सोमवार, ३० नोव्हेंबर, २००९

२०१२... एक अतिरंजित थरारक रटाळपट

२००९ मध्ये भारतातल्या एका शहरात जमिनीखाली ११००० फूट खोल असलेल्या एका खाणीत पृथ्वीचं तापमान वेगाने वाढत असल्याचं जाणवतं. खाणीचा मालक आपल्या भूगर्भशास्त्रज्ञ असलेल्या परदेशी निग्रो मित्राला ही बाब निदर्शनाला आणून देतो. यामुळे २०१२ डिसेंबरच्या अखेरीस पृथ्वीवर भूकंप / ज्वालामुखी / त्सुनामी च्या माध्यमातून सर्वत्र प्रलय येऊन समस्त जीवसृष्टीचा नायनाट होणार असतो.

या गोष्टीची खात्री झाल्यावर तो भूगर्भशास्त्रज्ञ( डॉ. हेम्स बहुदा ) तसा रिपोर्ट राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षांपर्यत पोहोचवण्याची खटपट करतो. युनोची सभा बोलावण्यात येते आणि तोडगा काढला जातो की सामान्य लोकांपर्यंत ही बातमी इतक्या लवकर पोहचू न देता एक लाख माणसं मावतील एवढं मोठ्ठ जहाज तयार करायचं, सगळ्या राष्ट्रांच्या राष्ट्राध्यक्षांना, महत्वाच्या व्यक्तिंना त्यावर घेऊन जायचं. डॉ. हेम्स चा या गोष्टीला विरोध असतो पण वेळ येताच सगळ्यांना सत्य सांगू यावर त्याची बोळवण केली जाते.

साल २०१२ - ह्या सगळ्या घडामोडी चालू असताना जॅकसन नावाच्या पात्राशी आपला परिचय होतो. तो लेखक असतो, पोटाकरता ड्रायव्हरची नोकरी करत असतो. बायकोशी घटस्फोट घेऊन एकटा रहात असतो. एक मुलगा आणि एक मुलगी अशी त्याची दोन्ही मुलं बायकोबरोबर तिच्या सध्याच्या नवर्‍याकडे रहात असतात.

एके दिवशी जॅकसन आपल्या दोन्ही मुलांना घेऊन सहलीला म्हणून एका बागेत (पार्क) जातो. तिथे डॉ. हेम्स यांचे सरकारी फौजफाट्यासह निरिक्षणाचे काम चालू असते, सर्वसामान्य लोकांना या जागी यायला मनाई असते, ती अर्थातच धुडकावून ते तिघेही तिथे प्रवेश करतात, त्यांना हुसकाऊन लावण्यात येते, तत्पूर्वी डॉ. हेम्सशी जॅकसन याची गाठ पडते. तिथून हाकलल्यावर जॅकसन ची बाहेर एका वेडसर दिसणार्‍या रेडिओ प्रसारण करणार्‍या माणसाशी गाठ पडते. त्याकडून त्याला २०१२ च्या प्रलयाबद्दल कळतं. फार पूर्वीच संशोधकांनी ह्याचा शोध लावलेला असतो म्हणे आणि एका संशोधकाने त्याला प्रलयानंतर सुरक्षित राहू शकणार्‍या जागेचा नकाशा देखील पाठवलेला असतो. जॅकसन अर्थातच्‌ ही गोष्ट हसण्यावारी नेतो. या काळात प्रलयाची प्रक्रिया हळूहळू जवळ येत असते. विविध देशांच्या अतिमहत्वाच्या व्यक्तिंना जहाजावर चढवण्याचे काम चालू असते. या जहाजावरच्या एका तिकिटाची किंमत असते ६०० कोटी प्रत्येकी ! जॅकसन मुलांना सहलीला घेऊन गेल्यानंतर शहरात एका सुपरमार्केटमध्ये अचानक रस्ता खचण्याची घटना घडते. जॅकसनची घटस्फोटित बायको आणि तिचा नवरा या घटनेत सापडतात. पण सुखरूप वाचतात.

जॅकसन ज्या माणसाकरता नोकरी करत असतो; त्यानेही स्वत:करता आणि स्वत:च्या दोन गलेलठ्ठ उर्मट मुलांकरता त्या तथाकथित जहाजाचे तिकिट काढलेले असते. सहलीवरून परतल्यावर नोकरीवर रूजू झाल्यावर या तिघांना जॅकसन जेव्हा विमानतळावर सोडतो तेव्हा त्या उर्मट मुलांकडून ही प्रलयाची बातमी खरी असल्याची आणि एका जहाजाने ते कुठल्यातरी अज्ञात स्थळी जात असल्याची माहिती मिळते. ताबडतोब तिथल्याच एका चार्टर पायलटला जॅकसन स्वत:करता आणि स्वत:च्या कुटुंबाकरता घेऊन जाण्याची विनंती करतो. त्या सगळ्यांना घेऊन येण्याकरता तो बायकोच्या घरी जातो...तोपर्यंत प्रलय सुरू झालेला असतो. कसाबसा तो त्या चौघांना घेऊन गाडीने निघतो.....त्याच्या गाडीच्या मागेमागे रस्ता खचत जाण्याची क्रिया सुरू झालेली असते. आपण जीव मुठीत धरून त्या कुटुंबाच्या रक्षणाची प्रार्थना करत राहातो.

विमानतळावर पोचेपर्यंत शहरात हाहाकार उडालेला असतो. वाटेतले सगळे रस्ते खचलेले असतात....अनेक इमारती, पूल कोसळलेले असतात. अनेक अतिमहत्वाच्या व्यक्ति या गोंधळामुळे विमानतळापर्यंत पोहचू शकत नाहीत. इकडे जॅकसन त्याच्या कुटुंबासकट विमानतळावर पोचतो पण तो चार्टर पायलट मृत्युमुखी पडलेला असतो. शेवटी जॅकसन आणि त्याचे कुटुंब विमानात शिरतात....जॅकसनच्या घटस्फोटित बायकोचा नवरा प्रशिक्षण नसतानाही विमान चालावयला बसतो. विमान धावपट्टीवरून धावत असतानाच विमानतळही खचण्याची क्रिया व्हायला लागते....पुन्हा आपला जीव मुठीत....

कसबसं विमान निघालेल्या त्या कुटुंबाला आता जायचं कुठे हे माहित नसतं. इतक्यात जॅकसनला तो रेडिओ प्रसारण चालवणारा माणूस आठवतो. त्याच्याकडे नकाशा असल्याने त्याच्याकडे जाण्याशिवाय गत्यंतर नसते. मग ते विमान घेऊन त्या भागात उतरतात. त्या भागात आधी सरकारी अधिकारी तळ ठोकून असल्याने तिथे इंधन भरण्याकरता पेट्रोल पंपही सहज उपलब्ध असतात. जॅकसनची बायको पेट्रोल भरून घेत असताना तो मुलीला घेऊन त्या रेडिओ वाल्या माणसाकडे जायला निघतो. बर्‍याच खटाटोपानंतर त्याच्याकडून नकाशा कुठे ठेवला आहे याची आवश्यक ती माहिती मिळवण्यात जॅकसन यशस्वी होतो. तो नकाशा गाडीतच कुठेतरी ठेवलेला असतो. माहिती घेत असतानात समोर भलेमोठे ज्वालामुखी उसळण्यास सुरुवात होते. परिणामी हा भागही खचायला लागतो. त्या रेडिओवाल्याच्या विनंत्या करूनही तो जॅकसनबरोबर यायला कबूल होत नाही आणि निसर्गाच्या कोपाला बळी पडतो.

पुन्हा आपला जीव मुठीत ठेऊन आपण जॅकसनचा उलटा विमानाच्या ठिकाणापर्यंतचा प्रवास पाहातो. तिथेही रस्ता खचण्याची क्रिया चालूच असते. चार्टर विमान जास्त काळ थांबवणे धोक्याचे असते. जॅकसनची गाडी थांबवल्यावर पटकन त्याची बायको मुलीला घेऊन जाते आणि तो गाडीतला नकाशा शोधत असतानाच त्याच्या गाडीखालचा रस्ता फाटतो. गाडीसकट तो खाली गेला असे वाटत असतानाच एका हाताने लटकत दुसर्‍या हातात नकाशा घेऊन तो वर येतो. इथे तो गेला समजून त्याच्या बायकोच्या नवर्‍याने विमान सुरू केलेले असते. मागे रस्ता फाटतोय पुढे जॅकसन जीव खाऊन धावतोय त्याच्या पुढे विमान पळतयं अशा थरारक नाट्यात आपण सापडतो.

नकाशा उघडल्यावर त्यांना कळतं की चीन ला जावे लागेल. त्याकरता पुन्हा ते मुख्य विमानतळावर उतरतात. तिथे माणसांची नुसती झुंबड उडालेली असते. तिथेच जॅकसनला त्याचे बॉस आणि त्यांची मुलं भेटतात. त्यांचा पायलट एक विमान मिळवण्यात यशस्वी होतो पण त्याला अजून एका सहायकाची मदत हवी असते. आम्ही मदत करू असे सांगून जॅकसन कुटुंबासहित त्यांच्याबरोबर जायला निघतो. भविष्यात होणार्‍या एका ऑटो शो करता ते विमान बनवलेले असते. त्यात अनेक चकचकीत गाड्या असतात. ते सगळे विमान घेऊन चीनला जायला निघतात. प्रवासात जॅकसनला त्याच्या बॉसशी गप्पा मारताना युनोच्या प्लॅनबद्दल माहिती कळते , ते जहाज चीनला बनवले जात आहे याबद्दल कळते, एक तिकिट ६०० कोटी चे आहे हे ही कळते.

वाटेत एक एक करत त्यांच्या विमानाची सगळी इंजिन्स बंद पडतात. चीनला पोचण्याआगोदरच वाटेत उतरावे लागणार असे वाटत असतानाच अचानकपणे त्यांच्या लक्षात येतं की या प्रलयामुळे जगाचा नकाशा पार बदलून गेलाय. लांब वाटणारा चीन एकदमच जवळ आला आहे.

समोर सगळे बर्फाचे डोंगर पसरलेले असतात. त्यातल्याच एका बर्फाच्या कड्यावर विमान उतरवायचे ठरवतात. वैमानिक सगळ्यांना विमानातल्या गाड्या घेऊन निघायला सांगतो, तो लॅंड व्हायच्या आधी त्या सगळ्या प्रवाशांनी बाहेर पडणं गरजेचं असतं...त्याप्रमाणे ते करतात...पुढे जाऊन विमान कड्यावर थांबते पण तो कडा कोसळून शेवटी वैमानिक जीव गमावतोच.

चीन जवळ उतरल्यावर तिथलं लष्कर त्यांना ताब्यात घेतल्यावर जॅकसनचा बॉस स्वत:कडे ग्रीन कार्ड असल्याचं सांगून मुलांना घेऊन पळ काढतो, अगदी इतका वेळ बाळगलेल्या आपल्या मैत्रिणीलाही तो तिथेच सोडून निघून जातो. ते निघून गेल्यावर उरलेली मंडळी रडून भेकून त्या लषकराचे मन वळवण्यात यशस्वी होतात आणि तिथून निघतात.

योगायोगाने त्यांना जी जहाजे बनवली जात असतात त्यात कामगार म्हणून काम करणार्‍या एका चीन्याची (तेनसिंग) आजी भेटते , तिला पटवून....तिच्याकरवी तिच्या त्या नातवाला पटवून नातू त्यांना लपवून जहाजावर न्यायला कबूल होतो. त्याप्रमाणे तसा तो त्यांना नेतो आणि खालच्या बाजूला जहाजाची यंत्रणा आणि प्राण्यांच्या पिंजर्‍याबरोबर त्यांची व्यवस्था करून देतो.

इकडे डॉ. हेम्स चे राष्ट्राध्यक्ष मात्र जहाजावर जायला ठाम नकार देतात. आपल्या मुलीला पाठवून ते मात्र जनतेबरोबर मागेच रहाणे पसंत करतात. असे काही अपवाद वगळता इतरत्र मात्र माणसांची स्वार्थी वृत्ती ठायी ठायी दिसते.

१ च्या ऐवजी ४ जहाजे तयार होत असतात. प्रलयाने सगळीकडे हाहाकार माजलेला असतानाही जनतेपासून ही बातमी दडवून फक्त उच्चभ्रूंची भलावण केली जात असते. डॉ. हेम्स या गोष्टीला विरोध करतो. "प्रलयापासून मानवजमात वाचावी म्हणून आपण प्रयत्न करत आहोत पण ही मोठी जहाजे ज्यांनी आपल्याकरता तयार केली त्यांना सोडून आपण गेलो तर माणुसकी म्हणून काय शिल्लक राहिले ?" असा सवाल तो विचारतो. "इतकेच काय ज्या माझ्या भारतीय मित्राच्या तत्पर माहितीमुळे आज आपण जिवंत आहोत तो मात्र त्याच्यापर्यंत कोणतीही मदत न पोचल्याने मृत्युमुखी पडतो. जहाज सगळ्या लोकांकरता खुलं व्हावं , जितक्या जणांना आपण वाचवू शकू त्यांना वाचवायला हवं कारण शेवटी त्यांनाही जगण्याचा हक्क आहे.” हे तो ठासून सांगतो. इतर राष्ट्रं त्याला मान्यता देतात आणि बंद जहाजाचे दरवाजे सामान्य लोकांकरता खुले केले जातात. जहाज उभे असलेल्या भागात त्सुनामी यायला फक्त २८ मिनिटे बाकी असतात.

जहाजाच्या यंत्रभागात जॅकसनसोबत त्या चीनी कामगाराचे आजी-आजोबा, भाऊ, जॅकसनच्या बॉसची मैत्रीण , कामगार स्वत: असे जवळपास १० जण असतात. दरवाजे उघडायचे ठरवल्यावर यंत्र फिरल्यावर त्यात जॅकसनच्या बायकोचा नवरा मृत्युमुखी पडतो, शेजारीच ड्रिलने काम करत असलेला चीनी कामगार तेनसिंग दोन यंत्रांच्या मध्ये सापडून पाय जायबंदी होतो आणि ड्रिल मशीन खाली पडून अडकून बसते.

दरवाजे उघडल्यावर सगळी लोकं आत शिरतात. उघडलेला दरवाजा ड्रिल्मशीन अडकून बसल्यामुळे बंद होऊ शकत नाही. जहाजाच्या यंत्रणेवर मशीनमध्ये काही तरी अडकल्याची सूचना मिळत असते. तिथे माणसांची हालचाल दिसायला लागते. क्लोज्ड सर्किट टिव्ही वर जॅकसन सकट इतर माणसं दिसायला लागतात. डॉ. हेम्स कडून त्याला सूचना देऊन ते ड्रिल मशीन त्याच्याकडून काढून घेतले जाते. पुढे ते जहाज प्रवासाला लागते.....सगळे धक्के पचवते....२७ दिवसानंतर कोणत्यातरी शांत ठिकाणी ते प्रवास करताना दाखवले आहे. ४ पैकी १ जहाज तयार होत असतानाच प्रलयाला बळी पडते. त्यामुळे एकाशेजारी एक अशी तीन जहाजे प्रवास करताना दाखवली आहेत. डॉ. हेम्स मानवजातीला, काही प्राण्यांना, दुर्मिळ वस्तूंना प्रलयापासून यशस्वी होतो. ह्या शेवटच्या भागात अनेक भावनिक दृश्य दाखवून भाग जास्तच रटाळ केला आहे.
------------------------------

मुलाच्या हट्टापायी आम्ही हा हिंदीत डब केलेला भिकारपट पहायला गेलो होतो. एकतर आधी सगळ्या वाहिन्यांनी २०१२ साली प्रलय येणार असल्याच्या वावड्या उठवल्या होत्या म्हणून जरा उत्सुकता होती. पण हिंदी डबिंग इतकं बेकार आहे....की ओघवती भाषा वापरण्याच्या ऐवजी वाक्याचं वाक्याला भाषांतर केलं आहे. त्यामुळे हिंदी चित्रपट पहाण्याचा आनंद मिळत नाही. शिवाय प्रलयाच्या सगळ्या दृष्यांना कंठाळी संगीत आणि लोकांच्या संवादाला मात्र तोंडात पुटपुटल्यासारखं बोलणं....त्यामुळे जवळपास अर्धा पाऊण तास चित्रपटात काय चालले आहे हेच कळत नव्हते. कोलाज जोडावे त्याप्रमाणे सगळे तुटक तुटक वाटतं होते. कशाचाच कशाला मेळ नव्हता.

एका भारतीय खाणमालकामुळे हा निसर्गकोप वेळेवर लक्षात येऊ शकला हे जरी खरं असलं तरी भारतीय जनतेचा एकही प्रतिनिधी त्या जहाजावर घ्यावा असे दिग्दर्शकाला वाटले नाही. भारतीय जनता त्सुनामी खाली असहाय्य पणे मरतानाच पहावे लागले.

हा प्रलय कशामुळे येणार असतो हे नेमके काही कळूच शकले नाही. खाणमालाकाच्या बोलण्यातून सूर्याच्या उष्णतेने पृथ्वीचा गाभा खूप तापल्यामुळे हे घडणार आहे असे वाटते. तर त्या रेडिओ प्रसारकाच्या बोलण्यातून सगळे ग्रह एका रेषेत आल्याने हे घडणार आहे असे प्रतीत झाले. शेवटपर्यंत खरे काय ते कळूच शकले नाही.

थरारक दृष्य इतकी सतत आहेत की त्यातली थरारकता नाहीशीच होऊन जाते. सतत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळणार्‍या इमारती, खचणारे रस्ते, उडणारे धुळीचे लोट, इतकं सगळं होऊनही जॅकसन आणि त्यांच्या कुटुंबियांना साधं खरचटत सुद्धा नाही याचं कमालीच आश्चर्य वाटतं आणि मग सगळं बेगडीच वाटायला लागतं. शेवटी जॅकसन जीवावर उदार होऊन कुटुंबियाकरता निघालाय , त्याला काहीही होणार नाही, किंबहुना दिग्दर्शक त्याला काही होऊच देणार नाही याची पक्की खात्री वाटायला लागते.

तंत्रज्ञान पुढे गेलंय हे जरी वास्तव असलं तरी बाहेरून घरात शिरल्यावर मोबाईलचं नेटवर्क जाणार्‍या म्या पामराला, इतका उत्पात होऊनही सगळ्या माणसांना सगळीकडे मोबाईलचं नेटवर्क, जहाजाचं नेटवर्क सुरळीत चालताना पाहून थक्कचं व्हायला झालं. नाही म्हणायला २०१२ ला प्रलय नाही आला तरी परिस्थिती इतपत सुधारलेली असेलशी आशा करायला हरकत नाही.

आवर्जून तिकिट काढून तर सोडाच पण फुकट मिळालेल्या तिकिटावरही पहावा असा हा चित्रपट अजिबात वाटला नाही.लेखिका : माझी दुनिया


Print Page

३ टिप्पण्या:

व्हीके म्हणाले...

जहिरातबाजीने बाजी मारली. थोडा खिसा नाही . . तुमचीच पर्स थोडी खाली केल्यावर आम्हाला सावध केलेत ह्याबद्दल आभार.

माझी दुनिया म्हणाले...

धन्यवाद रानडे साहेब

कांचन कराई म्हणाले...

मला आजपर्यंत एकाही व्यक्तीने या चित्रपटाबद्दल चांगलं सांगितलेलं नाही. आता असं वाटतंय, बरं झालं बेत बदलला. श्रेया, धन्यवाद.