्याबरोबर भारतालाही) अण्वस्त्रयुद्धाच्या सर्वविनाशाच्या खाईकडे पूर्णपणे ढकलले आहे आणि या अप्रिय शक्यतेची सर्वांनाच एक तर्‍हेची भीती होती!.
थोडक्यात काय तर अमेरिकेने आपले शत्रू-मित्र नीट पारखायला शिकले पाहिजे!








 लेखक: सुधीर काळे


Print Page

आणि मी सिगरेट सोडली...

सिगरेट सोडून आज वीस वर्षं झाली मला! १९६२ साल! मी इंजिनियरिंगच्या दुसर्‍या वर्षात होतो व त्यावेळच्या प्रथेप्रमाणे या वर्षी सर्व शाखांचे विद्यार्थी "भारतदर्शन"ला जायचे (म्हणजे कुठले-कुठले कारखाने पाहायच्या निमित्ताने भारतातली मिळतील तितकी प्रे़क्षणीय स्थळे पाहून घेणे. स्तूप पाहण्यासाठी भोपाळमधला किंवा ताजमहाल पाहण्यासाठी आग्र्यामधला असे कुठले तरी फडतूस कारखाने शोधून व ते पाहायचे निमित्त सांगून स्तूप किंवा ताजमहाल पाहून घेणे वगैरे.) मात्र आधुनिक भारताची तीर्थक्षेत्रे या नावाने पंडित नेहरूंनी गौरवलेले भिलाई, दुर्गापूर, टाटानगर, राउरकेला वगैरे पोलाद कारखानेही (तिथं इतर काही ’प्रेक्षणीय’ नसलं तरी) एक कर्तव्य म्हणून बघितली जायचीच. भिलाई स्टील प्लांट (त्यावेळी अजून त्या कंपनीचं नाव हिंदुस्तान स्टील असं होतं, ’स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया’ अजून स्थापन झालं नव्हतं) पाहायला आम्ही गेलो! ’द्रुग’ नावाच्या (त्यावेळच्या तरी) ’कुस्थानका’वर आम्ही ४० विद्यार्थी उतरलो. पाऊस पडत होता व आम्हाला आमच्या उतरायच्या जागी नेण्यासाठी नियोजित केलेली बस अजून यायची होती. मग तोवर काय करायचं? पाऊस तर पडत होताच व वर थंडी होती. एकाने टूम काढली की "चला, मस्त थंडी आहे. एक सिगारेट शिलगावू या"! मी अजून विद्यार्थी होतो व कमावत नव्हतो त्यामुळे क्षणभर करू की नको असं झालं, पण क्षणभरच. "एकदा ओढण्यानं काय होतंय" या भावनेनं शेवटी मी त्या मोहाला बळी पडलोच व शिलगावली माझी पहिली सिगारेट. त्याकाळी खूप लोकप्रिय असलेली (बिनफिल्टरची असल्याने अगदी unadulterated poison असलेली व अगदी "Good to the last puff" या कीर्तीची ’पनामा’!) पहिला झुरका घेतला आणि तोंड वाकडं केलं. दुसर्‍याने ओढलेल्या सिगारेटचा वास किती छान वाटायचा पण स्वत: दम भरल्यावर मात्र अगदीच अपेक्षाभंग झाला. "हात्तिच्या, इतकी बेकार लागते असं माहीत असतं तर ओढलीच नसती!" असे विचार मनात आले पण तोवर सिगरेट ओढलीच होती. खरं तर दुसरी सिगरेट ओढायचं कारण नव्हतं (कारण पहिल्या सिगरेटचे झुरके काही आवडले नव्हते). पण आमच्या वयात त्यावेळी सिगरेट ओढणे म्हणजे एक मर्दाना ष्टाईल समजली जायची. त्यावेळचे जवळ-जवळ सगळेच हिरो ऐटीत सिगरेट ओढायचे. त्यामुळे दुसरी, त्यानंतर तिसरी असं करत-ओढायला हळू-हळू सिगरेट ओढायची आवड निर्माण होऊ लागली.(हे पनामा-प्रेम-प्रकरण नंतर दहा एक वर्षें चाललं. सध्याची काहीच कल्पना नाही, आता कदाचित तो ब्रँड नामशेषही झाला असेल. पण महिना ३००-५०० पगार असताना साठ पैशाला वीस सिगरेटचं पॅक या भावात मिळणारी ’पनामा’च परवडायची व "चार मिनार" आणखी स्वस्त असली तरी तिचा वास आवडायचा नाही म्हणून शेवटी 'पनामा'च एकदम प्यारी झाली होती!)पण खिसा खाली असल्यामुळे त्यावेळी सिगरेट क्वचित ओढायचो. क्वचित म्हणजे रविवारी हॉस्टेलची दुपारची ’फीस्ट’ झाल्यावर वगैरे. मेटॅलर्जीला असताना पहिल्यांदाच सिगरेटची ’किक’ काय असते ते अनुभवले. मग मात्र "स्वर्ग मेल्याविना दावी तयाला व्यसन म्हणतात" या गाण्यात सांगितल्याप्रमाणे सिगरेट्च्या त्या ’किक’साठी ती ओढावीशी वाटू लागली.बी. ई. मेकॅनिकल व बी. ई. मेटॅलर्जी आटोपून मग ’मुकुंद’ कंपनीत ३२५रु. महिना या पगारावर मी पाट्या टाकायला सुरुवात केली. खिशात ३०० का होईनात, पण पैसे खुळखुळायला लागले व मग ’पनामा’चं पाकीट बाळगायला सुरुवात झाली! राहायचो हिंदू कॉलनीत माझ्या आत्याकडे. त्यामुळे घरी सिगरेट ओढायची टाप नव्हती (तौबा-तौबा) पण घराबाहेर पडलो की धुराडं सुरू व्हायचं. आत्याला नक्कीच वास आला असेल, पण ती सुज्ञपणे कधी काही बोलली नाही.स्वत:च्या पैशाने सिगरेट ओढायला सुरुवात केल्यावर रोज २-३ सिगरेटपासून रोज १० सिगरेटचा टप्पा कधी गाठला ते कळलेच नाही.त्यानंतर ६५चे भारत-पाकिस्तान युद्ध सुरू झाले व आम्हाला (ब्रह्मचारी असल्यामुळे) मुकुंदच्या व्यवस्थापनाने कळव्याच्या कॉलनीत राहायला जायची (प्रेमळ) आज्ञा केली व मी व इतर तीन माझ्यासारखे ब्रह्मचारी असे आम्ही एकूण चार ब्रह्मचारी कळव्याच्या "मुकुंद कॉलनी"त 'डेरेदाखल' झालो.कॉलनीत इतर कुणी चिटपाखरूही नव्हतं. फक्त ड्यूटीवरील चौकीदार व आम्ही. त्यात आम्हाला गस्त घालण्यासाठी धूमकेतूसारखे वेळी-अवेळी जायला सांगण्यात आले होते. कधी रात्री १२ वा. तर कधी ३ वाजता, कधी ४ वाजता! म्हणजे कुठलाही एक ढाचा नसलेले वेळापत्रक ठेवायला लागायचे. नेहमी कुठला तरी चौकीदार झोपलेला मिळायचाच, त्यातला एक गोप-बहादूर हा चौकीदार खूपदा झोपलेला मिळाल्यावर त्याचे झोप-बहादूर असे नामकरणही आम्ही केले.कंपनीनं प्रत्येकाला वैयक्तिक खोली व चौघात मिळून एक आचारी व एक वरकाम्या नोकर ठेवला होता. त्यामुळे कधी स्वयंपाक करण्याची वेळ आली नाही ना कपडे धुण्याची. दिवसभर प्रोजेक्टची (इरेक्शन-कमिशनिंगची) ड्यूटी, आरामात मिळणारं जेवण व रात्री-अपरात्री मारलेल्या फेर्‍या असं जिप्सी टाइप जीवन आणि चार ब्रह्मचारी मग काय विचारता? पनामाचं रोज एक पाकीट कधी संपायला लागलं ते कळलंच नाही! मग मात्र पुढची वीसेक वर्षं रोज वीस सिगरेटचा ’रतीब’ सुरू झाला. पगार वाढला तसा सिगरेट्चा ब्रँड बदलत गेला. पनामा जाऊन कॅप्स्टन, मग गोल्डफ्लेक, मग विल्स फिल्टर अशी प्रगती होत गेली, पण रोजचा वीस सिगरेटचा रतीब मात्र बदलला नाही.मग लग्न झालं. सौ.ला माझ्या सिगरेट ओढण्याबद्दल मुळीच तक्रार नव्हती. त्यामुळे प्रेमळ आग्रहाखातर सुटायची तशीही सिगरेट सुटली नाही व रतीब चालूच राहिला.१९६४ साली "surgeon-general has determined that smoking is injurious to health" असं अमेरिकन सिगरेट्च्या पाकिटावर लिहिलं जाऊ लागलं व पाठोपाठ त्याच सुमाराला "सिगरेट ओढणे आरोग्याला हानिकारक आहे" असा प्रचार सुरू झाला. तो प्रचार पटायचा पण "आज ओढू दे, उद्यापासून सोडू" असं करत आम्ही तो दिवस पुढं ढकलायचो. मी किंवा माझ्या मित्रांनी सिगरेट सोडायचा निर्णय कधीच गांभीर्याने मनावर घेतला नाही. पुढे मुलं झाली. पण तब्येत ठणठणीत होती म्हणून असेल पण सिगरेट सोडावी असं कधी मनानं घेतलंच नाही.दोनदा 'झटका आल्या'मुळं म्हणा, पण तीन-तीन वर्षं अशी दोनदा मी सिगरेट सोडलीही. त्या वेळी सिगरेट फक्त परदेशवारीतच ओढायचो. सुरुवातीला परदेशी ओढायला सुरुवात केलेलं धूम्रपान मी परत आल्यावर इमिग्रेशनचं डेस्क केल्याबरोबर थांबत असे. मी लगेच तिथंच पाकीट फेकून देत असे व आणलेली ड्यूटी-फ्री पाकिटं मित्रांत वाटत असे. पण हळू-हळू "एवढं पाकीट संपवून मग सोडायची" वरून "एवढं कार्टन संपवून मग सोडायची" करता-करता धूम्रपान चालूच राहू लागलं.या दरम्यान मी इंडोनेशियातील दुसर्‍या क्रमांकाचं शहर असलेल्या 'सुरबाया'ला नोकरीसाठी आलो. त्याचा एकच फरक झाला की विल्स जाऊन ’555’ हा ब्रॅन्ड हाती आला. पुढे ’क्रेटेक’ सिगरेटही (लवंगेचा वास असलेली "बेंटुल बीरू-निळी बेंटुल") आवडू लागली, पण "वीस-एक्के-वीस"चा पाढा काही बदलला नाही.पण त्यासुमारास एक नवी समस्या माझ्यापुढे उभी राहिली. ती म्हणजे आमची वाढत असलेली मुलं व त्यांचं शालेय 'सामान्य ज्ञाना'चं शिक्षण.या सुमाराला माझा मोठा मुलगा १२ वर्षाचा व मुलगी ७ वर्षाची होती. त्यांना शाळेत सिगरेट ओढण्याचे गैरफायदे शिकवले जाऊ लागले. 'बाबा, सिगरेट ओढू नका, आजारी पडाल'ने सुरू झालेली गाडी 'आम्हाला अनाथ कराल बरं का'पर्यंत आली. मग मात्र 'आता सिगरेट सोडायचीच' असा निर्धार होऊ लागला. पण ती सुटता सुटे ना!असं म्हणतात की सिगरेट सोडायची असेल तर एकच यशस्वी मार्ग आहे. तो म्हणजे ती ओढायला सुरुवातच न करणे. तो मार्ग तर आम्ही केव्हाच ओलांडला असल्यामुळे आम्हाला उपलब्ध नव्हता. मग काय करायचे? असे करता-करता आम्ही ८७-८८च्या सुमारास त्रिनिदादला कंपनीच्या कामासाठी पोचलो. तिथे माझ्या मुलीने बंड केले. 'बाबा, तुमच्या अंगाला सिगरेटचा वास येतो म्हणून मी तुम्हाला पापी देणार नाही' हा निर्वाणीचा इशारा देऊन ती मोकळी झाली व मला खूप वाईट वाटले. सुरबायाला गेलो की सोडीन असं सांगून तात्पुरती वेळ मारून नेली. शेवटी १९८९च्या १४ नोव्हेंबरला इंडोनेशियाला 'राम-राम' ठोकून मी परत येत असताना वाटेत सिंगापूरला transit मध्ये असताना मला काय वाटले कुणास ठाऊक. मी तिथेच सिंगापूरच्या transit loungeमध्ये जी सिगरेट सोडली ती आजतागायत! खरं त्यावेळी धमकी किंवा प्रेमळ बंड वगैरे कसलाही प्रयोग माझ्या मुलांकडून झाला नाही. पण माझ्याच मनानं घेतलं की बस झालं आता. सोडा सिगरेट.एकदा सोडल्यावर पहिले ७-८ महिने खूप त्रास झाला. अशा वेळी मी काहीतरी चघळायला ठेवत असे. यासाठी आवळकाठी या प्रकारची आवळ्याची सुपारी बरीच उपयोगी पडली. आधीच धूम्रपानाच्या रूपाने तंबाखूची धास्ती घेतलेली असल्यामुळे धूम्रपान सोडण्यासाठी म्हणून मी तंबाखू खायला मात्र कधीही सुरुवात केली नाही. माझे असे काही मित्र आहेत की त्यांनी हा मार्ग चो़खाळला व परिणामतः आता ते दोन्हींच्या व्यसनात गुंतले आहेत.१४ नोव्हेंबरला सोडलेल्या सिगरेटने त्यानंतर आलेल्या ३१ डिसेंबरच्या नूतन वर्षाच्या स्वागतासाठीच्या पार्टीत परत मला मोहाची मिठी जवळ-जवळ मारलीच होती. पण निग्रहाने मी तो मोहाचा विळखा तिला माझ्याभोवती आवळू दिला नाही.त्या संक्रमणकाळात आजूबाजूला कुणी सिगरेट ओढत असेल तर मात्र खूप जळफळायला व्हायचं, पण स्वनिश्चयाच्या बळावर मी सिगरेटपासून सोवळा राहिलो.शेवटी सहा-एक महिन्यानंतर मात्र माझ्या जवळपास कुणी सिगरेट ओढत असल्यास त्याचा त्रास व्हायला लागला. मग मला जरासे हुश्श झाले.आजही मला खात्री आहे की मी एक सिगरेट एकदा जरी ओढली की मी पुन्हा 'वीस सिगरेट रोज'च्या रतीबाला पोचेन. तेव्हा ती पहिली सिगरेट कुठल्याही परिस्थितीत ओढायची नाही ही खूणगाठ मनाशी पक्की घातली आहे!आज १४ नोव्हेंबर २००९. काल सिगरेट सोडून वीस वर्षें झाली व मी धूम्रपानमुक्त अशा २१व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. मी जे केले (तब्येतीला कांहींही 'धाड' झालेली नसताना) याचा अभिमान तर आहेच पण काही लोक सिगरेट ओढताना पाहून वाईट वाटते व त्यांना मदत करावीशी वाटते. तशी मदत मी त्यांना देऊही करतो, पण जसा मी स्वत:च्या आत्मनिश्चयामुळे यशस्वी झालो तसं त्याच्याही बाबतीत व्हायला हवं हे मनात येतं व मी त्यांना सांगतो मी यात यशस्वी झालोय. तुम्ही जेव्हा निर्णय घ्याल व त्यावेळी जर माझ्या अनुभवाचा उपयोग होईल असं तुम्हाला वाटलं तर मला सांगा, मी जरूर माझा अनुभव तुमच्या उपयोगी पडेल अशा तर्‍हेने तुम्हाला सांगेन. अगदी फुक्कट!

लेखक:सुधीर काळे
Print Page