"टिक टिक ... टिक टिक.. टिक टिक... "घड्याळाचे काटे जसजसे पुढे सरकत होते, तसतशा मालतीबाई अस्वस्थ होत होत्या. भाजी निवडता निवडता त्यांचं सगळं लक्ष दरवाजाकडेच जात होतं. वेळ कधीच टळून गेली होती पण अजून सुमती चा पत्ता नव्हता. एरवी ४-५ वाजेपर्यंत येणारी सुमी आज सव्वा सहा वाजत आले तरी अजुनही घरी आली नव्हती. तिचाच विचार डोक्यात येत होता, इतक्यात कोणीतरी आल्याची चाहूल लागली. कोण आहे हे पहाण्यासाठी त्यांनी भाजी बाजुला ठेवली आणि हळुहळु गुडघ्याला आधार देत त्या उभ्या राह्यल्या. बराच वेळ बसून पायाला मुंग्या आल्या होत्या. पाय झटकत पुढे चालणार तोच सुमतीचा आवाज ऐकू आला..
"आई चहा कर बघू आधी, मी आलेच फ्रेश होऊन...!"
"हो ग बाई ठेवते चहा , पण आज इतका उशीर कसा काय झाला ग तुला ?" मालतीताईंनी किंचित काळजीच्या सुरात विचारले.
"अगं आई.... आता परीक्षा जवळ आलीये ना..., त्यात केमिस्ट्रीची प्रॅक्टिकल्स व्हायची आहेत.... २ एक्सपरीमेंट आज केले म्हणून वेळ झाला .. उगाच काळजी करत असतेस.. मी काही आता बाळ नाही..." असं म्हणत म्हणत सुमती तिच्या खोलीत आली.
धाडकन दार बंद केलं अन् आई जवळ बोलताना आणलेलं अवसान गळून पडलं. बेडवर पडून विचार करायला लागली. डोळ्यातून अश्रु आपोआपच बाहेर पडू लागले.
आज सुमती आईशी चक्क खोटं बोलली होती, एकच एक्स्परीमेंट होता, अन बाकीचा वेळ ... बाकीचा वेळ सुलेखाशी वाद घालण्यातच गेला होता. आईशी खोटं बोलल्याचं वाईट तिला वाटत होतंच, पण सुलुशी झालेली वादावादी मनात खूपच सलत होती.
माणसाचं एक बर असतं नाही, मनातल्या गोष्टी समोरच्यापासून लपवण्यासाठी, आपले शब्द सुध्दा खोट्या रस्त्यावरुन चालायला तयार होतात, अन् मग कितीतरी गुपितं फक्त आपल्या ह्रदयाला आणि सर्वसाक्षी निसर्गालाच माहीत असतात. या सारखे अनेक विचार तिच्या डोक्यात येत होते. प्रेम, जीवन, सुख-दु:ख, काळ या अश्या अनेक गोष्टी तिच्या मनात पिंगा घालत होत्या. 'सुलू तर चक्क माझ्याशी खोट कसं काय बोलु शकते, ते देखील सत्य माझ्यासमोर असुनही?' सुमती विचार करत होती.
' जाऊदे, नाहीतरी मी आज वेगळं काय केलं, बोललीस ना आईशी खोटं ' असं तिच एक मन सांगत होतं तर दुसरं मन 'आईशी खोटं बोललीस त्यामागं एक सत्कारण होत, सुलुला आताच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी तुझी धडपड होती' असं स्पष्टिकरण देत होतं.
इतक्यात आईचा आवाज आला अन् ती विचारांच्या जगातून बाहेर पडली. "आले गं आई .." असे म्हणत ती तोंड धुवायला बाथरुमकडे वळाली.
अगं लवकर ये चहा थंड होतोय" आई
तोंड पुसतच ती स्वैपाकघरात आली, चहा घेतला.
"आई मी जरा वेळ पडते गं थोड्यावेळाने ऊठव" - सुमती
"हो गं" आई उतरली. तशी आई जरा गोंधळलीच होती. एरवी घरात पाय टाकल्या टाकल्या कॉलेजच्या गोष्टी, गमती सांगणारी सुमती आज अशी का वागतेय? काय बिनसलं की काय हीचं ? अशा विचारात आई पडली.
रात्रीचं जेवण होताच सुमती रुममध्ये आली.'काय करावं बर आजच्या या घटनेवर?' याचा विचार करत बराच वेळ ती बेडवर बसून राहिली. आजचा प्रसंग तिला पुन्हा पुन्हा आठवत होता.
"सुले, चल जरा एलआर मध्ये, मला थोडं बोलायच आहे तुझ्याशी" सुमती म्हणाली
"काय गं एवढं महत्वाच बोलायच आहे, बोल इथेच ! प्रॅक्टीकल संपत आलयं घरी जायचं आहे लवकर" सुलेखा उतरली.
"ते काही नाही एलआर मध्ये ये. मी तिथं तुझी वाट बघतेय" असे म्हणतच सुमती लॅबमधुन बाहेर पडली. सुलेखा देखील तिच्या पाठोपाठ गेली
"हं बोल पटकन, मला घरी जायचं आहे" सुलेखा उतरली.
"तुला आठवत का सुलू, एकदा आपण दोघींनी एक बातमी वाचली होती दोन बहिणी कपडे धुवायला नदी वर गेल्या होत्या अन, एक पडली तिला वाचवायला दुसरीही गेली मग दोघी पण.... जाऊ दे त्यावरती तु मला एक प्रश्न केला होतास आठवतयं , तू म्हणाली होतीस, 'मैत्रीण नदीत पडल्यावर काठावरच्या मुलीची काय अवस्था झाली असेल नाही? वाचवायचं तर आहे पण पोहायला कुठे येतंय? अगदी तिच अवस्था माझी झालीये, तुझ्याबाबतीत..!" - सुमती
"का काय झालं?" सुलु उतरली
"तुला कळतय की मी कुठल्या विषयावर बोलतेय ते, आज काल तू त्या संजीवबरोबर खूप फिरतेस होय ना?" सुमती
"नाही गं सुमे, तुला कोणी सांगितल?"
"सुलु खोटं बोलू नकोस, अगं तू काय करतेस हे तुझं तुला तरी कळतयं का? अन् सांगायला कशाला हवं, दिसतंच की...!"
"सुमे गैरसमज करुन घेऊ नकोस, तो फक्त माझा चांगला मित्र आहे गं"
"खोटं बोलू नकोस सुले, निदान स्वःताशी तरी!"
"सुमे तू उगाच संशय घेऊ नकोस."
"हे बघ परवा आमच्या शेजारी राहणारा विशाल विचारत होता कि 'तुझं काय चाललयं?' काय सांगणार मी, काही नाही म्हणावं तर तो पुरावे दाखवेल! समजलं . तुला हात जोडून सांगते त्या संजीवचा नाद सोड. चांगला मुलगा नाहिये तो"
"तुला कुणी सांगितल तो चांगला नाहीये म्हणून, अन् तो चांगला की वाईट ते मला ठरवू दे ना, तू कशाला...
"मध्ये पडतेस हेच ना? ५-६वर्षाची मैत्री आहे गं आपली ! अगं सुले तुला कसं कळेना झालयं ? कसं समजावू तुला?..... सुले जरा आहे ह्या परिस्थितीचा विचार कर, फायनल परिक्षा जवळ आलीये, वेळ वाया घालवू नकोस, मुख्य म्हणजे त्या मुलाबरोबर आपलं आयुष्य वाया घालवू नको...स
भावनेच्या आहारी जाऊन भलते सलते निर्णय घेऊ नकोस ग बाई..!"
"झाली तुझी बडबड? चल उशीर होतोय"
".....बडबड नाहीये ही ! तू अशी...."
"सुमे खरंच या विषयी तुझा गैरसमज आहे. प्लीज हा विषय थांबव येथे"
एवढं बोलुन सुलू आपल्याला तिथेच सोडून निघून गेली.
काय करावं या विचारात सुमती गढून गेली.आपण सुलेखाला एक पत्र लिहावं या निर्णायापर्यंत ती येऊन पोहचली. पेन आणि वही घेऊन तिने लिहायला सुरवात केली.
प्रिय सुलू ,
हो, कालच्या प्रसंगानंतरही आज परत तेच सांगतेय. आशा! म्हणतात ना जग आशेवरच जगतं, मला पण आशा आहे की तू तुझा मार्ग नक्की बदलशील. सुले, किती वर्ष झाली आपल्या मैत्रीला....! माणूसकीतील नाती एकवेळ तुटू शकतात पण मनानं जोडलेली नाती तोडतो म्हटंली तरी तोडता येत नाहीत.
सुले वेळीच जागी हो! प्रेम, आयुष्य, लग्न ह्या गोष्टी काही पोरखेळ नाहीत. याच गोष्टींमु़ळे अर्थ येतो जिवनाला. सध्या परिक्षा जवळ येत आहे. त्याचा विचार कर. पास झाले तर नशिब असं मी तुझ्याकडून बर्याचदा ऐकलं, पण त्याला कृतीची जोड हवीय, नुसतं नशीब म्हणून काही होत नाही गं.
अगं सुले प्रेम वाईट नसतंच, उलट प्रेमाशिवाय मानवाचं जगणं थोडं मुश्कीलचं असतं; पण ज्या व्यक्तीचं मन जपतेस ना ती चुकीची आहे. ती फसवू पाहतेय तुला अन् तुही त्या गर्तेत जात आहेस. हे सगळं माझ्यासमोर घडत असताना मला स्वस्थ बसवेलच कसं?जरा विचार कर माझ्या जागी येऊन!
हीच तळमळ, अस्वस्थता तुझ्यात निर्माण होते की नाही बघ! कोणालाही वाटणार नाही गं आपल्या जवळची व्यक्ती दु:खात असावी मग ते दु:ख भविष्यातील का असेना? तेव्हा नीट विचार कर. अन् चांगला निर्णय घे.
हे पत्र मिळाल्यानंतर मला भेटायला ये, मी तुझी वाट पाहत आहे अगदी आतुरतेने! तुझ्याकडे आशेने पाहतेय तू येशील, का माहीतेय, एकमेकींच्या सुखदु:खात साथ न सोडणारी तू आजदेखील पुर्विच्याच निरागसतेने माझ्यात पाहू शकशील आणि मीदेखील कारण-
तुझं परतणं माझ्यासाठी
नक्कीच आहे खास
तुझी माझी मैत्री म्हणजे
दोन जीव - एक श्वास
तुझीच,
सुमी.
सात दिवसांनी सुलेखा सुमतीच्या घरी आली. सुमती तिला घेऊन आपल्या खोलीत गेली.
सुमीला पाहुन सुलेखाच्या डोळे भरून आले,
सुमे, म्हणतच ती सुमतीच्या गळ्याला पडून हमसाहमशी रडू लागली
"सुमे... मला माफ ....कर"
"सुले तु काहीही बोलू नकोस, वेळीच जागी झालीस हेच माझ्यासाठी खूप आहे. ज्या काही कटु आठवणी आहेत त्या विसरायचा प्रयत्न कर. "
"सुमे परिक्षेचं..."
"अजुन आभ्यासाला भरपुर वेळ आहे सुलू , आहे ह्या वेळात अभ्यास करून पास व्हायची कुवत आहे ना तुझ्याकडे? मग घाबरतेस कशाला? अन् मी आहेच की मदतीला... आजिबात काळजी करु नकोस"
"तुझं पत्र मिळालं अन् मी लगेच संजीवकडे जायला निघाले तेव्हा त्याची मामेबहीण शुभदा माझ्याकडे आली ..... ती पत्रिका घेऊनच.. त्याच्या व तिच्या लग्नाची... हजारो शकलं झाली गं माझ्या मनाची.... काहीच सुचेनासं झालं .... लगेच तुझी आठवण झाली मग आले तुझ्याकडे धावतच....
मला माहीत होतं काहीही झालं तरी माझ्यासाठी तुझ्याकडे नक्कीच जागा असेल्....मी खुप दुखावलं ना तूला? खूप वाईट वागले ना तुझ्याशी?"
"सुले तु दुखावल्याच वाईट वाटत होतं पण चुकीच्या मार्गाकडे पडणारी तुझी पावलं ... मला खूपच अस्वस्थ करीत होती....जाऊ देत त्या आठवणी... परमेश्वर ज्या गोष्टी करतो त्या चांगल्यासाठी.... परिक्षा संपेपर्यंत ह्या गोष्टीचा विचार तू अजिबातच करायचा नाहीयेस. आणि हा विषयदेखील परत काढायचा नाहीस समजलं. जा पटकन घरी अन् अभ्यासाला ईकडे ये."
"सुमे तुझे उपकार..."
"सुलू..? अगं तू मला सख्या बहिणीसारखी मानतेस अन् ही उपकाराची भाषा... "
"नाही बाई करत, मग तर झालं... जा काहीतरी खायला घेऊन ये"
"झाली का तुझी सुरवात.... अभ्यासाला बसायच्या आधी खायचाच विचार.."
दोघीही खूप हसल्या. मग सुमी स्वैंपाकघरात जायला निघाली.....!
लेखिका:स्नेहाराणी
२ टिप्पण्या:
आयुष्यात आपली अशी काळजी करणा-या मैत्रीणी व मित्र खूपच कमी मिळतात. ते म्हणतात ना, ’आई-वडील, भाऊ-बहीण इ. सर्व नाती गोती आपल्याला जन्मामुळे मिळतात पण मित्र मात्र आपण स्वत: मिळवतो. असा चांगला मित्र वा मैत्रीण मिळाली तर कधी त्याची साथ सोडू नये. खूप छान कथा आहे.
परस्पर नातेसंबंध आणि त्यांचें भावविश्व मस्त रंगवलें आहे. विविध प्रसंगीं पात्रांच्या मनांत उठणारीं स्पंदनें छान टिपलीं आहेत. आईचें निरीक्षण, मुलींचें तारुण्यसुलभ वागणें अगदीं स्वाभाविक वाटतें. संवादहि अकृत्रिम वाटले.
छान
सुधीर कांदळकर
टिप्पणी पोस्ट करा