मंगळवार, १ डिसेंबर, २००९

सैरभैर !


गजर होतो.
पटकन त्याचा आवाज बंद करून उठतो.
भरभर आवरून चहा ठेवतो.
गरमागरम वाफाळलेला चहा घेत पेपरवर नजर टाकतो.
त्याच त्या बातम्या असतात, बदल काही नसतो,
पण वाचल्या नाहीत तर दिवसभर चैन पडत नाही.
पेपर चाळून झाला की स्नान, देवपूजा आटोपून भाजी करायला घेतो.
एकीकडे भाजी शिजत असताना कणीक भिजवतो.
पोळ्या करून नाश्ता करून डबा घेऊन कामावर जायचे.
दिवसभर काम करून मधल्या वेळेत डबा खाऊन संध्याकाळी परत घरी यायचे.
येतानाच काहीतरी भाजी घेऊन, दूध घेऊन यायचे.
आल्यावर स्वच्छ होवून देवापाशी दिवा लावायचा.
दूध तापवायचे.
वरण भाताचा कुकर लावायचा.
सकाळची भाजी गरम करायची.
पोळ्या असतातच.
कुकर झाला की जेवून घ्यायचे.
जरावेळ टिव्ही पाहायचा.
बातम्या पाहायच्या.
एखाद दुसरी सिरीयल अर्धवट पाहा..असे करायचे.
नंतर एखादे अर्धवट वाचलेले पुस्तक खुणेपासून वाचायला सुरू करायचे.
अकरा साडेअकरा झाले की डोळ्यावर पेंग येऊ लागते.
शांतपणे झोपून जायचे.
दुस-या दिवशी परत तेच ...
सगळं कसं निवांत चाललेलं असतं.

पण कधी कधी मात्र अचानक...
काहीतरी गडबड होते.
तसंच आज सकाळी झालं
सकाळी गजर झाला तरी उठलो नाही.
उगाचच पडून रहावंसं वाटलं.
पण काटा पुढे सरकत टक टक करता करता कटकट करत होता.
शेवटी कसं बसं उठलो.
धावपळ झालीच.
चहा बनवताना साखर टाकायला विसरलो.
एक चमच्याच्या ऐवजी चहा दोन चमचे पडला.
दूध कमी पडलं.
कडू कडू चहा कसाबसा प्यायलो.
भाजीला फोडणी जळून गेली.
नंतर जास्त उकळून पाणी संपून करपून गेली.
कणीक सैल झाली म्हणून पीठ जास्त टाकलं.
दोन दिवसांचा गोळा तयार झाला.
पोळ्या अर्ध्या कच्च्याच.
कसाबसा नाश्ता गिळला.
धावत स्टापवर गेलो.
बस चुकलीच.
लेटमार्क.
कामात लक्ष लागेना.
दुपारी डबा उघडला...
तसाच बंद करून ठेवला.
घरी येताना भाजी, दूध आणायचं विसरलो.
कालचं दूध थोडं शिल्लक होतं.
फ्रीजमधून घेताना हातातून भांड सटकलं.
देवाला दिवा लावायचा विसरलो.
कुकर लावून खिडकीत बसलो.
बराच वेळ झाला शिट्यांचा आवाज नाही.
वळून पाहिले तर गॅस चालूच केला नव्हता.
सकाळच्या पोळ्या हातात घेववत नव्हत्या.
वरण आफळलं होतं.
कसाबसा वरणभात खाऊन घेतला.
पाण्याच्या घोटाबरोबर ठसका दाबत राह्यलो.
टीव्ही पाहावासा वाटला नाही की पुस्तक वाचावेसे वाटले नाही.
उगाचच आढ्याकडे पहात पहात पाडून राह्यलो.
वाटत राह्यलं .....

आज तू असतीस तर किती वेगळं असतं आयुष्य..
तु़झ्या शिवाय जगणं शक्य आहे हे दाखवण्याचा मी रोज प्रयत्न करतो.
पण कधी कधी मात्र मन सैरभैर होऊन जातं.
नाही जमणार मला तुझ्यावाचून जगणं असं मनाला बजावत उदास होत राहतो.
सगळंच उलटं पालटं होऊन जातं.
मग कधीतरी परत माझी मीच समजूत घालतो.
अस सैरभैर होऊन चालणार नाही.
तुला वचन दिलं आहे.
तुझ्याशिवाय जगून दाखवेन.
खरं करायचं आहे मला ते वचन.
मनाला समजावत राहतो.
कधी तरी मन परत हळूहळू शांत होतं.
परत नेहमीच्या अलिप्त शांत वातावरणाशी समरस होतो.
कधीतरी केव्हातरी झोप येते परत सकाळच्या गजराने जागे होण्यासाठी.
परत पूर्वीसारखंच रूटीन चालू होतं.
पुन्हा कधीतरी परत सैरभैर होईपर्यंत.... !!

लेखक: अवलिया




Print Page

३ टिप्पण्या:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

खरं आहे. कधीतरी एखाद्या आठवणीने मन असं सैरभैर होतं आणि अवघ्या दिवसावर त्या आठवणींचं सावट रेंगाळत रहातं.

अनामित म्हणाले...

गद्य आणि काव्याच्या सीमारेषेवरचें लिखाण एक छान तरल अनुभूति देऊन गेलें.

दोन्हीं प्रकाशचित्रें देखील तशींच काव्यात्म.

सुंदर.

सुधीर कांदळकर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे म्हणाले...

मस्त आवडली कविता.