सोमवार, ३० नोव्हेंबर, २००९

रस्ते आणि खड्डे !

'आधी कोंबडी की आधी अंडे' हा प्रश्न जितका गहन आणि विवाद्य असू शकतो तितकाच किंबहुना त्याहून अधिकच 'आधी रस्ते की आधी खड्डे' हा विषय निदान आपल्याकडेतरी विवाद्य ठरू शकतो. रस्त्यातून खड्डे काढावेत तर ते शक्य होत नाही आणि खड्ड्यातून रस्ता काढावा तर रस्ता सापडणे शक्य होत नाही. एकूण काय तर दोन्ही बाबतीत शक्यतेपेक्षा अशक्यतेवरच भर अधिक. आमच्या लहानपणी वडिलधारी माणसे सांगत,  'आपण नाकासमोर बघून चालावे,' आता त्या उपदेशानुसार वागायचे ठरविले तर आपल्यापैकी अनेकांना अपघातामुळे हॉस्पिटलांत दाखल होण्याची पाळी येईल.

हा विषय सुचायला परवा तसेच कारण घडले. येथे मलेशियात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिपावसामुळे आमच्या विभागातील एका रस्त्यात मोठ्ठा खड्डा पडला. रात्री तो न दिसल्यामुळे गाडीच्या एका चाकाला फुगवटा आला. दुसर्‍या दिवशी संध्याकाळी गाडी हळुहळू चालवित, अंदाज घेत निघालो. पण 'अहो आश्चर्यम' ! खड्डा गायब आणि रस्ता पूर्ववत !  एका दिवसात खड्डे बुजविणे ही गोष्ट आपल्या पचनी पडणे केवळ अशक्य. आपल्याकडे ही परीकथेतील कल्पनाच ठरू शकेल. आमच्या लहानपणी गावागावातून मातीचे रस्ते होते. रस्तावरील धूळ उडवित एस. टी. मोठ्या दिमाखात निघून गेली तरी बरे वाटत असे. पावसाळ्यात अनेकवेळा चिखलात पाय रुतत असत. पण नागमोडी वळणे घेत जाणार्‍या पायवाटा तितक्याच लोभसवाण्या वाटत असत. ठाणे , डोंबिवलीसारख्या निमशहरात पावसाळ्यापूर्वी व नंतर बारीक खडी, डांबर टाकून त्यावर रोलर फिरवून खड्डे बुजविताना बघणे हा एक लहानपणीच्या कुतुहलाचा विषय असे.

त्यानंतर आले सिमेंटचे व डांबरी रस्ते. कांही महामार्ग सोडले तर आत्ताच्या रस्त्यांचे वर्णन म्यां पामराने काय करावे ! रस्त्यांपेक्षा खड्डेच अधिक. आपल्याकडे रस्ते निर्मितीच्या जाहीराती होतात, नेत्यांच्या नावांवरून वादविवाद होतात, मोठ्ठा गाजावाजा होऊन रस्ता सुरू होतो आणि पुढील पावसाळ्यात तोच रस्ता खचतो, धसकतो, अनेक खड्ड्यांमुळे म्रुत्युचा सांपळा बनतो. वर्तमानपत्रातून आरडाओरडा झाला की सरकारी फतवा निघतो रस्ता न वापरण्याचा ! पुन्हा वाहनकोंडी, तीच घुसमट. प्रचंड कामाच्या ओझ्याखाली (? )दबलेल्या नगरपालिका, महानरपालिका आणि माननीय नेत्यांचे सामान्य जनतेच्या चांगले रस्ते असावेत ह्या सामान्य अपेक्षेकडेसुद्धा लक्ष जात नाही. त्यात भर टेलिफोन, केबल, नळजोडणीवाल्यांची. खड्डे आणि खड्डेच---.

आयुष्याच्या रस्त्यावर खांचखळगे लागतात, प्रसंगी कांटे टोचतात , पाय रक्तबंबाळ होतात हे एकदम मान्य ; पण दररोजच्या जाण्यायेण्याच्या रस्त्यावरही खड्ड्यांमुळे तेच अनुभव यावेत यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती? माझ्या मनांत एक स्वप्न आहे, ते प्रत्यक्षांत उतरो हीच ईश्वर आणि आपल्या महान नेत्यांच्या(? ) चरणी प्रार्थना.

रस्ता असावा इतका मखमाली,की वाहन जावे हळुवारी.
रस्ता असावा इतका भक्कम,की त्यावरी न लागे रक्कम, (टोल )
रस्ता असावा इतका सुंदर, की वाटे जणू पंखमयूर.






लेखिका:वैशाली हसमनीस



Print Page

४ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

निरिक्षण आवडले. कोति, तोकडी, स्वार्थी वृत्तीला मागासलेपणा म्हणतात असे मला शिकवले होते. आज ह्या सगळ्यांना आरक्षण, मांन्यता मिळाली त्याचे हे परिणाम भोगावे लागतील.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

वैशालीताई, आपल्याकडे जोपर्यंत गाडीच्या चारही चाकांना फुगवटे येत नाहीत तोपर्यंत रस्त्यातील खड्डे बुजवले जात नाहीत. ’खड्डेच खड्डे चहूकडे गं बाई, गेला रस्ता कुणीकडे’, अशी आपल्याकडची परिस्थिती आहे.

सुधीर कांदळकर म्हणाले...

लेख लिहिण्यसाठीं कां होईना, रस्त्याचा वापर केलांत न? आतां भरा टोल.

छान लेख.

सुधीर कांदळकर

Sudhir Kale म्हणाले...

वैशालीताई मलेशियाला रहातात व तिथे तर जवळ-जवळ सर्व रस्ते "मखमली" (Velvet-topped) असतात हे मी स्वानुभवाने सांगतो. तिथे टोल द्यायला कांहीं वाटत नाहीं.
खरं तर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरही टोल देताना कधीच फसवणूक झाल्यासारखे वाटत नाहीं.