हातांच्या तळव्यांच्या पोकळ टक्करीतून जो अकस्मात ध्वनी निर्माण होतो त्याला साध्य़ा भाषेत टाळी म्हणतात. एकट्या मानवाला हास्य ही देणगी जशी निसर्गाने दिली आहे, तशी टाळी वाजवून आवाज काढणे आणि त्या मधून अनेक प्रकाराने भावना व्यक्त करण्याची सोय मानवाने निर्माण केली आहे.
भाबडी प्रेमीमंडळी आपल्या प्रिय व्यक्तीला भावगीतातून, ‘डोळ्य़ात वाच माझ्या तू गीत भावनांचे’ असे आळवून जवळीक साधण्याची संधी साधतात. प्रत्येक वेळी तसे करणे सभ्यपणा आड येऊन शक्य होत नसते. आठवा ना. सर्कसच्या तंबूत झूलापटूंची जीवघेणी कसरत पाहून दाद द्यायला आपल्याला झूल्यावर चढून जाणे शक्य नसते. बसल्या बैठकीला ते अंतर काटून टाळ्या वाजवून आपण आपल्या आश्चर्याच्या, कौतुकाच्या भावना व्यक्त करू शकतो.
एन्ट्रीची टाळी अपेक्षा दर्शक असते तर सेंचुरी नंतरची टाळी अपेक्षा पूर्तीची असते. हजारोंच्या संख्येने टाळ्यांचा कडकडाट संघाला चेव आणतो. अशक्य वाटणारी अचाट कामे करायला मानसिक बल देतो.
टाळ्या वाजवणे ही एक कला आहे. हातांची हालचाल, मनगटातील जोर, तळव्याची खोली आदींवर टाळीचा खणखणीतपणा अवलंबून असतो. आपली आपल्याला सुद्धा ऐकायला येऊ नये अशी बेंगरुळ टाळी वाजवण्यात सोपस्कार जास्त. दबक्या आवाजातील टाळ्या श्रोत्यांच्या सहनशीलतेचा अंत झाल्याचे दाखवाला बर्या पडतात. तर चीयर अप करता करता उत्तेजित लाल भडक तळवे त्रयस्थाला देखील उत्साहित करतात.
टाळी कुठे व कशी वाजवायची याचे देखील भान लागते. आरती म्हणताना कव्वाली स्टाईल उपयोगी नाही. स्टेडियममधे हजारोंच्या संख्येने वाजवली जाणारी टाळी तृतीयपंथी हावभावातील कशी चालेल?
टाळीचे भाऊबंद ही आहेत. किणकिणत्या आवाजाची झांज, ठेका देणारी, तर वारकर्यांचे टाळ ठणठणाट करणारे. बौद्ध भाविक भक्तांना थाळ्यांचे झांज गोंगाट करून हेलाऊन सोडतात तर बँड-बाजामधील फत्ताड्या आकाराच्या झांजांचा वादक शिकाऊ उमेदवारी करणारा असतो असे दर्शवतात.
दोन हातांचे मीलन म्हणजे टाळी तर एका हाताने शरीरावर केलेला आघात म्हणजे थाप. मग ती पाठीवर पडली की शाबासकी किंवा धम्मक लाडू. डोक्यावर पडली तर टप्पल. गालावर पडली तर थप्पड. पार्श्वभागावर पडली तर चापटी. आवाजावरून त्यांचे टाळीशी नाते कळते.
टाळीला टाळी देऊन लुबरेपणा व्यक्त करता येतो. एकाने दुसर्याला दिलेली टाळी संमती देते. ‘द्या टाळी’ म्हणून मागितलेली टाळी आस्था वाढवते.
काय मंडळी,पटली ना टाळीची महती? तर मग,द्या टाऽऽळी!!!
लेखक:निवृत्त विंग कमांडर शशिकांत ओक.
Print Page
५ टिप्पण्या:
पटलं बुवा, घ्या टाळी !
टाळी द्यायला हात शोधतोय. निरिक्षण फारच छान. थोडक्यात बरेच काही सांगून गेलात म्हणूनच टाळी द्यावीशी वाटते.
खरंच की! टाळी वाजवण्यातही विविधता असते.
आमचा हात सदैव पुढे आहे टाळी मिळवायला.
घ्या टाळी.
सुधीर कांदळकर
टिप्पणी पोस्ट करा