मंगळवार, १ डिसेंबर, २००९

मुशर्रफ युगाचा शेवट

२००७ साल उजाडले आणि हळू-हळू ज. मुशर्रफ़ अमेरिकेच्या गळ्यातले एक लोढणे बनू लागले होते कारण इस्लामी अतिरेक्यांशी लढण्याऐवजी व लोकशाही आणण्याबद्दलच्या आधीच्या "शेंडी तुटो वा पारंबी तुटो, मी पाकिस्तानात लोकशाही आणणारच, कारण मी लोकशाहीचा खंदा पुरस्कर्ता आहे" अशा राणा भीमदेवी गर्जनांसह दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याऐवजी मुशर्रफ़ यांनी हुकुमशाही सातत्याने राबवत ठेवली होती व त्यानुसार चाललेला त्यांचा बेमुर्वतपणाही वाढला होता. त्यामुळे सर्व पाकिस्तानी जनता चिथावली-डिवचली गेली होती व तिथे हिंसेचा डोंब उसळून या अण्वस्त्रसज्ज राष्ट्रात कमालीचे अस्थिर वातावरण निर्माण झाले होते. जुलै २००७ मध्ये लाल मस्जिद प्रकरण झाल्यानंतर तर हा क्षोभ आवरण्याच्या पलीकडे गेला!
 
मियाँ मुशर्रफच्या दृष्टीने हा अगदी कसोटीचा काळ होता. पाकिस्तानच्या न्यायसंस्थेने नेहमीच लष्करशहांच्या बाजूने न्याय दिला होता व हेतुपुरस्सरपणे अशा लष्करशहांच्या उद्योगांना/कारवायांना कायदेशीर चौकट प्रदान केली होती असे पाकिस्तानचा इतिहास सांगतो. पण मुशर्रफच्या कसोटीच्या काळात परिस्थिती जराशी बदलली होती कारण पाकिस्तानी लष्करावर चोरी, भ्रष्टाचार, निवडणुकीत मुद्दाम केलेले गैरव्यवहार वगैरेबद्दलचे आरोप करू शकणारा एक नवा व स्वतंत्र आवाज उदयास आला होता.


या स्वतंत्र आवाजाने लष्करी हुकुमशाहीला एक आव्हान दिले होते व त्याची परिणती न्यायमूर्ती इफ्तिकार मुहम्मद चौधरी या सरन्यायाधीशांच्या तडका-फडकी केलेल्या उचलबांगडीत झाली होती. एरवी दोन पक्षातल्या भांडणांचा फायदा घेऊन व त्यातून उद्भवलेले खटले चालवून त्यातून वसूल केलेल्या भरपूर बिदागीवर छानछोकीत रहाणार्‍या वकीलवर्गाने या वेळी सर्व राज्यांच्या राजधान्यांत खूप उग्र निदर्शनें करून जनजीवन पार विस्कळित करून टाकले होते. इतरत्र काश्मीरच्या व अफगाणिस्तानच्या लढाईत भाग घेऊन तावून-सुखावून बाहेर पडलेल्या मुस्लिम उग्रवादी संघटनांनी व गटांनी ही संधी साधून मुशर्रफ यांच्यावर जबरदस्त दडपण आणले. एका बाजूने खासगीत जिहादी गटांची प्रशंसा करायची व दुसर्‍या बाजूने अमेरिकेच्या बाजूने युद्धात उतरून त्यांच्या ध्येयांचा घात करायचा असे प्रकार केल्याबद्दल पाकिस्तानी लष्कराशी व गुप्तहेरखात्याशी जवळीक असलेल्या कांहीं गटांनी लष्करशहांवर दुटप्पीपणाचे आरोपही केले. अमेरिकेच्या दृष्टीने सगळ्यात काळजीची गोष्ट ही होती कीं तालीबान ही संघटनाही नव्याने नुसती उभी राहिली होती असेच नाही तर ती चांगली बोकाळली होती व वजीरिस्तानात व वायव्य सरहद्द प्रांतात त्यांनी खोलवर उभ्या केलेल्या नव्या तळांचा वापर करून त्यांचे गैरसरकारी सैनिक (militia) ’नाटो’ फौजांवर उग्र हल्ले करू लागले होते. त्यात अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांना डावलून ते त्यांचा पगडा सरहद्दीपलीकडील पाकिस्तानात वाढविण्यात गुंतले होते. अशा तर्‍हेने १९९९ साली ’कुदेता’द्वारा सत्तेवर आल्यापासूनचा इतिहास पहाता त्यांचा दरारा आता झाला होता इतका कमजोर या ८ वर्षांत कधीच झाला नव्हता. पक्षीय राजकारण तर नाजूक होतेच. तरीही २००७ साली व्हाईट हाऊसने (वेळेच्या अभावी व एकाद्या अस्सल व टिकाऊ तोडग्याआभावी) अमेरिकेच्या सर्व विदेशनीतिज्ञांनी व सर्वपक्षीय "आंतरराष्ट्रीय पेचप्रसंग समिती"च्या (International Crisis Group) सभासदांनी एकमताने पाकिस्तानच्या अस्थिरतेचे मूलभूत कारण म्हणून "गौरविलेल्या" मुशर्रफसारख्या नालायक राज्यकर्त्याला कायदेशीर दर्जा प्रदान करून त्याला वाचवले व वरवरची मलमपट्टी करण्याचा निर्णय घेतला व आगीत तेलच ओतले.मुशर्रफ यांनी लष्करी गणवेश उतरवायचा आणि एक बिनलष्करी (मुलकी) नागरिक या नात्याने राष्ट्रपतीपद भूषवायचे आणि मग मग सार्वत्रिक निवडणुका घ्यायच्या अशा एका "सुवर्णमध्य" सौद्याचा पाठपुरावा उपपरराष्ट्रमंत्री रिचर्ड बाऊचर यानी सुरू केला.जरी १९९० नंतरच्या दशकात त्या दोनदा पंतप्रधानपदी असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झालेले असले तरी पाश्चात्य देशात शिकलेल्या व पाश्चात्य विचारसरणीशी जवळीक असलेल्या, कांहींशी धर्मनिरपेक्ष विचारसरणी असलेल्या व मुख्य म्हणजे पाकिस्तानात अद्यापही खूप लोकप्रिय असलेल्या बेनझीर भुत्तो यांना "वासरात लंगडी गाय शहणी" या नात्याने निवडणुकी नंतरच्या सरकारात पंतप्रधान म्हणून निवडावे असा बाऊचर यांचा प्रस्ताव होता.
पण या "मुशर्रफ बचाओ" योजनेच्या मार्गात लक्षणीय अडचणी होत्या. कारण मुशर्रफ यांना बेनझीरबद्दल तर बेनझीरला मुशर्रफबद्दल पूर्ण तिरस्कार होता. आणि हा तिरस्कार इतक्या पुढच्या पायरीवर गेला होता कीं या दोघात तडजोड घडवून आणण्यासाठी अबू धाबीत गुप्ततेत आयोजलेली आणि समोरासमोर झालेली भेट अतीशय भावनाप्रधान ढाच्यात झाली.
दोघांच्यात मतभेदांची एक दरीच पसरली होती व ती ओलांडणे सोपे नव्हते. बेनझीरबाई लंडनहून रात्रभर प्रवास करून अबू धाबीला पहाटे पोचल्या होत्या. जरी दमल्या असल्या तरीही त्या मद्यपान करत नसल्यामुळे तशा तरतरीत होत्या. याउलट त्या बैठकीत मुशर्रफ़ इतके दारूच्या नशेत होते कीं त्यांना सुसंगतपणे बोलायला अडचण येत होती असे बेनझीरबाईंच्या सहप्रवाशाने सांगितले. . त्यांनी अशा भेटीसाठी अबूधाबीसारख्या जागेची निवड केल्याबद्दल नाराजी दर्शविली कारण जिथे लाखोंनी पाकिस्तानी लोक नोकरीसाठी आले आहेत अशा कुणीही त्यांना ओळखले असते तर या गुप्ततेतील हवाच निघून गेली असती. याला मुशर्रफ यानी काय उत्तर द्यावे? "तुम्ही बुरखा का नाहीं वापरला?" असा मूर्ख प्रतिप्रश्न मुशर्रफ़ यांनी केल्यावर मैत्रीचा उरला-सुरला धागाही ताणला गेला.
बरेच महिने ही चर्चासत्रे चालू राहिली. या दरम्यान पाकिस्तानातील अंतर्गत परिस्थिती आणखीच चिघळत चालली व शेवटी सप्टेंबर २००७ मध्ये दुसर्‍या भेटीनंतर एक तात्पुरता करार करण्यात यश आले. त्यानुसार मुशर्रफ आपले लष्करी पद सोडून एक साधे (बिनलष्करी) नागरिक म्हणून राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवतील व भुत्तो कुटुंबियांविरुद्धचे सर्व फौजदारी आरोप मागे घेतील आणि त्याच्या मोबदल्यात अण्वस्त्रांचे खाते, परराष्ट्रनीती, देशांतर्गत व बाह्य सुरक्षा आणि वार्षिक अर्थसंकल्पातील वरील खात्यांच्या तरतुदी लष्कराकडेच ठेवायला बेनझीरबाई तयार झाल्या. आधी पंतप्रधानपदी असतानाचा लष्कराकडून पूर्वी झालेल्या अपमानाचा व पदच्युतीचा पूर्वीचा कटु अनुभव बाजूला ठेऊन बेनझीरबाई पाकिस्तानच्या भवितव्यासाठी या कराराला तयार झाल्या.


पण सौदी अरेबियात हद्दपारीची शिक्षा भोगणारे व मुशर्रफकडून कुदेताद्वारे पदच्युत झालेले आणखी एक पूर्व पंतप्रधान नवाज शरीफ यांचा मनसुबा कांहीं वेगळाच होता. याच सुमारास त्यांनी पाकिस्तानला परतून "पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज" या पक्षाचे नेतृत्व स्वीकारण्याचा मनसुबा जाहीर केला. "मुशर्रफ याना घालवलेच पाहिजे. ते आता संपलेच आहेत" असे त्यांनी त्यांच्या लंडन येथील सदनिकेत जमलेल्या त्यांच्या पुरस्कर्त्यांना सांगितले.
बेनझीरबाईंच्या पाकिस्तानभेटीची पूर्ण आखणी करायच्या दृष्टीने बाऊचर यांच्या दुबई (बेनझीरबाईंशी बोलायला-त्या आता दुबईत हद्दपार म्हणुन रहात होत्या) व इस्लामाबाद (मुशर्रफ यांच्याशी बोलायला) अशा वार्‍या चालू होत्या. तेवढ्यात १० सप्टेंबर रोजी माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकिस्तानला जाण्यासाठी लंडनच्या हीथरो विमानतळावरून प्रयाण केले. त्यांच्या एकनिष्ठ अनुयायांनी इस्लामाबाद येथे त्यांच्या वीरोचित आणि भव्य स्वागताची तयारी केली होती, पण ते एक दिवास्वप्नच ठरले. आपल्या समर्थकांना भेटण्याची संधीही त्यांना न देता या माजी पंतप्रधानांना पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेने इस्लामाबाद विमानतळावरच अटक केली व कांहीं तासातच त्यांची पुन्हा सौदी अरेबियाला रवानगी केली.
आता बेनझीरबाईंना जलद पावले उचलणे जरूरीचे होते. "जन्माची वेळ व मृत्यूची वेळ विधिलिखितच असते व कुणीच त्या विधिलिखितात लिहिलेल्या वेळेच्या आधी मरत नाहीं." असे भुत्तोबाई बर्‍याचदा आढ्यतेखोरपणे म्हणत. "पाकिस्तानचे राजकारण आम्हा भुत्तोंच्या रक्तात खोलवर भिनलेले आहे तसेच ते माझ्याही रक्तात सतत दौडत आहे." असे सांगून १८ ऑक्टोबर २००७ रोजी बेनझीरबाई कराची विमानतळावर उतरल्या. सारे विमानतळ व बेनझीरबाईंना व त्यांच्या बरोबरच्या पाकिस्तान पीपल्स् पार्टीच्या नेत्यांना व पत्रकारांना नेणासाठी आयोजलेल्या बसला लाखोंचा गराडा पडला. त्यातले बरेचसे PPP चे अनुयायी होते, पण ’गंमत पहायला’ म्हणून आजूबाजूच्या सोसायट्यांमधून आलेले लोकही होते. लष्करी राजवटीच्या वरवंट्याखाली संथ-सुस्त व भविष्याबद्दल भयग्रस्त असलेल्या पाकिस्तानी जनतेत भुत्तोबाईंच्या आगमनाने एक उत्साहाची व अपे़क्षेची लाट उसळली होती. अफाट जनसमुदाय व त्याचा अनोख उत्साह पाहून "बेनझीरला कोण विचारतोय्. ती एक संपलेली शक्ती आहे" असे अनुदार व कुत्सित उद्गार त्यांच्या आधीच्या भेटींत मुद्दाम काढणार्‍या मुशर्रफना एक धक्काच बसला होता.
बेनझीरबाईंची ही रथयात्रा व संचलन ८ तास चालल्यावर एक धमाका, पाठोपाठ एक लखलखाट व नंतर एक प्रचंड स्फोट झाला! बेनझीरबाईंच्या या आनंदयात्रेत एकच गोंधळ माजला व घबराट उडाली. पहावे तिकडे रक्त आणि प्रेते विखुरलेली दिसत होती. दोन आत्मघाती अतिरेक्यांनी या आनंदयात्रेवर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात १४० लोक मृत्युमुखी पडले व ४० जखमी झाले व बेनझीरबाई थोडक्यात वाचल्या होत्या. बेनझीरबाईंनी लगेच पाकिस्तानी गुप्तहेरखात्यावर हा हल्ला योजल्याचा आरोप केला. पाठोपाठ तर गुप्तहेरखात्याने बेनझीरबाईंवर प्रत्यारोप केला कीं त्यांनी स्वत:चे राजकीय महत्व वाढवण्यासाठी मुद्दाम हा हल्ला घडवून आणला! बेनझीरबाईंनी आपल्या व्युहरचना पुन्हा एकदा जोखल्या व त्यात बाऊचर यांच्या पुढाकाराने केलेल्या व उभयपक्षी मान्य असलेल्या अटींना त्यांनी केराची टोपली दाखवली.
मुशर्रफ यांनी नुकतीच जिंकलेली राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी लष्करातून निवृत्ती घ्यायच्या आधीच लढवली होती व हे कृत्य संविधानाच्या अटीविरुद्ध आहे म्हणून त्यांची ही निवडणूक अवैध ठरवायची हिंमत सर्वोच्च न्यायालयाने दाखवली त्या पाठोपाठ परिस्थितीची पहाणी करण्यासाठी थांबलेल्या वकीलांच्या संघटनेने त्यांची चळवळ पुन्हा सुरू केली.
मुशर्रफ भडकले. "पाकिस्तानी लष्कर या देशाचे तारणहार असून त्यांच्या मदतीशिवाय व हस्तक्षेपाशिवाय पाकिस्तान हा "एक देश" या नात्याने शिल्लकच रहणार नाहीं व ज्यांना हे मान्य नाहीं ते भरकटलेले लोक आहेत" असेही ते फूत्कारले. PPP व PML-N चे अनेक नेते, वकील, लोकशाहीवादी सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक व पत्रकार अशांना हजारोंनी तुरुंगात डांबण्यात आले. ३ नोव्हेंबर २००७ रोजी पाकिस्तानी शहरांत आणि गांवात सैनिक गस्त घालू लागले व सर्व मोठ्या रस्त्यांवर वहातूक मंदगती करण्यासाठी व वाहनांच्या तपासणीसाठी जागोजागी अडथळे (Roadblocks) उभारण्यात आले. एक आत्मघाती बॉम्बहल्ला लष्कराच्या रावळपिंडी छावणीत झाल्याबरोबर मुशर्रफ यांनी पाकिस्तानची राज्यघटना तात्पुरती स्थगित करून "अतिरेकी घटनांना जास्त योग्य पद्धतीने तोंड देता यावे म्हणून" आणीबाणी पुकारली.


अमेरिकी व ब्रिटिश अधिकार्‍यांचीही पाचावर धारण बसली. पण त्यांना अजीबात महत्व न देता मुशर्रफ यांनी पुन्हा एकदा "घूम-जाव" केले व ते सौदी अरेबियाला गेले. सौदी राजघराण्याच्या सदस्यांची सौजन्यभेट घेऊन ते नवाज शरीफना भेटले. मोजक्या दिवसांनंतर मुशीचा वरदहस्त डोक्यावर घेऊन नवाज पाकिस्तानला परतले. (मुशर्रफ़ किती निर्लज्ज आहे पहा! अगदी कामापुरता मामा! सप्टेंबरमध्ये ज्याने नवाजला पाकिस्तानात येऊ दिले नाहीं तो स्वत:ला गरज पडताच, स्वत:ची खुर्ची गरम झाल्यावर (hot seat) सर्व मानमर्यादा गुंडाळून त्यालाच सौदीला जाऊन भेटतो काय आणि नवाज परत पाकिस्तानात येतो काय! अगदी सोयीची शय्यासोबत!)
बेनझीरबाईंच्या मतात फूट पाडण्याचा हा डाव होता.
 
या घटनांनी मुशर्रफ जरासे धीट झाले व त्यांनी लष्करी गणवेश उतरवला व त्यांनी माजी ISI प्रमुख व अयशस्वी ठरलेल्या भुत्तो-वाटाघाटींत मुशर्रफ यांचे प्रतिनिधित्व केलेल्या ज. अश्फाक परवेज कयानी यांना लष्करप्रमुख बनविले. ८ जानेवारी ही निवडणुकीची तारीख ठरली. अटकसत्रांसारखे अत्याचार, आत्मघाती हल्ले, राजकीय पक्षांना मोठ्या सभा घ्यायची व प्रचार करायची बंदी अशी अनेक पावले टाकूनही मुशर्रफ यांची लोकप्रियता २१ टक्क्यावर आली व बेनझीर व नवाज यांची लोकप्रियता जोरात वाढली.
भुत्तो-समर्थक पार गोंधळून गेले होते. एका बाजूने त्यांना विजयाची चाहूल लागली होती तर दुसर्‍या बाजूने बेनझीरबाईंच्या जिवाची काळजी लागली होती. कारण अल्-कायदा व पाकिस्तानी गुप्तहेर संघटना या दोन्ही संघटनांमध्ये त्यांना मारू पहाणारे गट होते. एक संरक्षक तटबंदी म्हणा किंवा एक तर्‍हेचा विमा म्हणा पण बेनझीरबाईंनी त्यांचा एक अमेरिकेतला माजी विश्वासू मदतनीस मार्क झीगल यांना ई-मेल पाठवून मुशर्रफ यांच्या अधिकार्‍यांपैकी त्यांच्या जिवावर उठलेल्या लोकांची यादी पाठविली. तसेच PPP च्या नेत्यांनी अमेरिकेच्या अधिकार्‍यांसाठी व राजकीय नेत्यांसाठी एक लेख (dossier) तयार केली ज्यात भुत्तो यांच्या निवडीला सुरुंग लावण्याच्या सरकारी हालचालींची माहिती दिली होती.
२७ डिसेंबर रोजी लष्कराचा बालेकिल्ला असलेल्या व सैनिक व गुप्तहेरांनी बजबजलेल्या रावळपिंडी येथे एका सभेत भाषण करून परत येत असतांना आपला जयजयकार करणार्‍या समर्थकांचे हात हलवून आभार मानण्यासाठी बेनझीरबाईंनी गाडीच्या टपातून डोके बाहेर काढले आणि क्षणार्धात गोळीबाराचे आवाज झाले आणि बेनझीरबाई गाडीत कोसळल्या. पाठोपाठ त्यांच्या गाड्यांचा ताफा उधळून टाकण्यासाठी आत्मघाती अतिरेक्याकडून करविलेला एक मोठा स्फोटही झाला. कांहीं तासानंतर बेनझीरबाईंच्या (व त्यांच्या डझनावारी समर्थकांच्या) मृत्यूची बातमी जाहीर झाली. बेनझीरबाईंच्या हत्येचे पडसाद सर्व जगात उमटले व सर्व राष्ट्रांनी त्याची एकमुखाने निंदा केली. PPP नेत्यांनी ताबडतोब मुशर्रफला दोषी ठरविले. संतापलेले भुत्तो-समर्थक रस्त्यावर उतरले. क्षणभर असे वाटले कीं पाकिस्तान आता संपले! सरकारही घाबरले. सरकारी दावा होता कीं बेनझीरबाईंचे डोके गाडीच्या टपाच्या खिडकीवर आपटले व त्या जखमेमुळे त्यांचा मृत्यू झाला. बेनझीरबाईंच्या मृत्यूने मुशर्रफ यांच्या कारकीर्दीतील पाकिस्तान या "धोकादायक विश्वा"चा सगळ्या जगाला परिचय करून दिला. कारण या घटनेने हे दाखवून दिले कीं रावळपिंडीसारख्या लष्कराच्या बालेकिल्ल्यातही हे अतिरेकी बेगुमानपणे व निर्भयपणे कुणालाही टिपून देशात एक भीतीचा उद्रेक उभा करून देशाला पूर्णपणे अस्थिरतेच्या जबड्यात ढकलू शकतात.त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जरदारींच्या PPP व नवाज शरीफ यांच्या PML-N मध्ये निवडणूक समझोता झाला व ते भरघोस मताधिक्याने निवडून आले. पंतप्रधानपदाचा शपथविधी चालू असताना मुशर्रफ यांच्या चेहर्‍यावरचा अस्वस्थपणा साफ दिसत होता. बुश यांनी जरी मुशर्रफ यांना "एक संपूर्णपणे भरवशाचा भिडू" या शब्दात समर्थन देणे चालूच ठेवले तरी अमेरिकेतील सर्वात मातब्बर व प्रभावी लष्करी तज्ञ श्री. कागन (Kagan) यांनी ’व्हाईट हाऊस’ने आता "पाकिस्तान हे सर्वसंहारक अशा भावी प्रलयाची जननी आहे" अशा पेंटॅगॉनच्या अधिकार्‍याच्या मताकडे जास्त गंभीरपणे पहावे असा सल्ला दिला. पाकिस्तानच्या सेनेतील धर्मांध गट जास्त-जास्त बळकट होत असून या गटाने जर अचानक सीमांपासून निघून जायचे ठरविले तर जी पोकळी निर्माण होईल ती मूलगामी/कर्मठ लोकांकडूनच व्यापली जाईल. अतिरेक्यांनी जर यशस्वी कुदेता घडवून आणला व अण्वस्त्रांवर ताबा मिळवला तर काय करावे लागेल याचाही पाश्चात्य राष्ट्रांनी विचार करून ठेवावा असा सल्लाही त्यांनी दिला. याहूनही जास्त अनिष्ट गोष्ट म्हणजे लष्करात फूट पडून त्यांच्यातल्या लठ्ठालठ्ठीत मूलगामी गटाची सरशी होऊन त्यांनी अण्वस्त्रांच्या साठ्याचा संपूर्णपणे ताबा घेणे. श्री कागन हे सध्या अमेरिकन एंटरप्राईज इन्स्टिट्यूट येथे ज्येष्ठ ’फेलो’ आहेत व त्यांनी अमेरिकेने आता आपल्या एकेकाळच्या भिडूच्या ठिकर्‍या उडतील/त्याची शकले होतील या शक्यतेची अटकळ बांधून त्यानुसार पावले उचलण्याची पूर्वतयारी केली पाहिजे असा सल्ला दिला.
थोडक्यात योग्य वेळ येताच अतीशय कर्तबगार (Elite) सैनिक पाकिस्तानात पाठवून सर्व अण्वस्त्रांचा साठा ताब्यात घेणे व ती अण्वस्त्रे पाकिस्तानाबाहेर काढून न्यू मेक्सिकोत एकाद्या गुप्त जागी ठेवणे किंवा ते शक्य नसल्यास पाकिस्तानातच एकाद्या अभेद्य जागी लपवून ठेवणे अशा कांहीं धोकादायक पर्यायांचा विचार करून ठेवला पाहिजे असेही कागन यांचे म्हणणे आहे. श्री. कागन पुढे म्हणतात कीं अमेरिकन लष्कराने आता पाकिस्तानच्या सरहद्दीचा भाग पादाक्रांत करून ही अटीतटीची लढाई तालीबान, त्यांचे मित्रगट आणि अल-कायदा यांच्यावर लादायला (शत्रूच्या भूमीत न्यायला) जय्यत तयार असायला हवे. आता तर याची आणखीच जास्त जरूरी आहे कारण १९९० साली अमेरिकेने पाकिस्तानकडे तिची पाठ फिरविली तेंव्हांपासून हे अधिकारी अमेरिकन सरकारला सक्त ताकीद देत होते कीं पाकिस्तानचा मलिदा बंद झाल्यास ते नक्कीच अण्वस्त्रविद्या विकून पैसे उभे करतील. दहशतवादाविरुद्धच्या युद्धात पाकिस्तानला सहभागी करून, पाकिस्तानने केलेल्या पापांकडे काणाडोळा करून व आर्थिक नुकसानभरपाई करून, त्याद्वारे लोकशाही सरकारला अधिकारग्रहण करण्यापासून वंचित करून व अण्वस्त्रांच्या प्रसारात पाकिस्तानने घेतलेल्या सक्रीय भागाबद्दल मूग गिळून गप्प बसून अमेरिकेने पाकिस्तानबरोबर एक प्रचंड चूक केली आहे. सखोल मनन व विचार केल्यावर असाच निष्कर्ष काढावा लागेल कीं अमेरिकेने पाकिस्तानला केवळ आर्थिक दृष्ट्याच नव्हे तर त्या राष्ट्राला विघटनाकडे नेऊन राजकीय दृष्ट्यासुद्धा खतम केले आहे व त्या राष्ट्राला (व त्याबरोबर भारतालाही) अण्वस्त्रयुद्धाच्या सर्वविनाशाच्या खाईकडे पूर्णपणे ढकलले आहे आणि या अप्रिय शक्यतेची सर्वांनाच एक तर्‍हेची भीती होती!.
थोडक्यात काय तर अमेरिकेने आपले शत्रू-मित्र नीट पारखायला शिकले पाहिजे!
 लेखक: सुधीर काळे


Print Page

२ टिप्पण्या:

कांचन कराई म्हणाले...

काळे साहेब, लेखाच्या शेवटी जे वाक्य तुम्ही लिहिलं आहे. त्याला बॉटमलाईन म्हणायला हरकत नाही. अमेरिकेने वेळीच शत्रू आणि मित्र पारखून घेतले नाहीत तर त्यांचीही अवस्था भस्मासूराच्या कथेतील शिवशंकरासारखी होईल, हे निश्चित. त्यावेळेस त्यांना वाचवायला कोणती मोहिनी उपयोगी पडेल कुणास ठाऊक? ’लोकशाही’बद्दलची प्रत्येक पाकिस्तानी नेत्यांची व्याख्या निरनिराळी वाटते. जनावरांमधे जसा तरस हा प्राणी विश्वासाच्या लायकीचा वाटत नाही, तसंच काहीसं मला पाकिस्तानी नेत्यांबद्दल वाटतं. आपल्याकडचे काही नेतेही या उदाहरणाला अपवाद नाहीत.

सुधीर कांदळकर म्हणाले...

माहितीपूर्ण लेख.

हल्लीं वर्तमानपत्रांत दररोज पाकिस्तानांत स्फोट झाल्याच्या बातम्या येताहेत. म्हणजे भस्मासूर झाला आहेच.

सुधीर कांदळकर