बुधवार, २५ नोव्हेंबर, २००९

आजोळ!


ही मी शाळेत जाण्यापूर्वीची गोष्ट आहे. सन १९५६-५७ असावे. माझे वय ४ - ५ वर्षे. मोठ्या मामेबहिणीला - रतनला सुट्टी पडली की माझा मोठा मावसभाऊ बाळादादा किंवा विशा म्हणजे आईचा मावसभाऊ पण बहुतेक बाळाच येत असे - आजोबांचा निरोप घेऊन सायकलवरून येत असे. त्यांचे घर आमच्या घरापासून एक कि.मी. पेक्षा कमी अंतरावर आहे. माझा मोठा भाऊ तेव्हा पण शूर होता. माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा. तो सायकलवर दांडीवर बसायला घाबरत नसे. मला मात्र भिती वाटायची. भित्रा म्हणूनच सगळ्यांना ठाऊक होतो. मला मात्र तसे वाटत नसे. बाळा तसा दोघांनाही न्यायला आलेला असे. पण बाजूने जाणारी मोटार आपल्या अंगावरून जाणार असे मला वाटे आणि माझी प्रचंड घाबरगुंडी उडे. त्यामुळे मी काही सायकलवरून जात नसे. मागोमाग मला हाताला धरून आई येई. आजोबा - आम्ही त्यांना बाबा म्हणत असू, माझी चार मामेभावंडे, बाळा व माझा मोठा भाऊ असे पायरीवर आमची वाट पाहात असत. पायरी म्हणजे एक सिमेंटचा चौथरा. कुयरीच्या आकाराचा. घरासमोरच केलेला. पायरीच्या एका बाजूला घरात जाणार्‍या खर्‍या पायर्‍या आणि दुसर्‍या बाजूला रस्ता. तिसर्‍या बाजूला रस्त्याला लागून घरात येणारी तसेच जिन्यावर जाणारी पायवाट. आम्ही आलो की बाबा ‘चला सुट्टी झाली चला सुट्टीऽऽ झालीऽऽ चला सुट्टीऽऽ झालीऽऽ आता खूपऽऽ खूपऽऽ खेऽऽळायचे असे गाणे म्हणत घरात शिरत. मग धमाल उडे. मामीला बाबांच्या या उत्साहाचे फार अप्रूप होते. ते तिच्या फुललेल्या चेहर्‍यावर दिसे.

बाबा धोतर नेसत. वि. स. खांडेकरांसारखी बारीकच अंगकाठी. म्हणजे पुस्तकातील छायाचित्रात दिसते त्याप्रमाणे. मी वि.स.ना प्रत्यक्ष कधी पाहिले नाही. धुवट पांढरा शर्ट. त्याला एक खिसा आणि सोनेरी बटणे. खरी सोन्याची की खोटी ठाऊक नाही. त्यावर कोट. उन्हाळ्यात बदामी वगैरे फिक्या रंगाचा. थंडीत गडद रंगाचा. डोक्यावर काळी टोपी. मुख्य ओळख म्हणजे लो.टिळकांच्या सारख्या छपरी मिशा. ही मिशी मात्र विसं पेक्षा वेगळी. रोज अर्धा-एकतास पूजा करीत. ‘पासिंग शॉ’ सिगरेट ओढत. ते जवळ आले की सिगारेटचा, चंदनाचा, उदबत्तीचा, पारिजातकाच्या - अनंताच्या फुलांचा संमिश्र गंध येई. त्यांची आठवण म्हणजे तो सिगरेटमिश्रित चंदनाचा व फुलांचा गंध. मूर्तिमंत वात्सल्य. ते व त्यांचे मित्रमंडळ, विश्वनाथ देवजी सारंग, दिपाजी लाडू साळगांवकर इ.इ. सगळे लो. टिळकांचे जबरदस्त भक्त होते. आजच्या भाषेत फॅन किंवा पंखे. दिवाणखान्यात मध्यभागी लाकडाचे वजनदार असे चौकोनी टेबल होते. झक्क पॉलिश केलेले. त्यावर पांढरा भरतकाम केलेला अभ्रा. त्यावर चार-एक इंच किनार सोडून मध्यभागी चौकोनी काच. वर सिगारेटचे रक्षापात्र आणि फुलदाणी. भोवती चार लाकडाच्या नक्षीदार खुर्च्या. खुर्चीच्या बैठकीला व पाठीला तलम कातड्याच्या काळ्या रंगाच्या मऊ उशा. लाकडातच घट्ट बसवलेल्या. त्यांच्या गप्पा छान रंगत. नेहरू, अत्रे वगैरेंच्या त्या राजकारणातील आम्हाला काहीच कळत नसे. सगळे कॉंग्रेसवालेच होते. पण तरीही जोरजोरात मोठ्याने वाद घालत. जोडीला चहा सिगरेट असे. कधी कधी चहा नेऊन देण्याचे काम मी व अरूणा "मी नेणार मी नेणार" असा हट्ट करून करीत असू. तो देताना उरलेले दोनतीन कप ट्रे मध्ये घेऊन मामी आमच्या मागोमाग येत असे. गरम चहा अंगावर पाडून आम्ही भाजून घेऊ अशी तिला भिती वाटत असे. हळू हळू एक एक पाऊल टाकताना कप बशीत डुगडुगत तुडतुड्या भोवर्‍यासारखे भरतनाट्यम करीत असे हे खरेच. आणि आम्ही कधी भाजून घेतले नाही हे आश्चर्यच. घरात सगळीकडे खाली कोटा लादी. पॉलिश केलेली गुळगुळीत. पण पाणी असेल तरच घसरायला व्हायचे. एरवी नाही. काळ्या आणि हिरवट पांढर्‍या लाद्यांचे बुद्धिबळाच्या पटासारखे डिझाइन मात्र सुरेख होते. त्या काळात प्रचलित असलेले. थोडक्यात म्हणजे घसरायचा प्रश्न नव्हता. पण माजघराचा उंबरठा ओलांडून दिवाणखान्यात जाताना त्रेधा उडायची. पायाखाली पाहावे तर कप हालेल. कपाकडे पाहिले तर अडखळायला होईल. पण हट्ट म्हणजे हट्ट. असे चमत्कारिकच हट्ट असत आमचे.

दिवाणखान्यात आलो की डाव्या बाजूला बाबांची एक विशिष्ट खुर्ची होती. तिची पाठ विविध कोनात वळवता येई. पाय ठेवायला सरकपट्ट्या होत्या. लांबी कमीजास्त करता येण्याजोग्या. तिच्या डाव्या हाताला पुस्तकांचे कपाट. त्यातच रेडिओ. रेडिओवर फक्त बातम्या, मुंबई ब वरचें गंमत जंमत, पुण्यावरचे बालोद्यान, मराठी गाणी व आठवड्यातून एकदोनवेळा असणारी रात्री साडेनऊची श्रुतिका लावत. शनिवार रविवारी मुंबईवरील गंमत जंमत व पुण्यावरील बालोद्यान. कार्यक्रम चालू असताना त्यातील नानोजी वगैरे पात्रे डोळ्यासमोर साकारत. आम्ही या जगात राहात नसूच मुळी. मुलांचे कार्यक्रम आम्हा मुलांबरोबर बाबा, आई (आजीला पण आई म्हणत होतो.) आणि मामी पण ऐकत असत. पुण्यावर गीत रामायण देखील असे. पण आम्हा मुलांना त्यात गम्य नसे. इतर भावगीते मात्र आवडत. गोरी गोरी पान, नाच रे मोरा, घरात हसरे तारे, तुझ्या गळां माझ्या गळां, हरवले ते गवसले का (हे मामाचे खास आवडते गीत. ते तो अगदी स्वरात म्हणू शके. एक पैलवान गाणे म्हणतो हे पाहून मजा वाटे.), खेड्यामधले घर कौलारू. जो आवडतो सर्वांना, वगैरे वगैरे. पण बाबांना फोनो मात्र आवडत नव्हता. त्यामुळे तबकड्या वगैरे इथे ऐकायला मिळत नसत. फोनोला चावी देणे, पिन बदलणे, साउंड बॉक्स तबकडीवर कौशल्याने जपून अलगद ठेवणे ही गंमत तिथे नव्हती. पण फोनोची कधी आठवणही होत नसे तिथली मजा, तो आनंद दैवीच होता. ती गंमत फोनोसारख्या पार्थिव वस्तूत मुळ्ळीच नाही. हो! पार्थिवच. निर्जीव नाही. निर्जीव नसतोच फोनो. म्हणूनच तर त्यातून आवाज येतो. या रेडिओच्या कपाटाच्या रेषेत दहा फुटांवर आणखी एक पुस्तकांचे कपाट. मध्ये आयताकृती अल्कॉव्हमध्ये पलंग आणि शो केस. नंतर चार फुटावर ही शो केस. या शोकेसमध्ये बक्षिसांचे विविध कप, पदके वगैरे. मामाने विविध मुष्टियुद्ध ऍथलेटिक्स वगैरे स्पर्धांत मिळविलेले. पलंगाला लागून लांबलचक खिडकी. खिडकीत वेली होत्या. बहुधा पोथॉस - मनी प्लॅंट, कधी गोकर्ण असे, कधी आणखी काही. पण पलंगाच्या उशापलीकडे शोकेसपर्यंत चांगली सहा-एक फुटांची मोकळी जागा. त्याला लागून काटकोनात त्याच्या बाजूला एक माणूस बसेल असा एक गुबगुबीत कोच. इथे बसून मी पुस्तके वाचीत असे. बरोबर कधीकधी अरुणा किंवा अशोक माळी. आम्ही दोन मुले सुद्धा ऐसपैस बसू शकत असू. पण वेगवेगळी पुस्तके घेऊन. कोचामागे डाव्या बाजूला देव्हारा. त्यापलीकडे आतल्या खोलीत जाणारे दार, त्यापलीकडे छोट्याशा कोपर्‍यांत १ फूट चौरस उभे टेबल.

बाबांच्या देव्हार्‍यात मुख्यस्थानी विठ्ठलाची तसबीर होती. दोन फूट रुंद व तीन फूट उंच. रुंद नक्षीदार लाकडी दिमाखदार चौकटीतील. पुढ्यात चौरंगावर दोन मोठ्या माणसांच्या तळहाताएवढे शिंपले होते. त्यामधोमध मोठ्या माणसाच्या मुठीएवढा एक मोठ्ठा शंख. तिन्ही वस्तू चांदीसारख्या पण गुलाबी झाक असलेल्या चकचकीत. दोन शिपल्य़ांच्या समोर आपल्या बाजूला दोन विशिष्ट आकाराच्या चार सहा इंच व्यासाच्या चांदीच्या बशा. त्यात प्रसाद असे. कधी लाह्या, फुटाणे बत्तासे, कधी खजूर, कधी शेवबुंदी. सणावारी पेढेबर्फी. शंखासमोर आपल्या बाजूला एक सहाण. चंदन वगैरे उगाळायला. सहाणेवर एक पिवळीधम्मक चमकदार पितळेची परडी. फुलांसाठी. त्यात नेहमी जास्वंदीची, अनंताची, तगरीची, पारिजातकाची फुले असत. दादाने मला नंतर कधीतरी सांगितले की त्या परडीच्या बाजूच्या चांदीच्या बशा नसून ते ऍश ट्रे आहेत. व त्यांच्या किनारीला ज्या चार खोबणी आहेत त्या सिगरेट ठेवण्यासाठी आहेत. नैवेद्य ठेवायला ऍश ट्रे? सनातनी काळातील बाबांच्या सौंदर्यदृष्टीचे व आधुनिकतचे आज कौतुक वाटते. सोवळे ओवळे त्यांनी कधीही पाळले नाही. जातपात, स्पृश्यास्पृश्यता, धर्मांधता त्यांना मान्य नसे. मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म व सर्व धर्म एकाच देवाकडे नेतात असे ते म्हणत असत. ते संस्कार माझ्या मानांत खोलवर रुजलेले आहेत. असो. देव्हार्‍याच्या मागील भिंतीच्या दोन्ही कोपर्‍यांत एक एक सहाइंच रुंद व चार फूट उंच असा आकर्षक आणि कलाकुसर केलेला भिंतीत जमिनीपासून चार फुटावर बसवलेला उभा लाकडी स्टॅंड. दोन्हीत उभ्या बुद्धाची एकएक सुबक मूर्ती. मूर्तीमागे चार फूट उंच उभा आरसा. सहा इंच रुंदीचा. उजव्या कोपर्‍याला लागून माजघरात जाणारा दरवाजा. मग कोपरा. कोपर्‍यात वर बुद्ध आणि खाली एक उभे चौकोनी टेबल. एक फूट चौरस. महिरपी कडा असलेले. मध्यभागी एक पांढरी चार इंची पांढरीफेक गुळगुळीत लादी. उजव्या हाताला मामाच्या खोलीचा दरवाजा.
बाबांच्याकडे एक पायपेटी होती. ऑर्गनसारखा सुरेल आणि धीरगंभीर स्वर होता तिचा. बाबांना लहर आली की ते कधी कधी दे हाता शरणागता वगैरे गाणी पायपेटी वाजवीत गात असत. एकदम खडा आवाज. आवाज खडा आणि चांगलाच होता. पेटी पण फार सुंदर वाजे. बाबांचा कधी राग आला तर आम्ही त्यांना हळूच कुणालाही ऐकू जाणार नाही असे ‘बाबुलीन’ म्हणत असू. पण तसे प्रसंग सहसा आले नाहीत. शाळेत आम्ही पाटीबरोबर एक लाकडाची पट्टी नेत असू. तीवर देखील बाबुलीन ग्राईप वॉटरची जाहिरात असे. बाबुलीन उच्चारले किंवा वाचले तरी आम्हाला हसू येई. माझी सगळ्यात धाकटी मामेबहीण भारती फारच लहान म्हणजे तीन-चार वर्षांची होती. बाहुलीसारखी गोड दिसे. बाबा तिचे तर फारच लाड करीत. तिचे सगळे हट्ट पुरवीत. एखादा हट्ट पुरा व्हायला उशीर केला की तिला राग येई. बाबा आरामखुर्चीवर बसले की त्यांच्या मांडीवर बसून मग ती त्यांच्या मिशा ओढत असे व वाटेल ते कबूल करून घेत असे. पण मामी म्हणजे तिची आई जवळपास नाही हे पाहून.
आवारात पारिजातकाचे झाड होते. रोज सकाळी प्रथम ती फुले वेचून आणावी लागत. मग त्यांचे हार करावे लागत. मला ते काम आवडत नसे. पण किमान एक हार करावाच लागे. सकाळी हे काम तसेच संध्याकाळी सूर्यास्तानंतर परवचा म्हणाव्या लागत. परवचा म्हणजे काय तर प्रथम पाढे म्हणायचे. नंतर स्तोत्रे, शेवटी शांताकारं, सदा सर्वदा वगैरे. त्याशिवाय जेवण मिळत नसे. मला ते आवडत नसे व फार राग येई. मला पाढे व स्तोत्रे पाठ आहेत. माझे उच्चार स्पष्ट आहेत, आवाज खणखणीत आहे मी रोज पुन्हा पुन्हा का म्हणू असा माझा दावा कोणीही ऐकून घेत नसे. म्हणाव्याच लागत.

दर शनिवारी सकाळी गायवाली येई. मग गायवाली चारा देई. तो चारा आपण गायीला भरवायचा. मला फार भिती वाटे. गाय चावेल किंवा शिंग मारेल म्हणून. पण अरुणा मला धीर देत असे. ही माझ्यापेक्षा केवळ सहा महिन्यांनी मोठी मामेबहीण. ती सदैव तिच्या आत्याच्या म्हणजे माझ्या आईच्या मागे असे. मी वगळता सर्वांचे झाले ती चारा देई. बघ मला चावली गाय? म्हणून विचारायची. मग मी भिती न दाखवता चारा भरवत असे. पण मी घाबरतो हे सगळ्यांनाच ठाऊक होते. दादा, मामेभाऊ हेमंत,वगैरे मोठी मुले मला त्यावरून चिडवत. त्यांनी मला एक नाव ठेवले होते. कोठे तरी लपून ‘सुधाताई देशपांडेचीऽऽ हगऽऽऽऽरकांडे’ असे आवाज बदलून तालासुरात ओरडून पळून जात. मग मला प्रचंड संताप येई. पण कोण बोलले ते कळत नसे. कळूनही मी कोणालाच मारू शकलो नसतो. सगळे बलदंड आणि मी एकटाच सुकडोजीराव. कधीकधी फुगेवाला येई. आजोबा छोट्यांना फुगे देत. मग आम्हाला पतंग मिळे. पतंग आणण्याचे काम आमचा लल्लू नावाचा मोठा मावसभाऊ - बाळाच्या मागचा, करी. हा पण पैलवान होता. पण पतंग फक्त दिवाळीच्या सुट्टीतच.
भावनिक दृष्ट्या अरुणा मला सर्वात जवळची. मी तिचे शेपूटच म्हणाना. माझ्या बालमनातली परीच ती. जेमतेम माझ्याच वयाची. फक्त सहा महिन्यांनी मोठी. फुलाफुलांचा फ्रॉक, दोन वेण्या घालणारी. पुस्तके टिपटाप ठेवणारी. पारिजातकाचा सुरेख हार गुंफणारी. तिने गुंफलेला पारिजातकाचा हार पहातच राहावे. दोन्ही टोकाला जास्वंदीची, अनंताची, सदाफुलीची, किंवा बिटकीची फुले. नारिंगी दांडे दोन्ही वरच्या, टोकाच्या बाजूला. पाकळ्या मध्याकडे. बरोब्बर मध्यावर पुन्हा जास्वंदी, अनंत, सदाफुली किंवा बिटकी. तयार विकत मिळणार्‍या हारात कोणी बिटकी वापरत नाही. पण बिटकीचे सौंदर्य वेगळेच. आणखी एक गंमत. बिटकीचे फूल दांड्याकडून चोखले की थेंबभर गोड-तुरट स्वादिष्ट मध मिळतो. आता बिटकीची झाडेच कुठे दिसत नाहीत. अगदी गावाकडे देखील नाही. हार करताना माझ्या हाताला सुई बोचेच. तिला खूप वाईट वाटे. मग ती माझे रक्ताळलेले बोट चोखायची. मला कंटाळा आला की माझा हार पुरा करायची. मुख्य म्हणजे मला ‘च’ ची चषाभा शिकवणारी. आणि माझ्या भित्र्या बालमनाला नेहमी धीर देणारी. मला नेहमी आधार देणारी अरुणाच. तिचे ते चिमुरडे व निरागस रूप अजूनही माझ्या अंतःचक्षूंसमोर आहे. सोनेरी परडी घेऊन आम्ही पारिजातकाची, अनंताची, जास्वंदीची, तगरीची. फुले वेचत असू. अरुणाला आणि मला ही परडी धरायला फार आवडे. पण अरुणा स्वभावाने एवढी चांगली की तिने थोडा वेळ धरली की नंतर थोडा वेळ ती मला धरायला देई. कध्धी म्हणून आमचा वाद झाला नाही. बंबात लाकडे टाकायला पण आम्हाला फार आवडे. आग कमी झाली की लाकडे टाकावी लागत. एकदोन लाकडे तिने टाकली की नंतर ती मला न चुकतां लाकडे टाकायला देई. धूर झालाच तर पट्कन हेमंत राजनला बोलावून बंब नीट पेटवून घेत असे. अशी ताई मिळायला भाग्य लागते. नंतर शाळेतील अभ्यास वाढला. मला मित्रमंडळी आली. आजोळी जाणेयेणेच कमी झाले. पण दर दिवाळीला रतन आणि अरुणा दिवाळीच्या पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वीच फराळाचा डबा घेऊन रतन आणि अरूणा येत असत. पण त्या आईबरोबरच जास्त बोलत. मी फटाके उडवण्यात दंग असे. ‘सुधीऽर, येते रेऽऽ. येऽरेऽऽ फराळालाऽऽ’ असा उडता निरोप घेऊन जाई. पण अजूनही अरुणा म्हटले की चिमुरडी अरूणाच डोळ्यासमोर येते. दोन वेण्या लालचुटुक रिबिनेने वर बांधलेली पाच-सात वर्षांची छोट्टी अरुणा.

‘पासिग शॉ’ सिगारेटचे पाकीट दोन आण्याना मिळे, हेमंत, राजन - माझा दादा, बाळा, लल्लु वगैरे मोठी मुले ते आणून देत. एकदा मी आणि अरुणाने एकत्र हट्ट केला. आम्हीच सिगरेट आणून देतो म्हणून. आम्ही काही ऐकूनच घेतले नाही. जोरजोरात हातपाय आपटले. बाबा नाही म्हणाले म्हणून आम्हाला रडू पण आले. मामी समजावायला आली. रस्त्यात पडाल. मोटार अंगावर येईल वगैरे म्हणाली. पण आमचा हट्ट कायम. मग मोठ्या मुलांना बरोबर न्या म्हणून. पण आम्ही काहीच ऐकायला तयार नव्हतो. इथे इतक्या जवळच तर कोपर्‍यावर दुकान आहे. घराच्या गॅलरीतून पण दिसते. तुम्ही गॅलरीतून बघा पाहिजे तर. ते आम्हाला दोघांनाच आणायला जायचे होते. शेवटी बाबा म्हणाले. जाऊ दे त्यांना. पण गॅलरीतून लक्ष ठेवा. दोन आण्याचे चौकोनी नाणे दिले. गॅलरीच्या बाहेर बाळा सायकलवर, गॅलरीत दादा, हेमंत, रतन, मामी एवढी फौज जमा झाली.
मी आणि अरूणा चपला घालून बाहेर पडलो. दहाबारा पावले चाललो आणि आमची घाबरगुंडी उडाली.
"अंगावर मोटार आली तर?" मी.
"आपण पटकन बाजूला होऊया. पण चोर आलात तर पैसे काढून घ्यायला?" अरूणा.
"तुझ्या मुठीत पैसे घट्ट पकड. तुझ्या मुठीवर मी माझा हात घट्ट पकडतो. म्हणजे चोराला पैसे दिसणारच नाहीत." मी
मग तिच्या चिमुकल्या मुठीत पैसे. त्यावर माझी चिमुकली मूठ. असे दोघे भरभर चालत निघालो. समोरून माणूस आला की तर तो चोर तर नसेल अशी शंका येत असे. पण सुदैवाने दोनचारच माणसे समोरून आली व ती आसपासची ओळखीचीच होती. त्यांनी आमच्याकडे पाहिले. आमच्या चर्येवरून त्यांना नक्कीच वाटले असावे की आम्ही वाट चुकलो. मग घराच्या गॅलरीकडे पाहिले. त्यांना कळले की तिथून आमच्यावर लक्ष आहे. थोडे पुढे गेल्यावर रस्त्याला एक उजवीकडे फाटा फुटत होता. पण डावीकडे फुटपाथ सुरू होत होता. फुटपाथवर आल्यावर आमच्या जिवात जीव आला. तिथून पंधरावीस पावलांवर मोठ्या रस्त्याच्या कोपर्‍यावर दुकान होते. दुकानावर पोहोचलो. आम्ही "एक पाकीट पासिंग शॉ" अशी ठरवून ठेवलेली घोषणा एकसुरात दिली. पण दुकानाची फळी फारच उंच होती. दुकानदाराने झुकून डोके बाहेर काढले तेव्हाच त्याला आम्ही दिसलो. आम्ही त्याला ओळखत नव्हतो पण त्याने आम्हाला बहुतेक ओळखले. हसला. आम्ही पण हसलो. मामाला बहुतेक जण ओळखत.
"एवढ्या लहान मुलांना कसे काय पाठवले?" त्याने विचारले.
"आम्हालाच यायचं होतं. नेहमी हेमंत राजनलाच पाठवतात. आम्ही का नको?" मी. (राजन हे दादाचे बाबांनी ठेवलेले पाळण्यातील नाव. शाळेत मात्र अण्णांनी दिलीप हेच लावले.) त्याला गंमत वाटली. अरूणाने धैर्याने हात पुढे केला. पैसे दिले. त्याने वाकून पैसे घेतले, ‘पासिग शॉ’ दिले. वर एक एक गोळी देत होता. पण आम्ही गोळी घेतलीच नाही. कोणाकडून काही घ्यायचे नाही अशीच शिकवण होती. त्याने किती समजावले तरी आमचा निर्धार कायम. नाही ते नाहीच. परत फिरलो. फुटपाथवरून उतरून झटणं पुन्हा घाबरगुंडी. मारुतीस्तोत्र म्हणायला सुरुवात केली. (राम कोणाला आवडत नसे. म्हणून रामरक्षा पण येत नव्हती) पुन्हा भरभर चालत कसेबसे घरी आलो. जेमतेम पन्नास-एक छोट्या पावलांचा प्रवास. पण आयुष्यातला बहुधा सगळ्यात मोठा असावा. पुन्हा म्हणून दुकानावर जायचे नाही असे आम्ही ठरवूनच टाकले. दरवाजातच अरुणाला मामीने व मला बाळाने उचलून घेतले. हेमंत राजनच्या धैर्याचे आम्हाला आता कौतुक वाटायला लागले. मुलीचा हात धरून चालतो म्हणून पुढे बरेच दिवस हेमंत राजन माझी टिंगल करत होते. नंतर एकदोन वर्षांनी मात्र ‘पासिंग शॉ’ आम्हीच आणून देत होतो. आमच्याबरोबर हेमाही असायची. मावसबहीण. माझी मावसबहीण ही अरुणाची आत्तेबहीण कशी काय हे मला कोडेच होते. पण मोठी माणसे खोटे कसे काय सांगतील? पण मोठी माणसे वेडपटच असतात कधीकधीं काहीही सांगतात. कधीकधी बरोबर समोरच्या वाडीतला अशोक माळी नाहीतर श्रीराम शेट्टी पण असे.

हेमंतची मोठी बहीण रतन आमची सगळ्यांची बॉस होती. मोठी असून आम्ही तिला रतनच म्हणत असू. आम्ही पाचही जण, आमचे समवयस्क मित्र सगळे तिला आदराने घाबरत असू. आमचा मामा पहिलवान होता. नियमित व्यायामशाळेत जाणारा. एवढा दिलदार आणि मनाने श्रीमंत माणूस मी अजून पाहिला नाही. शरीरयष्टी केवळ दारासिंगशी तुलना करावी अशी. तो कुणालाही घाबरत नसे. मोठमोठ्या गुंडांना त्याने पाणी पाजले होते. रतन त्याची मुलगी शोभेल अशी उंचीपुरी होती. त्यांच्या घरी एकदा रात्रीचा एक चोर घुसला होता. नेमका त्याचा पाय हिच्या हाताला लागला व तिला जाग आली. हिने त्याचा पाय पकडला व चोर चोर म्हणून बोंबाबोंब केली. पण तो पाय सोडवून घेऊन तो पसार झाला. मामाच्या हातात सापडला असता तर त्याची खैर नव्हती. नंतर त्या चोराला कळले की तो कोणाच्या घरी आला होता. तो फारच घाबरला. मग तो चोर बाबांना भेटून क्षमा मागून त्यांच्या पाया पडून गेला. अगदी काडीपैलवान फाटका दरिद्री माणूस होता. पोलिसांनी पकडण्यापेक्षा त्याला मामाच्या माराचीच जास्त भिती होती. पण तो बरोब्बर मामामामी नसताना येऊन गेला. हे फक्त बाबांना, मला आणि अरुणालाच ठाऊक आहे.

रतन व छाया वगैरे तिच्या समवयस्क मैत्रिणी रोज दुपारी बैठे खेळ खेळत. कोण म्हणतो टक्का दिला, रुमाल टाकी, सागरगोटे, काचापाणी, वगैरे बैठे खेळ. त्या सगळ्या कमालीच्या निपुण असल्यामुळे ते खेळ इतके रंगत असत की आजीआजोबा, मामामामी, आमची आई, आम्ही सर्व लहान भावंडे, मावसभावंडे, ते खेळ एकटक पाहण्यात रममाण होत असू. दुपारी एक-दीड वाजता जेवल्यावर खेळ सुरू होत. दोनचार तास कसे जात कळत देखील नसे. मोठी मुले मात्र कधी पेरूच्या झाडावर तर कधी जांभळाच्या झाडावर चढ, कधी लपालपी खेळ वगैरे उद्योग करीत.


 मग चहापाणी. मग डबा ऐसपैस. त्यात मुले मुली सगळी असत. मी, अरूणा आणि आमच्याच वयाची मावसबहीण हेमा, धाकटी मामेबहीण भारती, आम्ही कच्चे लिंबू होतो. म्हणजे आमच्यावर राज्य येत नसे. कधी ती मोठी मुले वाडीत खेळायला जात. मग आम्ही चौघे आणि वाडीतील आमच्या वयाचे श्रीकांत शेट्टी आणि अशोक माळी अशी पाचसहा मुले लंगडी, संत्रे लिंबू पैशापैशाला, आला आला गाडा वगैरे खेळत असू.
बाबांकडे मोठ्ठा ग्रंथसंग्रह होता. केतकरांचा शब्दकोश देखील. मी त्यातले वाटेल ते घेऊन वाचे. मारुतीच्या, कृष्णाच्या, अर्जुनाच्या, शौर्याच्या गोष्टी वाचायला फारच मजा येई. भुताखेतांच्या गोष्टी वाचताना मात्र गाळण उडे. आमची मामी फारच प्रेमळ. आम्हाला फारच प्रेमाने वागवी. तिची चार व आम्ही दोघे अशा सहाही मुलांकडे तिचे नीट लक्ष असे. आमची आई तिथे असली तरी मावशीच्या मुलींबरोबर गप्पा मारत किंवा खेळत असे. वाचताना भितीने कधीकधी माझ्या कपाळावर घाम येई. माझा मुखचंद्र पाहूनच मामीच्या लक्षात येई की हा घाबरला आहे. ती लगेच पुस्तक काढून घेई व मारुतीस्तोत्र म्हणायला सांगे. ते म्हटले की माझी भिती दूर पळून जाई. मामी अतिशय सुंदर. रुपसुंदरी म्हणता येईल एवढी सुंदर. कोणत्याही नाटकात किंवा सिनेमात राणीचे काम करू शकेल एवढी. गोल पातळ, अंबाडा, अंबाड्यावर कधी कधी जाळी. ठळक लालबुंद कुंकू. अजूनही माझ्या मनांतील सौंदर्याचा व सौजन्याचा मापदंड म्हणजे मामीच. मूर्तिमंत खानदानी सौंदर्य व मध्यमवर्गीय संस्कार. तिच्या रूपागुणांवरच तर मामा भुलला होता. मामाच्या घरचे बरे असल्यामुळे तिच्या घरच्यांनी त्यांचे विनातक्रार लग्न करून दिले. हे मला नंतर समोरच्या वाडीतील मुलांच्या घरी कळले. आमच्या आजीआजोबांची पण तिने खूप सेवा केली.
पण अशी पुस्तके असली तरी मला त्या वयाप्रमाणे राजपुत्र व राजकन्या यांच्या परीकथा फारच आवडत. बाकी सगळ्या मुलांना पण. तेव्हा २५ पैशांना ३२ पानांचे अशा गोष्टीचे पुस्तक मिळे. पण ती आम्हाला सुट्टीतच मिळत. आई घरखर्चातून पैसे वाचवून अण्णांच्या नकळत आम्हाला ती घेऊन देत असे. रानडे रोडवर श्री बुक स्टॉल होता. तिथे ती आम्हाला दोघांना घेऊन जात असे. दुकानात कोर्‍या कागदाचा गंध दरवळत असे. त्या दुकानात एक मोठ्ठे स्टूल होते. दादा टारझनच होता. त्या स्टुलावरून चढून तो काऊंटरवर बसत असे. मला भिती वाटे. तिथे आणखी एक छोटे स्टूल होते. त्यावर मला आई किंवा त्या दुकानातील नोकर उचलून उभा करी. मग तो गुजराथी दुकानदार आमच्यापुढे त्या पुस्तकांची चळत ठेवी. मी पहिल्या पानावरील काही मजकूर, मधल्या पानावरील काही मजकूर असे. पाचदहा पुस्तकातील वाचून माझे पुस्तक निवडी. दादा मात्र मुखपृष्ठ पाहून पुस्तक पसंत करी. एकदा दोन वेगळ्या चित्रांच्या दोन पुस्तकात एकच गोष्ट निघाली. मग निवडीचे काम माझ्याकडेच आले. काटकसर करून घरखर्चातून पैसे वाचवून आई आमचे एवढे लाड करी. खरेच चैनीची कल्पना आता कालपरत्वे केवढी बदलली आहे. पण चार चार आण्याची दोन पुस्तके महिन्यातून एकदोनदा घेणार्‍या गिर्‍हाईकाला एवढी आपुलकीची वागणूक देणार्‍या त्या गुजराथी दुकानदाराचे कौतुक करावे तेवढे थोडेच. हेमा - अरुणा पण तशीच पुस्तके आणीत असत. पण त्या ती ‘पडते’ च्या दुकानातून घेत. ‘पडते’ हेही आडनाव पडते बरे का. मग आम्ही पुस्तकांची देवघेव किंवा अदलाबदल - एक्सचेंज करीत असू.
मामा उंचापुरा, बलदंड आणि राजबिंडा. त्याचे रूप आठवले की सिनेमातले नायक फिके वाटतात. पुरुषी सौंदर्य म्हणजे काय तर याला पाहावे. सौंदर्य, शरीरयष्टी, ताकद, सौजन्य, औदार्य, रसिकता आणि दिलदारपणा याचे प्रतीकच तो. ताकद आणि सौजन्य या एका ठिकाणी न आढळणार्‍या गोष्टी त्याच्याकडे होत्या. हे केवळ माझा मामा म्हणून म्हणत नाही. त्याच्या ओळखीच्या प्रत्येकाचे मत तसेच होते. त्याला प्रत्येकाने तुम्ही न म्हणता तू म्हणावे असा त्याचा आग्रह असे. त्यामुळे मामी सोडून प्रत्येकजण त्याला अरे तुरेच करी. नंतर रतन तिच्या सासरच्या लोकांसमोर अहोजाहो करी. पण तेवढेच.

मामाला काय लहर येईल त्याचा काही नेम नसे. त्याकाळी बरीच मुले एकपाठी असत. मी देखील होतो. पण पाचसहा वर्षाचा असताना मला वयाच्या मानाने जलद वाचता येत असे व उच्चार स्पष्ट होते. एकदा मी तिथे असताना त्याच्याकडे कोणीतरी आले होते. त्या पाहुण्यांनी कोणतेतरी संस्कृत स्तोत्र उघडून एक चार ओळींचा श्लोक मला वाचायला सांगितला. मी अगोदर ते कधी वाचले नव्हते. स्पष्ट खणखणीत उच्चारात आणि स्वरांत वाचून दाखवले. नंतर पुस्तक मिटले व म्हणाले पुन्हा म्हण. मी तस्सेच्या तसे म्हणून दाखवले. वाऽऽ भाचेऽ वाऽऽ म्हणून मामाने मला उंच उचलले व गोलगोल फिरवले. उंच उचलल्यामुळे मी घाबरलोच. खाली ठेवल्यावर जिवात जीव आला. त्याने पैज जिंकली होती. जिंकलेला एक रुपया त्याने ताबडतोब माझ्याच खिशात ठेवला. मी लगेच मामीकडे गेलो व रुपया दाखवला. मामीने विचारले कुठून आणलेस? काय करणार या रुपयाचे? मी मामीकडे रुपया देऊन सगळे सांगितले व म्हटले की मला पुस्तके घेऊन दे. दोन मला आणि दोन अरुणाला. मामी म्हणाली उद्या तुझी आई येईल, तिलाच सांग. दुसर्‍या दिवशी संध्याकाळी आई आम्हाला घेऊन दुकानात गेली व पुस्तके घेऊन दिली.
आजी मात्र लहानखुरी. आम्ही तिला पण आईच म्हणत होतो. कारण मामाची मुले तिला आई आणि मामीला मम्मी म्हणत. कमरेत किंचित वाकलेली. गळ्यात लंबगोल बोरासारख्या सोन्याच्या मण्यांचा हार. चार पदरी मंगळसूत्र. गडद रंगाची नऊवारी तांबड्या, निळ्या किंवा जांभळ्या काठाची साडी. डोळ्यांनी नीट दिसत नसे. दुपारची गांधींचा सोनेरी काड्यांचा जाड काचांचा चष्मा लावून केसरी वाचायची. मुखात सदैव मालवणी भाषा. वाक्यावाक्यात म्हणीची पेरणी. हिच्याकडे एक सुरेख नक्षीदार सोनेरी चकचकीत पितळेचा पानाचा डबा होता. लांबट अष्टकोनी आकार. वर महिरपी कडी. झाकणाला कडी. झाकण उघडले की डब्याच्या अष्टकोनी आकाराच्या सपाट प्लेटवर मध्यभागी बसवलेली चुन्याची डबी. त्याभोवती नक्षीदार अडकित्ता. ती प्लेट उचलली की एक सहा खणी थर. यात एका खणात खंडाची सुपारी, दुसर्‍या खणात कातरलेली सुपारी. तिसर्‍या खणात चिकणी सुपारी, चौथ्या खणात कातरलेली चिकणी सुपारी. उरलेले दोन खण रिकामे. तंबाखू ती खात नसे. हा थर उचलला की खाली कच्ची पाने. हा डबा आम्हाला अलीबाबाच्या गुहेसारखा वाटे. हा उघडला की आम्ही वेगळ्याच विश्वात जात असू. अर्धा-पाऊण तास कसा जात असे ठाऊक नाही. पण फक्त मी आणि अरुणा. इतरांना कधी त्यात काही स्वारस्य वाटले नाही. त्या रिकाम्या दोन खणात पूर्वी पाहुण्यांसाठी तंबाखू ठेवलेला असे. पण तंबाखूच्या वासाने आम्हाला मळमळे. म्हणून तंबाखू ठेवणे बंदच केले. कुणी आलेच तर असावा म्हणून वेगळ्या डबीत ठेवलेला असे. हिची धाकटी बहीण सखू आजी आमच्याकडे राहायची. ती पण तश्शीच होती. पण ती पान खात नसे. मामाच्या आणि आईच्या मधल्या तिच्या एकदोन मुली गेलेल्या. म्हणून आईच्या बाबतीत ति जास्तच हळवी होती.
चला सुट्टी झाली करत आम्ही घरात आलो की बाबा मला माजघरात आईकडे पाठवत. माझ्या केसातून, तोंडावरून हात फिरवायची. मग मला विचारी. आऊस काय करता तुझीऽऽ? तुझो बापूस आवशीक करवादता काऽऽय? माशे कधी हाडललेऽ? खंयचे माशे होते? मटण कधी केल्यानी? वगैरे वगैरे. एकदा मी तिथे राहात असतानाची गोष्ट. घरी मटण होते. हेमंत, दादा वगैरे खेळायला गेले होते. वर मावशीकडे पण बाळा, लल्लू, विदू कोणी नव्हते. हिने डब्यात मटण भरले. कडी असलेला पितळेचा सोनेरी उभा डबा. कल्हई केलेला. खाकी कापडाच्या पिशवीत ठेवला व मागच्या दाराने भर उन्हाची निघाली. मामी म्हणाली मी जाते डबा घेऊन म्हणून. माका माझ्या चेडवाक बघूसा वाटता म्हणाली. मामी म्हणाली मी येते बरोबर. होयां कित्त्याक वांगडाक निंबराचा, मी जातय हळूहळू. तू बघ पोरांका. म्हणाली व निघाली. मामीला तिची फार काळजी वाटली. ती तिच्या मागोमाग थोडे अंतर ठेवून गेली. ती आमच्या गल्लीत घुसलेली मामीने पाहिले आणि मगच ती परत फिरली. परत येतांना माझी आईही अस्सेच तिच्यामागे कोणाला तरी पाठवीत असे. किंवा स्वतः जात असे. पण हे तिने बाबांना सांगितले नाही. बाबा आईला ओरडतील म्हणून. बाबा बाहेर निघाले की मामी त्यांच्यामागे असेच कुणाला पाठवी. पण बाबांना ते कळे. मग मामीला भरपूर दम देत. त्या पिढीतील लोकांचा पीळच वेगळा. पण बाबा कितीही ओरडले तरी मामीने ते सोडले नाही. मामीच्या जिवाची घालमेल तिच्या आरस्पानी चेहर्‍यावर दिसे आणि मला त्या वयातही जाणवे. नंतर मात्र बाबा निघतानाच हेमंतला किंवा विशाला नाहीतर बाळाला बरोबर घेऊन जात असत. केवळ मामीला भावनिक त्रास होऊ नये म्हणून. आई-बाबा-मामीच्या नात्याची वीणच अनोखी. आता त्या वयाला आल्यावर मामी मात्र अशी कोणाला काळजीत टाकत नाही. कोठे जायचे असेल ड्रायव्हरला घेऊन गाडीतूनच जाते. इतरांची अशा वेळी काय मनस्थिती होते ते तिला चांगलेच ठाऊक आहे.

आईने (आजीने) बनवलेली एक जादूची वस्तू मला आत्तादेखील नजरेसमोर दिसते. बेडेकर लोणच्याची उभी काचेची बाटली असते. तशा बाटलीत सोनेरी मण्यांनी मढवलेल्या तंगूसाने एक अंडे झाकणाला टांगलेले. अंड्याभोवती नाजूक नक्षीच्या सोनेरी साखळीने नक्षी केलेली. हलका धक्का दिला कीं ते अंडे मस्त थरथरत असे. अशा पाच-सात अंडी टांगलेल्या बाटल्या होत्या. अंडे म्हणजे अंड्याचे अखंड रिकामे कवच. ते न फोडतां आतले कसे काढून घेत कुणास ठाऊक. आईने ते आम्हाला कद्धी सांगितले नाही. या शोभेला कुठेकुठे ठेवलेल्या. मी आणि अरूणा एकेक बाटली घेऊन त्यांबरोबर तासतास खेळत असू. अजून एक जादुई वस्तू होती. ही मामाने आणली होती. एक सरबताची रिकामी बाटली. आडवी ठेवलेली. पण बाटलीत बांबूच्या काड्यांचे नाजूक शिडांचे जहाज. हे मात्र हलत नसे. पण ते जहाज बाटलीच्या एवढ्याशा तोंडातून कसे घातले असेल हे मला अजूनही कोडेच आहे. हे मात्र खेळायला घेत नव्हतो. हे मात्र अजूनही कुठेकुठे भेटवस्तूंच्या दुकानात पाहायला मिळते.
आईची आत्या पण तिथेच राहात असे. चष्मेवाली आजी असे तिला नांव होते. किंचित काळसर छटा असलेल्या गोल काचा लावलेला, बारीक काळ्या तारेचा चष्मा सदोदित डोळ्यांवर. आम्हाला भाजलेले शेंगदाणेच काय पण चणे देखील सोलून द्यायची. पण फार कडक होती. नजर तीक्ष्ण. आणि सगळे दात शाबूत. नव्वदी पार झाली असली तरी तांदूळ निवडून देत असे. बाबांच्या विरुद्ध आईची (आजीची) बाजू नेहमी घेई. बाबा पण तिला कधीही उलट बोलत नसत. नंतर हिची मामीने व रतन-अरुणा-भारतीने खूप सेवा केली.
माझ्या आईची दुसरी मावशी त्याच घरात एका खोलीत राहात असे. तिचे यजमान बर्‍याच वर्षापूर्वी वारलेले. तिचा मुलगा विशा. खरे नाव विश्वनाथ. बिचार्‍याचे शिक्षण झाले नाही. बाबांनी आधार दिला नसता तर त्याचे काय झाले असते ठाऊक नाही. चुरगळलेला शर्ट आणि अर्धी विजार घटलेले त्याचे उंचेपुरे पण गबाळे ध्यान. नंतर हा राख्या विकायचा, दिवाळीत कंदील बनवून विकायचा आणि असेच काहीबाही फुटकळ धंदे करायचा. मग कमवायला लागल्यावर त्याचे रूप बदलले. चकाचक डेक्रॉनची नाहीतर रेमंडची गडद रंगाची पॅंट आणि बाहेर टाकलेला टेरिलीनचा ओपन शर्ट घालायला लागला. सावळ्या रंगाच्या उंच्यापुर्‍या विशाला ते कपडे शोभून दिसत. केसांचा मस्त कोंबडा पाडत असे. त्याला ऐटीत पाहिल्यावर आम्हाला बरे वाटायचे. मग त्याने एक रेसल सायकल घेतली. आता ‘हार्ली डेव्हिडसन’चे जसे कौतुक होईल तसे कौतुक तेव्हा रेसल सायकलीचे होते. त्याच्या सायकल चालवण्याचे आम्हाला कौतुक वाटायचे. अधूनमधून हा सायकल केरोसिनने स्वच्छ करून तेलपाणी देई. तेव्हा त्याच्या यांत्रिक कौशल्याचे कौतुक वाटे. त्याच्या सायकलीची घंटी सुरेखच होती. दोन फिरत्या वाट्या असलेली. एकदा फिरवली की बरेच फेरे घ्यायची व फिरताना मंजुळ आवाजात वाजत राहायची. मला आणि अरुणाला तो कौतुकाने उभ्या केलेल्या सायकलवर मऊ सीटवर बसवून घंटी वाजवायला देई. इतरांना सायकलला हातही लावायला देत नसे. याला एकदा मामाने सायकलवरून बसला धरून जाताना पाहिले आणि घरी आल्यावर त्याच्या खोलीत जाऊन मार दिला. मामीने लगेच बाबांना सांगितले. बाबा मध्ये पडले म्हणून पाच-दहा फटक्यात बचावला. मामाला एवढे रागावलेले मी त्या वेळी प्रथमच पाहिले. पण एकही शब्द उलट न बोलता विशाने निमूटपणे मार खाल्ला. मार चुकवायला काहीही खोटे बोलायचा किंवा पळायचा प्रयत्न न करता. आता मला वाटते हे त्या काळातले वैशिष्ट्य होते. कोणीही खोटे बोलत नसेच तसे उद्धटपणे उलट देखील बोलत नसे.

दर गोकुळाष्टमीला मामा शास्त्रीय संगीताची खाजगी मैफिल ठेवीत असे. सात-साडेसातला लौकर जेवून आम्ही मामाकडे मैफिलीसाठी जात असू. पं. रविशंकर, उ. अल्लारखां, पं. सामता प्रसाद, पं. रामनारायण, पं. जगन्नाथ प्रसाद, पं. किशन महाराज, इ. चे कार्यक्रम माझ्या लक्षात आहेत. बाबांच्या घरातील दिवाणखाना जसा होता अगदी तस्साच मावशीच्या पहिल्या मजल्यावरच्या घरात. तस्साच दुसर्‍या मजल्यावर. एकदोनदा मावशीच्या घरांत एकदोनदा दुसर्‍या मजल्यावर पण मैफिली झाल्या आहेत. अल्कॉव्हमधे स्टेज असे. बाकी सगळे सामान हलवून पांढरी चादर घातलेल्या गाद्या ऊर्फ भारतीय बैठक असे. देवघरातील तसबिरींना जास्त गुबगुबीत हार दिसत. उदबत्तीचा मंद सुगंध फुलांच्या सुगंधात मिसळून दरवळत असे. ध्वनिव्यवस्था काही नाही. समजदार श्रोतृगणाची शांतता व जाणकारांची अधुनमधुन वाहवा हीच ध्वनिव्यवस्था. (सत्तर सालानंतर श्रोतृगण वाढल्याने घराबाहेर मंडप व स्टेज उभारले जाई. आणि ध्वनिव्यवस्था असे.) व्ही. जी. ऊर्फ स्नेहल भाटकरांचे घर बाजूलाच. ते मामाचे मित्रच. गौळण हा त्यांचा आवडता गायनप्रकार. कृष्णजन्माचा उत्सव. त्यामुळे सुरुवात भाटकरांच्या एकदोन गौळणींनीच होत असे. लाल फ्रेमचा चष्मा, स्वच्छ पांढरा लेंगा व सदरा, कपाळाला गंध किंवा अबीर आणि पांढरी गांधी टोपी. ते स्वतः पेटी वाजवत तल्लीन होऊन गाताहेत असे त्यांचे रूप अजून डोळ्यासमोर आहे. ‘चाऽऽलल्याऽऽ पाऽऽच गौऽऽळऽणी, पाऽऽच रंगाऽचे शृंगाऽर करुनि’ आणि ‘वारियाऽऽने कुंडल हाऽऽले, डोळे मोऽऽडीत राऽऽधा चाऽले’ या त्यांच्या खास गौळणी. जवळच काळू भुवन मध्ये राहणार्‍या जगन्नाथबुवांबरोबर (स्व. मुकेश यांचे गुरु) एक वयस्कर गृहस्थ पण येत. त्यांना दादाजी म्हणत. ते जगन्नाथबुवांचे मिठे बंधु किंवा काका असावेत, नक्की आठवत नाहीं. भाटकर गायला बसले की ते तबल्यावर बसत. भाटकरांच्या गवळणी झाल्या की ते सगळ्या लहान मुलांना पहिल्या रांगेत बसवत. तबला वाजवत वाजवत लहान मुलांसाठी दोनतीन हिंदी बडबडगीते म्हणून धमाल उडवून देत. गातागाता तबल्यातून चित्रविचित्र असे गंमतीदार बोल काढत. एक गाणे आठवते
मेरा डमक डमक डम undefined बोले.
मेरा डमकूऽऽ.
ये चमकू दूऽऽधवाला आया
मेरा डमकूऽऽ
बरतन लेकर आओ जी आशाबाई,
बरतन लेकर आओ जी उषाबाई,
ये चमकू दूऽऽधवाला आया
मेरा डमकूऽऽ.
या ओळी अजून आठवत आहेत. त्यांची एकदोन गाणी झाली की आम्ही दिवाणखान्याच्या आतल्या बाजूच्या दरवाजात बसत होतो. झोपलोच तर उचलून नेणे सोपे पडावे म्हणून. एरवी नऊदहाला झोपणारी आम्ही मुले दोनदोन वाजेपर्यंत जागत असू. मैफिलीचे शिष्टाचार आणि स्वरतालाची प्राथमिक समज यांचे संस्कार अशा मैफिलीतून बालमनावर कधी झाले कळले नाही. त्यामुळे गायनवादनाची कला अंगी नसली तरी संगीताच्या दर्जाची समज मात्र आली.

आजोबांचे शिवाजी पार्कला दुमजली घर होते. आजोबा तळमजल्यावर व मावशी पहिल्या मजल्यावर राहात असत. मावशी सगळ्यात मोठी, माझी आई सगळ्यात लहान, मामा मधला अशी तीन भावंडे होती. आता त्या घराच्या जागी टॉवर आहे. चौदाव्या मजल्यावरून समुद्र दिसतो, शिवाजी पार्कमोठ्ठ्या तबकाएवढे दिसते. पूर्वी दुसर्‍या मजल्यावरच्या मजल्यावरील गच्चीतून लेडी जमशेटजी रोडपलीकडच्या इमारतीखेरीज काही दिसत नसे. मामी, हेमंत, रतन, अरुणा, भारती यापैकी कुणीहि कधी लग्नसमारंभात वगैरे भेटल्यास वा त्या भागातून जातांना बालमनातील निरागस विश्वातील पहिल्यावहिल्या स्मृती मात्र जिवंत होतात. आजूबाजूचे सगळे नाहीसे होते. मी पुन्हा बाबांच्या दिवाणखान्यात जातो. समोर बाबा येतात. त्यांच्या मिशा दिसतात. तोच सिगरेट, चंदन, फुले व उदबत्तीचा संमिश्र गंध येतो, पानाचा डबा घेतलेली आई (आजी) दिसते, तिचा हात केसातून, गालावरून फिरतो. ती विचारतेतुझो बापूस आवशीक करवादता काय? गाईच्या गळ्यातल्या घंटांचा मंजुळ आवाज येतो. मग गाईलाऽऽ चाऽऽराऽऽ अशी गायवालीची साद येते. मामा मला उंच उचलून वाऽऽ भाचे वाऽऽ म्हणून गिरक्या घेतो आणि दोन वेण्या लालचुटुकरिबिनेने वर बांधलेली छोट्टी अरुणा सुंदरसा हार गुंफून विचारते, कसा झालारे हार? व्यवहारातील निबरतेचा, स्वार्थाचा, मतलबाचा, खोटेपणाचा स्पर्श न झालेल्या स्मृति. पन्नास वर्षांपूर्वीच्या अनोख्या विश्वात घेऊन जाणार्‍या आयुष्यातील पहिल्यावहिल्या मोहक स्मृति.

लेखक: सुधीर कांदळकर

Print Page

३ टिप्पण्या:

Shreya's Shop म्हणाले...

आता न राहिलेल्या आजोळाची आठवण झाली मात्र :-(

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

असं आजोळ मिळायला नशीब लागतं. :-) माझं आजोळ इतकं वैभवशाली नव्हतं पण थोडंफार साम्य जाणवलं. माझ्या पुढच्या पिढीला मी असं आजोळ देऊ शकत नाही याचं वाईट वाटतं :-( घरात बरंच जुन्या धाटणीचं फर्निचर आहे, जुना फोनोसुद्धा आहे. तो जपून ठेवलाय.

सुधीर कांदळकर म्हणाले...

धन्यवाद माझी दुनिया.

असं आजोळ मिळायला नशीब लागतं.
हें अगदीं खरें.

वैभवाचें काय धरून बसलांत. बाबा काय, मामी काय यांचीं मनें वैभवशाली होती. आमच्या गरिबीची आम्हांला त्यांनीं कधीं लाज वाटूं दिली नाहीं. मामीनें तर मामा गेल्यानंतरहि आम्हांला अजूनहि अंतर दिलें नाही.

प्राच्य (ऍन्टीक) फर्निचर, फोनो वगैरे जपून पॉलिश करून लखलखीत ठेवा. पुढील अंकांत आठवणी लिहा व प्रकाशचित्रें चढवा.

प्रतिसादाबद्दल धन्यवद.