मंगळवार, १ डिसेंबर, २००९

प्रवास





क्षणाक्षणाला उसळणारी
वादळे, तप्त ... अनावर |
लखलखत्या किरणांची
रोखलेली तेग तनामनावर |

निरव, निर्मम, निष्प्राण सृष्टी
आणि
प्रखर प्रकाशात अंध दृष्टी |

उठणार्‍या‍ दाहक वावटळीत
नाहीशा होत जाणार्‍या वाटा |
डोळ्यांसमोर हेलावणार्‍या
नकोशा सोनेरी लाटा |

तो जळता अंधार ....
नको - नकोसा वाटतो |
धगधगता अग्नी
पावलांना जाळतो |

पण तरीही ...
थांबता येत नाही |
कारण परतीचा मार्ग
कधीचाच पुसलेला असतो !

त्या भयाण काहीलीत
मग जाणवते
अस्पष्ट, अंधूक
दूर कुठे असलेली
मृगजळाची रेघ |

अप्राप्य... तरीही ओढ लावणारी |

दाखवते सुखस्वप्ने
उन्हामधे चमचमणारी |

असेल तिथे कदाचित
कोवळी, सुखकर हिरवळ
मधुर फळं , फुलांचा दरवळ |
शुभ्र पाण्याची खळखळ
आणि,
तरुं-वेलींची सुखद सळसळ |

मग मिळेलही तिथे , गारवा
मऊ , रेशमी आणि नितळ |

आसावलेल्या तनामनात
जागते अनाकलनीय आशा |
उग्र-प्रकाशी अंधारलेल्या दृष्टीला
खूणावतो रसरसता रंग हिरवा |

मग कल्पनेतला तो गारवा
लपेटून स्वतः भवती अलवार |
सुखावते तन मन
उमलतो सुखाचा हुंकार |

अभिलाषेने त्या मृगजळाच्या
मग पुन्हा ..
उचलले जाते पाऊल
आणि त्या तप्त वादळावर
नाहीशा होणार्‍या खूणा उमटवित
चालूच राहतो प्रवास
अनंत काळाचा |

कवयित्री: मनीषा भिडे
Print Page

२ टिप्पण्या:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

वाळवंटावर इतकी सुंदर कविता!! तुमचं अभिनंदन!कौशल इनामदारांच्या ’गगनझुला’ या गीतसंग्रहात ’अशी दुपार’, हे गाणं ऐकलं होतं. तुमची कविता वाचून त्या गाण्याचीसुद्धा आठवण झाली. वाळवंटातील रखरख आणि त्यातून वाट काढणा-याच्या मनाची तगमग दाखवण्यासाठी, तुम्ही केलेली शब्दरचना खूपच सुंदर आहे.

सुधीर कांदळकर म्हणाले...

जगण्याची दुर्दम्य आशा मृगजळांत वाटचालीचें सामर्थ्य देते हें खरेंच.

छान.

सुधीर कांदळकर