मंगळवार, १ डिसेंबर, २००९

गुंतवणुकीतील निर्गुंतवणुक !


भविष्याकरिता गुंतवणूक हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आपण कष्टाने कमावलेला पैसा अश्या योग्य जागी गुंतवावा, की जो पुढे मागे आपलं आयुष्य सुकर करू शकेल याविषयी कोणाचंच दुमत नसावं. मी सुद्धा याच हेतूने गुंतवणूक बाजारात माझे पाऊल टाकले.
आपण मराठी माणसे शेअरबाजाराकडे अगदी अलिकडच्या काळापर्यंत एक जुगार म्हणून पहात होतो. बिग बुल हर्षद मेहता याच्यामुळे तर या विधानाला पुष्टिच मिळते. त्या सुमारास मी महाविद्यालयात होते, पण ते प्रकरण वाचून "बरं झालं, मित्रांच्या नादी लागून शेअरबाजारात पैसा घातला नाही ते!” हे माझ्या वडिलांचे उद्गार आजही त्यांच्या सोडलेल्या सुस्कार्‍यासकट माझ्या कानात घुमत आहेत. त्याकाळी युटिआय ची गुंतवणूक ही मध्यमवर्गीय माणसांकरता उत्तम आणि खात्रीची समजली जायची. एक तर पगार फारसे नव्हते, दुसरं म्हणजे कुंटुंबे मोठी होती, तिसरं म्हणजे विमा ही गरज वाटावी इतपत जीवनशैली बदललेली नव्हती. युटिआय ने त्यावेळेस अनेक योजना काढून विविध पर्याय लोकांसमोर ठेवले होते. युटिआय वर सरकारचे नियंत्रण असल्याने इतर कोणत्याही म्युचल फंडापेक्षा युटिआय लोकांना खात्रीचा वाटत असे. पुढे आलेल्या युएस ६४ मधल्या वादळाने हा विश्वास फोल ठरवला आणि सब घोडे बारा टक्के हा नियमही शाबूत ठेवला.
पुढे जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले, तंत्रज्ञानातही प्रगती झाली आणि संगणकावरच्या एका टिचकीने जग जवळ आले. शेअर बाजारातल्या रिंग मधल्या लिधो-दिधो च्या प्रत्यक्ष गदारोळात न पडता देखील घरबसल्या उलाढाल करता येऊ लागली. शेअर बाजार म्हटला की चार हात लांब पळणारी मराठी माणसे यात प्रत्यक्ष सहभाग घेऊ लागली. याच दरम्यान इंडिया शायनिंग चा नारा सुरू झाला. तत्पूर्वी तीन-साडेतीन हजाराच्या आसपास घुटमळणारा सेन्सेक्स चक्क सहा हजाराच्या भोज्ज्याला शिवला. याच कालावधीत मुंबईच्या धबडग्याला कंटाळून पुण्याला स्थाईक झालेल्या आमच्या एका जवळच्या नातेवाईकांनी शेअर बाजाराची वाट चोखाळली आणि चक्क त्यातल्या फायद्यातून त्यांच्या राहात्या २ बीएचके फ्लॅटशेजारीच तेवढाच दुसरा फ्लॅट घेण्याची किमया करून दाखवली. मग मात्र आपण उगाचच शेअर बाजाराचा बाऊ करतो आहोत असे वाटायला लागले. हितचिंतकांनी(?) मला सावध रहाण्याचे सल्ले देऊन घाबरवण्याचा एक क्षीण प्रयत्न केला पण अर्थातच माझ्या यशावर(?) जळू पहाणार्‍यांचा डाव हाणून पाडत मी "त्यात काय कठीण आहे; शेअर घ्यायचे आणि भाव वाढला की विकून टाकायचे, आहे काय नी नाही काय!” असा सूज्ञ विचार करून बाजारातील गुंतवणूकीकरता मी माझ्या असलेल्या गुंतवणूकीची निर्गुंतवणूक करायला शुभारंभ केला.
सगळ्यात प्रथम काही हजार भरून २४ तास चालणारे इंटरनेट बसवून घेतले आणि दरमहा ठराविक रक्कम खर्चायची सोय (?) करून ठेवली. त्यानंतर ऑनलाईन व्यवहारांकरता माझ्या त्याच नातेवाईकांच्या सल्ल्याने त्यांच्याच मुंबईतल्या दलालाकडे पुनश्च: काही हजार भरून माझे खाते उघडायचा बहुमान दिला. खाते उघडताना दलालाने इन्व्हेस्ट करणार? की ट्रेडींग करणार? अश्या विचारलेल्या प्रश्नाला "अर्थात् इन्व्हेस्ट" असे बाणेदार उत्तर दिले. प्रत्यक्ष गुंतवणूकीचा सोहळा काय वर्णावा! ह्या दोन्ही प्रकारात जमीन-आसमानाचे अंतर आहे हे आसमानात गेलेल्या भावाला शेअर खरेदी करून भाव वाढण्याच्या वाट पहाण्याला कंटाळून जमिनीवर असतानाच विकल्यावर लक्षात आले. मी इन्व्हेस्ट करणार असे सांगितल्याने मला दलालाकडून इन्व्हेस्टर टर्मिनल मंजूर करण्यात आला होता. त्यावर दलालाकडून टिप्स मिळण्याची सोय नव्हती. “आपल्याला दलालाकडून टिप्स मिळतात, त्या थोड्या आणि थोडा आपला अभ्यास असे मिळून ट्रेडींग करायचे, जमेल हळूहळू" इति यशस्वी नातेवाईक. आता अभ्यास पण करावा लागणार की काय? आणि गुंतवणूकीकरता आलोय तर ट्रेडींग चा काय संबंध यांत? आता टिप्स मिळण्याकरता दलालाच्या एका सॉफ्टवेअरची गरज होती, ज्याकरता जास्त रक्कम भरून आणि शिवाय दरमहा एक ठराविक रक्कम गुरूदक्षिणा म्हणून त्या दलालाला द्यावी लागणार होती. आलीया भोगासी असावे सादर.
शेवटी एकदाचे ते सॉफ्टवेअर मिळवले. आता काय टिप्सच टिप्स. त्यातली कोणती घ्यावी आणि कोणती नाही हे कळेना. एक ना धड भाराभर चिंध्या. एखादी टिप सोडून द्यावी तर नेमका तो शेअर वाकुल्या दाखवत पार आभाळाला पोचे, एखादी घ्यावी आणि गुंतवावे तर भाव घेतलेल्या किमतीच्याही खाली जाऊन एक तर नुकसान होई किंवा भाव वाढल्यावर विकू म्हणून अंगावर पडे. बरं एखाद्या व्यवहारात फायदा होतो आहे म्हणून थांबावे, अजून फायदा होईल याची वाट पहावी तर सगळा झालेला फायदा काढून घेऊन भाव पुन्हा जैसे थे! इथे माझ्या ’एकदा भाव वाढायला लागला की परत उलटा खाली येत नाही’ या मुद्द्यालाच बाजाराने धोबीपछाड घातल्याने मला एकदम कात्रीत पकडल्यासारखे झाले होते. मिळणार्‍या टिप्स मध्ये नेहमी लॉंग, शॉर्ट, स्टॉप लॉस असे शब्द असायचे. त्यांचे अर्थ मला काही केल्या कळत नव्हते. लॉस तर स्टॉप व्हावा ही इच्छा होती पण तो कसा हे काही कळेना! त्यांनी सांगितल्याप्रमाणे करूनही लॉस होतच होता. वाणिज्य शाखेत असल्याने मला शॉर्ट आणि लॉंग चा अर्थ शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म असा माहित होता. त्यामुळे एखादा शेअर शॉर्ट करा अशी टिप मिळाली की मी तो शॉर्ट टर्म अश्या अर्थाने विकत घेत असे. साहजिकच त्याचा भाव उतरल्याने एक तर विकले की नुकसान व्हायचे नाहीतर तसेच पडून राहून पैसे अडकायचे. खेळत्या भांडवलाची ददात पडू लागल्याने पुन्हा पदरमोड करून नविन पैसे गुंतवले. प्रत्यक्षात शॉर्ट चा अर्थ वेगळाच होता. भाव वाढलेले असताना विकायचे आणि भाव उतरल्यावर विकत घ्यायचे हे यातले तंत्र पण ते पाळायचे कसे? मुळात माझ्याकडे नाहीतच ते विकणार कसे? या घोळात अनेक दिवस गेले. कोणतीही टिप वापरली तरी फायदा काही फारसा होत नव्हता. शिवाय मला नुकसान झाले तरी दलालाला त्याची दलाली मिळत असल्याने त्याची चांदीच होती. धरले तर चावते, सोडले तर पळते अशी गत झाली होती.
इतरांना फायदा होतो / होऊ शकतो पण आपल्याला नुकसान का? शेअर बाजाराचा रोजचा अभ्यास पाहिजे म्हणजे काय? हे प्रश्न डोक्यात थैमान घालत होते. असेच एकदा महाजालावर शोधताना गुंतवणूकदारांकरता असलेले एक चर्चासत्र सापडले. विविध शेअर्सचे आलेख, इंडिकेटर्स, सॉफ्टवेअर्स अश्या विषयांवर तिथे इतक्या चर्चा चालू होत्या की कोण बरोबर आणि कोण चूक हेच कळेनासं झालं. आता प्रत्यक्ष गुंतवणूक सोडून मी या चर्चासत्रात रमायला लागले. तिथल्या रोजच्या चर्चांचा फडशा पाडायला लागले. तिथे चर्चिले गेलेले इंडीकेटर्स, त्यावरची ईबुक्स कोळून प्यायले. रिट्रेंचमेंट, टाईम ऍनालिसिस, गान ऍनालिसिस, फिबोनाकी नंबर्स , मुव्हिंग ऍवरेज, MACD , RA, Stochastics इ. संकल्पना समजून घेतल्या आणि ताज्या दमाने बाजारात उतरले. पण हाय रे कर्मा ! कारण आता ह्या शिकलेल्या माहितीचा उपयोग करण्याकरता मला शेअर्सच्या रोजच्या भावांची(भावकॉपी) गरज होती, ती रोज सकाळी ९.५५ पूर्वी माझ्या हातात पडायला हवी, शिवाय त्या माहितीचा उपयोग करून चार्ट्स दिसायला आणि त्यावर इंडिकेटर्स चा वापर करायला सॉफ्टवेअरची गरज होती. इकडे सेन्सेक्स ६ हजारावरून १२ हजारावर पोचला तरी आम्ही बुडीत खात्यातच होतो. मधल्या काळात काही पैसे भरून क्लास ही करून झाले होते. परीणाम मात्र शून्य.
चर्चासत्रावर शोधताना भावकॉपी आणि सॉफ्टवेअर पुरवणार्‍या काही मोफत संकेतस्थळाची माहिती मिळालेली होती. ती उतरवून, वापरून पाहिली परंतु मोफत असल्याने त्यात काही त्रुटी होत्या. ओतप्रोत भरलेले ज्ञान पण वापरण्याजोगी परिस्थिती नाही अश्या तिढ्यात मी अडकले होते. एखादे नावाजलेले सॉफ्टवेअर विकत घ्यावे तर हातातले भांडवल संपायला आले होते. आमदनी अठ्ठनी खर्चा रूपय्या अशी स्थिती आली होती. पण आता मी इरेलाच पेटले होते. काही दिवसानी त्या चर्चासत्रातच मला हवी होती तशी संधी मिळाली. एक नवे कोरे नावाजलेले सॉफ्टवेअर ६० हजाराला होते. पण ज्याने ते घेतले होते ; त्याला म्हणे शेअर बाजारातल्या नवशिक्यांना मदत करायची इच्छा होती. त्यामुळे एकूण १२ जणांना प्रत्येकी ५ हजाराला ते द्यायचा उदारमतवादीपणा (?) त्याच्याकडे होता. कसलाही मागचा पुढचा विचार न करता पैसे भरून ते सॉफ्टवेअर पदरात पाडून घेतले. एव्हाना बाजाराने १८ हजाराची पातळी ओलांडली होती. ताज्या दमाने मी बाजारात उतरले. आता आपल्यात आणि यशात फक्त दोन बोटे अंतर आहे असे वाटले. पण प्रत्यक्ष सॉफ्टवेअर वापरताना लक्षात आले की आपल्याला हवे तसे निकाल त्याच्याकडून मिळण्याच्या दृष्टीने त्यातले फॉर्म्युले बदलावे लागणार आहेत. पण ते कोणाला येतयं! त्याकरता प्रोग्रॅमिंगची भाषा माहिती हवी. आता मात्र हळूहळू वैताग यायला लागला. नालाकरता घोडा खरेदी केला की काय असे वाटून गेले. काय करावे म्हणजे आपल्याला निश्चित यश मिळेल हे काही केल्या कळेना. आतापावेतो बाजार २१ हजाराला पोचला होता. सगळीकडे आनंदीआनंद चालू होता. सावध रहा अशी सूचना अर्थमंत्र्यांनी दिली होतीच पण मुळातच नुकसानीत असताना अजून काय सावधपणा बाळगायचा हा प्रश्न होताच.
आणि....... अशाच एका काळ्या कुट्ट दिवशी बाजार जो काही आपटला आणि माझ्या गुंतवणूकीची निर्गुंतवणूक करून गेला की काही विचारू नका.....त्यातून अजूनही बाहेर पडू शकलेले नाहीये. :(
लेखिका : माझी दुनिया

Print Page

३ टिप्पण्या:

व्हीके म्हणाले...

बाहेर पडला असता तर आमची भेट झाली नसती. हा एक जमेचा भाग. ह्या बाजारातून फायदा करणारे कीती व जीव गमावणारे कीती असा हिशेब करावा असे जाणवले.

माझी दुनिया म्हणाले...

तुमच्या ’नशिबाचा’ यात जबरदस्त हात आहे. त्याचा वरदहस्त असल्याशिवाय काही होत नाही हेच खरे.

कांचन कराई म्हणाले...

अरे बापरे! भारीच प्रकरण आहे म्हणायचं! माझी एक मैत्रीण कायम शेअर्सबद्दल बोलत असायची. तिला किती फायदा नि किती तोटा झाला माहित नाही पण तिचं बोलणं ऐकून मलाही वाटलं होतं की शेअर्स म्हणजे हाय काय नि नाय काय! पण इथेही भरपूर अभ्यास आणि संयमाची गरज आहे तर!