सोमवार, ३० नोव्हेंबर, २००९

विठू विठू !

त्या दिवशी मी बाहेरच्या खोलीत अभ्यासाला बसलो होतो...शाळेचा गृहपाठ करायचा जाम कंटाळा आला होता.तरीसुद्धा मांडीवर पुस्तक ठेवून वाचन चालूच होतं...आय एम अ गाईड बॉय... ;)

तेव्हढ्यात मला एक सावली चालत येताना दिसली...पक्षाची होती ती. चिमणी असेल असं पहिल्यांदा वाटलं पण हळू हळू जेव्हा तो पक्षी चालत आला आणि मला दिसला,तो होता एक पोपट. स्वयंपाक गृहाच्या खिडकीतून तो आत आला होता. ते सुद्धा अगदी आरामात चालत चालत...आत्ता पर्यंत फक्त खिडकीत फक्त खारच येऊन जायची पण आता डायरेक्ट तोताराम प्रकट झाले होते. मी पटकनी उडी मारली आणि त्याच्या जवळ गेलो...भाऊ वैतागला, लगेच डोक्यावरचे (त्याच्या ;) ) केस उभे झाले होते आणि डोले लाल. त्याला हात लावणार तेव्हढ्यात त्याने त्याच्या चोचीने चावण्याचा प्रयत्न केला...थोडक्यात बोट वाचले. माझ्या लक्षात आले की याने आत्ता पर्यंत एकदाही उडण्याचा प्रयत्न केला नाही...याचा अर्थ बहुतेक पंखाला मार लागला असावा किंवा कोणी दुसर्‍या पक्षाने हल्ला केला असावा. त्याच्या शरीरावर कुठलीही जखम दिसत नव्हती,याचा अर्थ त्याचा पंखच दुखावला गेला होता असा अंदाज मी केला. पटकन आईला हाक मारली आणि तिला सुद्धा तो पोपटराम दाखवला...पोपटाने सुद्धा मातोश्रींना पाहिले,,,आणि तो चालत चालत तिच्याकडेच जाऊ लागला... ती घाबरली (आधी एकदा कुत्र्याचे पिलू कुठून तरी उचलून आणले होते तेव्हाही अशीच घाबरली होती). तिला वाटले आता हा चावतो की काय!!! पण त्याने तसे काहीच केले नाही.आता आई घरभर जिथे जाईल तिथे तिथे तिच्या मागे मागे चालत राहणे हेच त्या तोताराम चे काम झाले... वडील संध्याकाळी कामावरून आले आणि त्यांना ही सगळी तोताराम कथा सांगितली व त्या खोलीच्या कोपर्‍यात बसलेल्या पोपटाकडे बोट दाखवले. बाबांनी घरी येताना काही फळं आणली होती,त्यातलेच एक फळ त्याला खायला दे असे त्यांनी मला सांगितले...त्या प्रमाणेच मी केले आणि लांबूनच त्या फळाचे तुकडे त्याच्या जवळ सरकवले.


मेजवानी खातोय या थाटात त्याने ते मटकवले. :) मी बाबांकडे हट्ट करायला सुरुवात केली,,,मला हा पोपट आता पाळायचाच आहे !!! बाबा म्हणाले.. अजिबात नाही, उद्या-परवा पर्यंत तो स्वत:च उडून जाईल त्याला त्रास देऊ नको. बाबांचा पक्षी पाळण्यास विरोध होता कारण अशा प्रकारे आकाशात स्वच्छंद उडणार्‍या पक्षाला पिंजर्‍यात कोंडून ठेवणे त्यांना मान्य नव्हते. मी भरपूर हट्ट केला...गडबडा लादीवर लोळलो, पण त्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. दुसरा दिवस उजाडला...तोताराम मस्त मजेत होते...त्याच्या साठी एका ताटलीत एक मस्त मिरची आणि एका छोट्या वाटीत पाणी पिण्यासाठी ठेवले आणि मी शाळेत निघून गेलो... शाळेत सुद्धा कधी एकदा परत घरी परत जातोय आणि त्या पोपटाशी बोलतोय असं झालं होत.

शाळेतून घरी आल्यावर आधी तोतारामची भेट घेतली...साहेब मजेत होते...आई म्हणाली,,, अरे सारखा मागे मागे फिरत असतो... स्वयंपाक घरात सुद्धा मागे उभा असतो...घाईत चुकून त्याच्यावर पाय पडला तर !!! तिला त्याला दुखापत होईल अशी भिती वाटत होती.आता काय करायचं... हा काही उडायला तयार नव्हता तेव्हा शेवटी त्याच्यासाठी पिंजरा आणायचा असे ठरले. बाबांनी मला आधीच सांगितले... तो बरा झाला ना की त्याला लगेच सोडून द्यायचे...या कबुलीवर त्यांनी पिंजरा आणण्याची तयारी दर्शवली होती. मी लगेच हो म्हणालो... मग बाबांनी त्याच्यासाठी मस्तपैकी एक छोटासा झुला असणारा पिंजरा घेऊन आले.



मला फार आनंद झाला. खिडकीत मधोमध असलेल्या एका हूक मध्ये त्याचा पिंजरा अडकवला देखील. आता येता जाता त्याच्याशी बोलणे हाच माझा छंद झाला होता. तोताराम शिट्या वाजवण्यात तरबेज निघाला. त्याच्या समोर मी एक शिटी वाजवली असता त्याने ५-६ वेगवेगळ्या शिट्या वाजवून दाखवल्या...मी चाटच पडलो...आई ज्या नावाने मला हाक मारायची त्याच नावाने तो सुद्धा आता हाक मारू लागला. शाळेतून घरी आल्यावर त्याच्याशी खेळणे हा आता नित्यक्रम झाला होता. तोताराम ची चैन चालली होती...मिरीची च्या बियाच त्याला जास्त आवडायच्या. दोन तीन दिवसांनी त्याला मस्त पैकी अंघोळ घातली.

तोतारामला आरसा दाखवला की त्याला कोणीतरी समोर दुसरा पक्षी आहे असे वाटून तो लगेच अनेक प्रकारे शिट्या वाजवून ’विठू, विठू’ असे जोरात ओरडतो, असे मला आता कळले होते. त्यामुळे कधी कंटाळा आला की मी लगेच आरसा त्याच्या समोर घेऊन जात असे. तो लगेच त्याची पोपटपंची चालू करत असे. पण अशा प्रकारे मी त्याच्या मनाशी खेळतोय याची एकदा मला अचानक जाणीव झाली आणि तसे करणे मी लगेच सोडून दिले.

आता बाबांनी सांगितले की बरेच दिवस झाले आहेत आपण त्याला सोडून येऊया. मी लगेच हट्ट करायला सुरुवात केली. मला तो जायला नको होता. बाबा म्हणाले तुला आधीच सांगितलं होत की याला आपण सोडून देणार आहोत. तरीही त्यांनी मला समजवले की जर मला त्यांनी एका खोलीत कोंडून ठेवले आणि त्यांच्या मनात येईल तेव्हाच मला खायला दिले...सतत तसेच कोंडून ठेवले तर तुला चालेल का ? मी म्हणालो नाही... मग बाबांबरोबर मी आमच्या बिल्डिंगच्या खाली एका झाडाजवळ गेलो...आणि तिथे पिंजरा उघडला...पण तोताराम बाहेर यायला तयार नव्हते...खूप पिंजरा हालवून सुद्धा तो उडाला नाही. बराच वेळ पिंजरा खाली ठेवला तरी तो काही उडाला नाही. शेवटी त्याला परत घरी आणला... जवळ पास एक आठवडा झाला असेल एकदा मी त्याचा पिंजरा घेतला आणि त्याचा दरवाजा उघडला आणि तो बाहेर आला .... क्षणभर घरात उडाला आणि आभाळात मनसोक्त उडण्यास निघून गेला.....


तोताराम विशेष :--- एकदा मी बाबांशी बोलताना पटकन त्यांना उलट उत्तर दिले, तेव्हा त्यांनी माझ्या कानफटात ठेवून दिली होती आणि मी त्याबरोबरच रडायला सुरुवात केली तेव्हा या तोताराम ने माझ्या रडण्याच्या आवाजाची तंतोतंत नक्कल केली होती आणि तो आवाज ऐकून मी आणि बाबा चक्क हसायला लागलो. पितृपंधरवड्यात आलेला हा अनामिक पाहुणा माझ्या मनात कायमचे घर करून केला.





लेखक:मदनबाण





Print Page

७ टिप्पण्या:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

तोतारामचे किस्से ऐकून आमच्या बब्बडची आठवण झाली. तोही असाच आमच्या कुटुंबाला लळा लावून गेलेला विठू होता. तो अजूनही कधी कधी स्वप्नात दिसतो.

Unknown म्हणाले...

त्या तोतारामला व्यनी ची सोय आहे का ? त्याच्या खवत उत्तर पाठवायचे होते.

Shreya's Shop म्हणाले...

ह्म्म्म्म्म्म्म्म्म, माझा मुलगाही असाच कधी पोपट, कधी मांजर तर कधी कुत्रा पाळूया म्हणून मागे लागतो. आम्ही लक्ष देत नाही त्याच्या या बोलण्याकडे हा भाग निराळा :-)

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

श्रेया, आत्ता दोनच दिवसांपूर्वी आमच्या घरात मांजर किंवा कुत्रा पाळावा का, यावर चर्चा झाली. शेवटी नकोच म्हटलं. हे मुके जीव लळा लावलात पण दुर्दैवाने ते आपल्यापासून लांब गेले तर खूप दिवस त्रास होत रहातो.

सुधीर कांदळकर म्हणाले...

लहानपणीं वाचलें होतें कीं राक्षसाचा जीव पोपटांत असतो. आतां कळलें कीं मदनबाण यांचाहि.

असो. प्रसन्न शैलीतला मस्त खुसखुशीत लेख.

सुधीर कांदळकर

Sudhir Kale म्हणाले...

झकास. लेख खुसखुशीत झाला आहे. मनापासून आवडला.

मदनबाण म्हणाले...

प्रतिक्रिया देणार्‍या सर्व मंडळींना धन्यवाद...