गुरुवार, ३ डिसेंबर, २००९

बॅड आयडिया !


मैथिलीने घरात प्रवेश केला. आईचं लक्ष नाहिये असं पाहून ती हळूच बाथरूममधे शिरली. भुवईवर दाबून धरलेला रुमाल काढून तिने जखम पाहिली. जखम लहानशीच होती पण वेदना खूप होत होत्या. रक्त टिपण्यासाठी तिने भुवईवर दाबून ठेवलेला रूमालही चांगलाच लालभडक झाला होता. जंतूनाशक औषधाने जखम स्वच्छ करता करता मैथिली स्वत:वरच रागावली आणि पुटपुटली.
बॅड आयडिया!”

मैथिलीची बारावीची परिक्षा संपली आणि वडिलांनी तिला कबूल केल्याप्रमाणे मोबाईल घेऊन दिला. तिच्या -याच मैत्रीणींच्या हातात मोबाईल आला होता. त्यांच्याकडे पाहिलं की मैथिलीचं लक्ष आपोआपच आपल्या रिकाम्या हातांकडे जायचं.

पण वडिलांनी तिला नवीन मोबाईल घेऊन दिला पण काही अटींवर. “जास्त बोलायचं नाही, एका जागी बसून बोलत जा, सारखे एस. एम. एस. करायचे नाहीत, घरात आल्यावर मोबाईल बंद,” अशा आईबाबांच्या अटी मान्य केल्यावरच मैथिलीला मोबाईल वापरण्याची परवानगी मिळाली.

मोबाईल हातात येताच तिच्या कल्पनांना जणू पंखच फुटले. “आपण कमवायला लागल्यावर याहीपेक्षा चांगला फोन घ्यायचा,” असा विचार करून मैथिली टि.व्ही. वर दाखवल्या जाणा-या मोबाईल कंपन्यांच्या जाहिरातींवरही लक्ष ठेवून असायची. त्यातच तिला ही जाहिरात दिसली.
वॉक ऍन्ड टॉक – व्हॉट ऍन आयडीया!

फोनवर एका जागी बसून बोलल्याने कितीतरी अमूल्य वेळ वाया जातो. त्यापेक्षा जर चालता चालता मोबाईलवर बोलण्यास सुरूवात केली तर आपलं चालणंही होतं आणि बोलणंही! म्हणजे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असलेला चालण्याचा व्यायाम आपसूकच केला जातो.

अरे वा! चांगली आयडिया आहे की! कुणालाच हे कसं सुचलं नाही बरं?”

मैथिली या जाहिरातीने चांगलीच प्रभावित झाली होती. उद्यापासूनच या प्रयोगाला सुरूवात करायची असं तिने ठरवलं. जाहिरातीच्या प्रभावात आईवडिलांनी काळजीपोटी घातलेली अटही ती विसरून गेली. आठवडाभर हा प्रकार सुरळीत सुरू होता.

पण हळूहळू मैथीलीच्या लक्षात आलं की हे वॉक ऍन्ड टॉक, वाटतं तितकं सोपं नाहिये. कारण आजूबाजूला कुणाला धक्का लागेल का, रस्त्यावरून एखादं वाहन येतंय का, याची काळजी करता करता आपण काय बोलतोय इकडेही लक्ष रहात नाही. शिवाय चालता चालता बोलण्याने आपल्या बोलण्याच्या गतीनुसार कधीतरी आपला चालण्याचा वेगही वाढतो आणि बोलताना दम लागतो. मैथिलीने ही आयडीया बाद करायचं ठरवलं.

नेमकं त्याच दिवशी मैथिलीला कॉलेजला जायला उशीर झाला. पटापट आवरून मैथीली बस स्टॉपवर पोहोचली तर नेहेमीची बस केव्हाच निघून गेलेली.
काय करावं?”... मैथीलीने शेवटी आज रिक्षा करून जायचं ठरवलं पण हात दाखवल्यावर एक रिक्षा येईल तर शपथ! तितक्यात तिचा मोबाईल वाजला.

मैथिली, कुठायंस तू? मी केव्हाची इथे गेटजवळ उभी आहे. येतेयंस ना?” मैथिलीची मैत्रीण सुरूची तिला फोनवर विचारत होती.
हो, येतेय. अगं उशीर झाला....” बोलता बोलता मैथिलीने एका रिक्षाला हात केला. ती रिक्षा काही थांबली नाही पण मैथिलीचा हात पाहून पलिकड्च्या बाजूने एक रिक्षा थांबलेली मैथिलीने पाहिली.
डी.एन. पाटीऽऽल?” मैथिलीने ओरडून विचारलं.
हां? अगं तुला नाही.... रिक्षावाला....” मैथिली मधेच सुरूचीला म्हणाली. तिकडे रिक्षा ड्रायव्हर मैथिलीला खूण करूनयाच दिशेच्या शॉर्टकने रिक्षा घेऊन जाईन,’ असं सांगत होता. मैथिलीने त्यालाथांब थांबअशी खूण केली. एकीकडे मोबाईलवर बोलता बोलता रिक्षा पकडावी असा विचार करून मैथिली रस्ता ओलांडण्यासाठी फुटपाथवरून खाली उतरली.

सुरूचिशी बोलताना तिला येणा-या जाणा-या गाड्यांकडे पहायचंही भान नव्हतं. ती पुढे जात असतानाच तिच्या उजव्या बाजूने एक रिक्षा सुसाट पळत आली. मैथिली प्रसंगावधान राखून मागे सरकली पण त्या रिक्षाला बाहेरच्या बाजुने लावलेल्या आरशाने मैथिलीच्या डोळ्यावरचा चष्मा उडाला आणि तिच्या भुवईवर चांगलाच फटका बसला. मैथिली खाली कोसळली. तिच्या हातातून मोबाईलही खाली पडला.

, दिसत नाही का?” बस स्टॉपवर उभ्या असलेल्या एका काकांनी ओरडून रिक्षावाल्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण रिक्षा निघून गेली. चूक त्या रिक्षावाल्याची थोडीच होती? हळूहळू मैथिलीभोवती गर्दी जमा झाली. मैथिली आपल्या इवल्याशा रुमालाने गळणारं रक्त थांबवण्याचा प्रयत्न करत होती. कुणीतरी तिला पाणी दिलं. पण भुवईवरच्या जखमेपेक्षाही आपण किती मोठ्या प्रसंगातून वाचलो याचा ताण मैथिलीच्या डोक्यावर जास्त होता. डॉक्टरकडे जाण्याचं नाकारून मैथिलीने सरळ घरची वाट धरली.

बाथरूममधून बाहेर पडणा-या मैथिलीला पाहून आई चकित झाली. तिच्या कपाळावरची जखम पाहून तर तिच्या चेहे-यावरचे हावभावच बदलले.
अगं, मैथिली! हे काय झालं? आणि घरात कधी आलीस तू?”
मैथिलीने आईला घडला प्रकार सांगितला, अर्थातच वॉक अँड टॉकचा उल्लेख टाळून! पण तिने मनाशी पक्कं ठरवलं, ही वॉक अँड टॉकची आयडिया एकदम कुचकामी आहे. मोबाईलवर बोलत असताना फक्त बोलायचं.
" डोन्ट वॉक व्हेन यू टॉक! "

लेखिका: कांचन कराई(आदिती)

१९ टिप्पण्या:

नरेंद्र गोळे म्हणाले...

खरयं आदिती! डोन्ट वॉक व्हेन यू टॉक!!

कांचन कराई म्हणाले...

धन्यवाद गोळे काका. खरंतर जेव्हा अशी जाहिरात मी प्रथमच टी.व्ही. वर पाहिली, तेव्हाच मला हा प्रकार खटकला होता. त्यानंतर एक-दोन ’वॉक अॅन्ड टॉक’चे किस्से ऐकले नि कळलं की खरंच ही बॅड आयडीया आहे.

विनायक रानडे म्हणाले...

आज दिसणार्‍या जाहिराती ह्या एका ठरावीक उद्देशानेच तयार केलेल्या असतात तो म्हणजे वेगळेपण. कोणतीही बंधने धुडकावून स्वतंत्र = स्वैराचाराला मान्यता मिळवून देणे. ह्याचा परिणाम असंघटीत तरूण वर्ग, समाज, अनुभवाने तयार केलेल्या मूल्यांना धूडकावून लावून पुरोगामी, जागतिक मान्यता वगैरे गोंधळात अडकवायचा. ह्या परिस्थितीचा फायदा प्रत्येकाने क्षमतेनुसार घ्यायचा. ह्यालाच मी नाव दिले आहे वैचारिक प्रदूषण.

माझी दुनिया म्हणाले...

खरं तर जाहिरात पाहिल्यावर माझं घरात हेच बोलणं झालं होतं की,किती चुकीची जाहिरात आहे. आणि फोनवर बोलतच फिरायचं तर ’आयडिया’चं कशाला हवं, कोणतही नेटवर्क चालेल की. पण एकीकडे फोनवर बोलताना गादी चालवताना पकडले गेल्यास दंड असे कायदे करायचे आणि त्याच वेळेला अश्या जाहिराती करून उत्पादकंनी ते धाब्यावर बसवायचे. ग्राहकांनीच यांना धडा शिकवायला हवा.

कांचन कराई म्हणाले...

अगदी खरं, रानडे काका आणि श्रेया,

नितिनियम गुंडाळून फक्त स्वार्थ साधण्यासाठी बनवल्या गेलेल्या जाहिरातींवरून कितपत प्रेरणा घ्यायची हे ग्राहकानेच ठरवायला हवं. ग्राहकानेच पुढाकार घेतला तर जाहिरात निर्माण करणारेही समाजाचा विचार करतील.

Anand म्हणाले...

जाहिरात दाखवताना अगदी छोट्या अक्षरात त्यांनी ’वॉर्निन्ग’ दिलेली आहे... त्यांचे काम संपले.
पुढे आपण ठरवायचे की काय बरोबर आहे आणि काय चुक...

श्रेयाला दुजोरा, हि जाहिरात काही ’आयडिया’ची नाहिये. पण ती ’आयडिया’ आपल्याला समजली पाहिजे.

कांचन कराई म्हणाले...

अर्थातच आनंद! ग्राहक जागरूक असेल, तर ह्या आयडियाचा मोह टाळेलच पण मुळात अशा जाहिरातीच बंद व्हायला हव्यात असं मला वाटतं.

Shashikant Oak म्हणाले...

कांचनजी जाहिरातीतील अतिताईपणा सोडला तर नकळत मोबाईल वर बोलणे चाली जाले की माणूस नकळत चालायला लागतो. निदान घरातल्या घरात. ते सहज घडतं. पण जाहिरातीतील अतिरेक मात्र उत्साहाच्या भरात जादा होतो हे नक्की.

सुधीर कांदळकर म्हणाले...

किशोरवयीन मैथिली डोळ्यांसमोर उभी राहिली. सुरेख.

पण तो चष्मा आणि मोबाईल तिनें उचलला कां हो?

कांचन कराई म्हणाले...

हेच मलाही म्हणायचं आहे, ओक साहेब.

कांचन कराई म्हणाले...

कांदळकर साहेब, धन्यवाद! हो, तीने मोबाईल आणि चष्मा उचलला. शब्द जास्त नकोत म्हणून, त्याचा उल्लेख मी मुद्दाम टाळला.

Sudhir Kale म्हणाले...

"इस्पात इंडस्ट्रीज"च्या डोलवी येथील कारखान्यात काम करत असतानाचे माझे एक नजीकचे सहकारी गाडी चालवता-चालवता फोनवर बोलत होते व त्यावेळी झालेल्या भीषण अपघातात निधन पावले. तुझा सुंदर लेख वाचल्यावर या घटनेची प्रकर्षाने आठवण झाली.

कांचन कराई म्हणाले...

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद, काळे साहेब. या कथेत साकारलेली मैथिली माझी एक मैत्रीण आहे (नाव बदलले आहे). तिला खरोखरच असा अपघात झाला होता.

दिलीप बिरुटे म्हणाले...

जाहिरातींनी माणसांना भुरळ घातली आहे. त्यामुळे आपण विवेक गमावून बसलोय, असे वाटायला लागते. लेखन आवडलेच हे वेगळे सांगणे न लगे.

कांचन कराई म्हणाले...

धन्यवाद बिरूटे साहेब, जाहिरातीसुद्धा इतक्या कल्पक रितीने बनवल्या जातात, की "हे खरं नाही," हे ग्राहकालाही उशीराच लक्षात येतं.

Maithili म्हणाले...

Are " MI " ch kaa...??? ( Aani te pan baravichi pariksha vaigare dileli Maithili...itke same same kaa...???)
Naav mulich nai aawadale mala tiche...!!! ;)
Pan kathaa matr mastach aahe...!!!

Kanchan Karai म्हणाले...

हा लेख लिहिला तेव्हा तुझी माझी ओळख झालेली नव्हती, मैथीली. पात्र काल्पनिक आहे आणि साम्य योगायोग आहे. मी डिस्क्लेमर लिहायला हवं होतं बहुधा. ;-)

Vaishali म्हणाले...

खरयं आदिती! डोन्ट वॉक व्हेन यू टॉक!

Kanchan Karai म्हणाले...

अगदी खरं. त्यातून फक्त दुष्परिणामच भोगावे लागतात.